नमो आदि माया भगवती अनादि सिद्ध मूळ प्रकृती । महालक्ष्मी त्रिजगतीं । बया दार उघड दार उघड ॥ १ ॥

हरिहर तुझें ध्यान करिती । चंद्र सूर्य कानीं तळपती । गगनाचें प्रावर्ण रुळती । ते तारांगण भांगीं भारिलें मोतीं । बया० ॥ २ ॥

नवखंड पृथ्वी तुझी चोळी । सप्तपाताळीं पाऊलें गेलीं । एकवीस स्वर्ग मुगुटीं झळाळी ॥ बया० ॥ ३ ॥

अलक्षपूर भवानी दार उघड बया । माहूर लक्ष्मी दार उघड बया । कोल्हापूर लक्ष्मी दार उघड बया । तैलंग लक्ष्मी दार उघड बया । तुळजापूर लक्ष्मी दार उघड बया । पाताळ लक्ष्मी दार उघड बया । कानाड लक्ष्मी दार उघड बया । अष्टभुज लक्ष्मी दार उघड बया । पंढरपूर निवासिनी दार उघड बया । उदो उदो उदो ॥ ४ ॥

चारी पुरुषार्थ गोंधळी । सनकादिक तेथें संबळी । तेहतीस कोटी भुतावळी । आठ्यांयशी सहस्त्र ऋषि मंडळी । दिवट्या पाजळोनि तिष्ठती ॥ बया० ॥ ५ ॥

वेताळ फेताळ खंकाळ । मेसको मारको मैराळ । जानाई जोखाई क्षेत्रपाळ । म्हैषासुर दैत्य मातला सबळ । अबबब पीडा गेली अंबे । बया दार उघड

॥ ६ ॥

मच्छाई बया दार उघड । कच्छाई दार उघड । वर्‍हाई बया दार उघड । नरसाई बया दार उघड । वामनाई बया दार उघड । परसाई बया दार उघड । रामाई बया दार उघड । कृष्णाई बया दार उघड । बोधाई बया दार उघड । कलंकाई बया दार उघड । महालक्ष्मी बया दार उघड । उदो उदो उदो ऐसा शब्द गाजतो । कामक्रोध दैत्यावर कोरडा कडाडा वाजतो । ज्ञान पोत पाजळतो । बोध परडी हातीं घेतो । प्रेमाचा पाऊल पुढें ठेवितों । अहं शंखासूर दैत्य बळी देतो । बया दार उघड ॥ ७ ॥

हिरण्याक्ष हिरण्यकशिपु कोंबडें पिळी । बळीसी घालूनी पाताळीं । सहस्त्र अर्जुनासी हातोफळी । हनुमंत दिवटा महाबळी । अठरा पद्म घेउनी रणकल्लोळीं । सागर बांधोनियां शिळी । करी लंकेची होळी । रावण कुंभकर्ण मातले बळी । तेथें तूं खेळसी शिरांची चेंडूफळी । बया दार उघड ॥ ८ ॥

शरण आला तुज बिभीषण । तयासी राज्यीं अक्षई स्थापून । प्रल्हाद उपमन्यु ध्रुवासी भातुकें देऊन । बुझाविसी कवतुकें । बया दार उघड ॥ ९ ॥

आणिक एक अंबे नवलपरी । तुझी यात्रा कलीयुगामाझारीं । अविंगल दृश्य परोपरी । निंब नारळ घेऊनि करीं । हळदीं कुंकुम अर्पिती । बया दार उघड

॥ १० ॥

वाहन तुझें सिंह केसरी । मोकळे केश त्रिशुळ शंख करीं । शिशुपाळ वक्रदंत दोन्ही बकरीं । आहुती घेसी जगदंबे । बया दार उघड ॥ ११ ॥

तेथून पुढें दसरा आला । अठरा दिवस घट मांडिला । कौरव पांडव सैन्य मेळ मिळाला । तेथें शोभसी विराजमान हो दुर्गे । बया दार उघड ॥ १२ ॥

जयजयाजी मूळ पीठेंद्र भवानी । पांडव कुळींची कुळस्वामिनी । अर्जुन रथीं स्वार होउनी । वागदोर हातीं धरुनी । रथ फिरविली कवतुकें । बया दार उघड ॥ १३ ॥

द्रौपदी बहिणीचेनी कैवारेंसी । होम करुनी कुरुक्षेत्रासी । तुझें साहित्यें पूर्णाहुतीसी । तें तुज प्रती अर्पिलें हो जगदंबे । बया दार उघड ॥ १४ ॥

रणवाद्य भम् भम् दण् दण् कड् कड् वाजती । तोची गोंधळ अंबे तुजप्रती । रणस्वादपट स्थापिला मध्यवर्ती । प्रथम धूप घटाप्रती । भीम सुत बभ्रु अर्पिला । बया दार उघड ॥ १५ ॥

ऐसा रण उत्सव मांडिला । उदो उदो ऐसा शब्द झाला । तेव्हां अर्जुन भक्त झडपिला । संशयसूत्रें तें काळीं । महाशक्ति कृष्णाबाई । बया दार उघड ॥ १६ ॥

संशयभूत असे कठिण । हरिहर ब्रह्मासी नाटोपे जाण । चारी वेद सहा शास्त्रें अठरा पुराण । अठ्यांयशी सहस्त्र ऋषी शिणले जाण । मग त्वां बोध खंडा हातीं घेऊन । शिर छेदिलें भूताचें । बया दार उघड ॥ १७ ॥

बया त्वां रणकुंड जबडा पसरिला । आहुती घेसी दोनी दळा । रथ घोडे कुंजर तुला । नारळ तुला अर्पिला । बया दार उघड ॥ १८ ॥

भीष्म द्रोण हीं कुळें । तीळ तांदुळ पायदळें । आणिकही वीर भले भले । निंबें कापुनी टाकिलीं । बया दार उघड ॥ १९ ॥

रक्त वाहे भडभडा । तेंची तेल घृत जळे धडधडा । कौरव पतंग पडती गाढा । दुर्योधन हा लक्ष्मी तुझा रेडा । शेवटीं आहुती घेसी तयाची । बया दार उघड

॥ २० ॥

शिलंगण खेळसी नानापरी । कौरवकुळींची करुनी बोहरी । द्वारका लपवोनि समुद्रीं । यादवकुळ पाठविसी माहेरी । निजधामा कारणें । बया दार उघड

॥ २१ ॥

पुढें जंबुद्वीपाभीतरीं । अंबे तुझी न वर्णवे थोरी । खेळ खेळसी वैष्णवामाझारीं । पुंडलिक दिवटा महाभारी । पोत पाजळुनी करीं । ओवाळिसी महामाया

। बया दार उघड ॥ २२ ॥

मग जगदंबा प्रसन्न झाली । भक्तीचीं कवाडें उघडीं केलीं । शंख चक्रांकित शोभली । रूप सुंदर सांवळी । कोटी चंद्र सूर्य प्रभावळी । बया दार उघड

॥ २३ ॥

एका जनार्दनीं माउली । करी कृपेची साउली । भक्त जया कारणें । बया दार उघड ॥ २४ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel