उठा उठा मायबाप । नका येऊं देऊं झोंप । आली वो आली यमाजीची तलब ॥ १ ॥

तुमचे गांवांत नाहीं पाटीलबावा । पाटलीण आवाचा मोठा दावा । घरचें घरकूल झाकून ठेवा ॥ २ ॥

तुमच्या सुनेची नाहीं वागणूक बरी । तिचे घरधनी मनाजी पाटील थोरी । त्यांच्यातील वाद सार्‍या गांवांत भारी ॥ ३ ॥

पाटीलबावाची ऐकावी थोरी । सहा कारभार करती घरीं । पांच तीं पोरें रडती दारोदारीं ॥ ४ ॥

आतां पाटीलबावा तुम्ही हुशारी धरा । यमाजीबाजी वो येतील घरा । इकडून तिकडे वो नाहीं पळाया ॥ ५ ॥

एका जनार्दनीं कांही हित करा । आपला आपण चुकवा फेरा । जन्ममरणाच्या तोडा येरझारा ॥ ६ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel