जोहार मायबाप जोहार । माझी नकटी बायको गर्‍हवार । खावया मागती आंब्याचा खार । आणुनी द्यावा की जी मायबाप ॥ १ ॥

माझी बायको मोठी । तिची संगत पडली खोटी । तिनें माझी धरोनी हनुवटी । म्हणे ऐका की जी मायबाप ॥ २ ॥

माझें एक मूल लहान । त्याचें तुम्ही करा पाळण । हें सांगतों वर्तमान । सावधान ऐका की जी मायबाप ॥ ३ ॥

माझी बायको राधाई । तिचे पंचमूर्ति जावाई । म्हणोनी सर्वांसी सांगतों पाही । ऐका की जी मायबाप ॥ ४ ॥

एका जनार्दनाचा महार । सांगतों वर्तमान फार । माझा खोटा नव्हे समाचार । परब्रह्मीं वास कराल की जी मायबाप ॥ ५ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel