जोहार मायबाप जोहार । पाटील पांडे जोहार । देसाई देशमुख जोहार । कीजीये सरदार । कोंडून राखिलें की जी मायबाप ॥ १ ॥

उघडा उघडा नेत्रांचीं ब्रह्मकवाडें । ऐका धर्मरायाचे प्रमान निवाडे । जेणें चुकेल जन्ममरणाचें सांकडें । इमारतीचीं लांकडें ।

रानोमाळ होतील की० ॥ २ ॥

खडीफरज धर्मराज खरा । तेणें कलुषा मारून केला चुरा । माझें धन्याचे घरा । कधीं मधीं येत जा की० ॥ ३ ॥

अकाबाई सावकारीण मोठी । कायापुर नगरीं केली खोटी । तिनें तर पडिली भल्यासी तुटी । तेथें तुमचें काय चाले की० ॥ ४ ॥

व्याही जावयांसी म्हणे लेकरा । त्यांसी वाढितां तूप साखरा । मला देखुन लपतां एकसरा । अंतकाळीं चाकर मीच की० ॥ ५ ॥

जांवयासी वाढी तूप लई । मला म्हणतां उरलें नाहीं । घर बुडाले याचे पायीं । प्रत्यक्ष ग्वाही मीच की० ॥ ६ ॥

सकळ कोणी जाऊं नका । मागील बाकी ठेवूं नका । नाहाक एखादा धका । बसेल की० ॥ ७ ॥

अविद्ये खिडकी वाटे गेला । तो यमदूतें धरोनि नेला । लक्ष चौर्‍यांयशी मारथी मारथीला । आइका की० ॥ ८ ॥

झाडाल बाकी तर तुम्ही व्हाल सुखी । हें सत्य तिहीं लोकीं । झेंडा नौबद लावा निकी की० ॥ ९ ॥

एका जनार्दनीं महार बोले । म्हणून नका जाऊं गर्वे । मारितां अंग होईल हिरवें । सांगतों बरवें की जी मायबाप ॥ १० ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel