ब्राह्मण-ग्रंथ व उपनिषदांप्रमाणें पालि वाङ्मयांतहि अनेक वाक्यें व शब्दप्रयोग यांची पुनरुक्ति आढळते. सुत्तनिपात ह्याला अपवाद नाहीं. सुत्तें ३, ६, ७, १३, १४, १६, ३०, ३१, ३५ ह्या सुत्तांत कित्येक गाथांतील शेवटला चरण धृपद म्हणून वापरलेला आहे. इतर पालि पुस्तकांप्रमाणें येथेंहि हृदयाला भिडणार्‍या भरपूर उपमा, उत्प्रक्षा, रूपकें किंवा दृष्टान्त आढळतात (४६, ४८, २०१, २५५, ३२१, ३५३, ४४३, ४८०, ८३१, ९२०, १०१४). मूर्ख माणसांची तुलना अर्धवट भरलेल्या भांड्याशीं किंवा खळखळणार्‍या ओढ्याशीं केली आहे तर शहाण्या मनुष्याला शान्त सरोवराची किंवा शान्त नदीची उपमा दिली आहे (७२०-२१). या उपमा किती सार्थ आहेत! एकें ठिकाणीं आपल्या नातेवाइकांत बसून बोलणारा माणूस जेव्हां मृत्यूनें ओढला जातो तेव्हां त्याला वधस्थानीं खाटकाकडून ओढल्या जाणार्‍या गायीची उपमा दिली आहे (५८०). दुसरे एके ठिकाणीं एकमेकांशी झोंबाझोंबी करणार्‍या या जगांतील माणसांना उथळ पाण्यांत जीवनाकरितां तडफडणार्‍या माशांची उपमा दिली आहे (९३६). गृहस्थाश्रमी मनुष्य मुनीची बरोबरी कदापि करूं शकत नाहीं, हें दाखविण्याकरितां एक अतिसमर्पक दृष्टान्त दिलेला आहे. ज्याप्रमाणें निळी मान असल्यामुळें सुंदर दिसणारा व आकाशांक (थोडेंसे) उडणारा मोर ह्यास हंसाची गति कदापि प्राप्त होण्याजोगी नाहीं, त्याप्रमाणें गृहस्थाश्रमी मनुष्य मुनीची कदापि बरोबरी करूं शकणार नाहीं (२२१).

छन्दोरचना :- सुत्तनिपाताचीं सर्वसाधारण छन्दोरचना म्हणजे जुने वैदिक छन्द-आठ अक्षरांचा अनुष्टुभ्, अकरा अक्षरांचा त्रिष्टुभ्, किंवा बारा अक्षरांचा जगती. या छन्दांतून अक्षरांची संख्या ठराविक असते. परंतु अक्षरांच्या ह्नस्वत्वाकडे किंवा दीर्घत्वाकडे लक्ष दिले जात नाहीं. या वैदिक छन्दांत छन्द:शास्त्रांतील उत्तर कालीन गणपद्धतीचा अवलंब केला जात नाहीं. सुत्तनिपातांत आपणांस कांहीं ठिकाणीं उत्तरकालीन गणवृत्तांपैकीं इन्द्रवज्रा व उपेन्द्रवज्रा यांचें मिश्रण झालेलें आढळतें (२०८-२१२-२१४-१९). कांहीं ठिकाणीं वंशस्थ व इन्द्रवंशा यांचेंही मिश्रण आढळतें (२२१, ६८८-९०). कांहीं गाथा तेरा अक्षरांच्या आहेत (२२०, ६७९-८०, ६९१-९८). त्यांना अतिजगती असें म्हणतात. पण त्यांतील पंक्तींचें पृथ:करण केलें तर गणपद्धतीच्या कोणत्याहि एका वर्गांत बसतीलच असें नाहीं. कांहीं गाथा वैतालीय वृत्तांत आहेत (३३ ३४, ६५८-५९, ८०४-१३). कांहीं औपच्छन्दसिकांत आहेत (१-१७, ८३-८७, ३६१-७३). कोकालियसुत्तांतील (६६३-७३) गाथांचें वृत्त वेगवती असून थोडाफार लवचिकपणाही त्यांत आढळून येतो. कांहीं गाथांची शब्दरचना निर्दोष नसल्यामुळें त्या नीट सुरांत म्हणतां येत नाहींत (१४३-१५२, ९१६-३४). यामुळें त्यांना सर्वसाधारण गाथा या नावानें संबोधलेलें बरें.

उत्तरकालीन संस्कृत वाङ्मयांतल्याप्रमाणें या ग्रंथांत काव्यरचनेचे ठराविक नियम पाळलेले दिसत नाहींत. अनुष्टुभ् छन्दांतील कित्येक गाथांमध्ये सहा पाद किंवा चरण आढळतात (३०३, ३०६-३०७, ५४७, ७३९, ७५१, ७६२, ७६३, ९९२). त्रिष्टुभ् वृत्तांतीलही कांहीं गाथांत पांच किंवा सहा पाद आढळतात (४६९, ४७८, ५०८, ८६३, ८७५,). कांहींत सात किंवा आठही पाद आहेत (२१३, २३१, १०७९, १०८१, १०८२). गाथा ६५९ मध्यें आपणांस वैतालिय वृत्तांत पांच पद आढळतात. कांहीं ठिकाणीं अनुष्टुभ् व वैतालीय यांचें मिश्रण आढळतें (१५३, ४५७, ५४०), तर कांहीं ठिकाणीं अनुष्टुभ् व त्रिष्टुभ् यांचें मिश्रण आढळतें (३२७, ४५९, ४८२, ४८६, १०५५ ते २०६८, ११४९).

अशा रीतीनें ह्या ग्रंथाचा परिचय सर्व साधारण वाचकांसही उद्बोधक होईल अशा रीतीनें करून दिला आहे. जिज्ञासू लोक हा ग्रंथ प्रत्यक्ष वाचूनच त्याचा परिचय करून घेतील अशी आशा प्रदर्शित करून हा लांबलेला ग्रंथ-परिचय पुरा करतों.

स्वाध्याय, पुणें                                                                      पु. वि. बापट
२०/७/५५
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel