(इ) कसिभारद्वाज व धनियसुत्त यांमधील सुंदर संवाद—कसिभारद्वाजसुत्तावरून (४) “भिक्षु हा एक आळशी प्राणी आहे” असा आरोप काहीं लाको करीत असत असें दिसतें. भारद्वाजब्राह्मण भिक्षा मागणार्‍या बुद्धाला म्हणतो—“शेत नांगरून बीं पेरून म्हणजे कष्ट करून निढळाच्या घामानें तूं अन्न कां मिळवीत नाहींस?” गौतम उत्तर देतो. “मी आळशी नसून मीही मानसिक शेतीचें काम करीतच असतो. मीही एक शेतकरी असून मनोविकासाचें काम करतों.” धनियसुत्तांत (२) ही असाच एक सुंदर संवाद आहे. आज्ञाधारक व कर्तव्यदक्ष पत्नी, सुंदर, निरोगी मुलें न खूप गुरेंढोरें ज्याच्याजवळ आहेत अशा एका गवळ्याची व उलटपक्षी निर्धन व घरदार नसलेल्या, भटक्या, अशा बुद्धाची तुलना करून हा भटक्या बुद्ध देखील सुखी असूं शकतो असें दाखविलें आहे. या अकिंचन बुद्धाला कसलेंही बंधन नसून तो कोणाचाही दास नाहीं. स्वत:च्याच निग्रही मनामुळें स्वत:चाच मालक बनला आहे. सुखामुळें तो हुरळून जात नाहीं किंवा दु:खामुळें गांगरूनही जात नाहीं; कारण तो निरुपाधि (अलिप्त) असा आहे.

(ई) गौतमबुद्धाविषयींचीं तीन आख्यानें :-
पब्बज्जा (२७), पधान (२८) व नाळक (३७) ह्या सुत्तांना एक विशिष्ट महत्त्व आहे. ज्याच्यांतून बुद्धचरित्राची निर्मिति होऊं शकेल अशा एका विशिष्ट जुन्या धार्मिंक आख्यानाचें अवशेष ह्यांत दिसतात. नाळकसुत्तांत बुद्धाच्या जन्मानंतर लगेच घडलेल्या एका घटनेची हकीकत आहे. पूज्य असित, बुद्धाच्या जन्मामुळें आनंदित झालेल्या देवांना पाहून, शुद्धोदनाच्या दरबारीं मुलाला पाहण्याकरितां आला. मुलाला पाहून त्यानें भविष्य वर्तविलें कीं, “हा सबंध जगाचा धर्मगुरु होईल”. बुद्ध ज्या वेळेस अशा रीतीनें धर्मगुरु होऊन धर्मचक्र चालूं करील त्या वेळेस आपण जिवन्त असणार नाहीं ह्याबद्दल त्याला वाईट वाटलें. म्हणून त्यानें आपला भाचा नाळक याला बुद्धाचा शिष्य होण्यास सांगितलें. अशा तर्‍हेचा कथाभाग ह्या सुत्ताच्या पहिल्या भागांत म्हणजे वत्थुगाथेंत आहे. ह्याच सुत्ताच्या उत्तर भागांत ‘मौनेय’ (७०१ पासून पुढें) सांगितलें आहे. बालबुद्धाविषयीं ही पौराणिक कथा आहे व त्यांत बुद्धाची चमत्कार दाखविण्याची शक्ति वर्णिलेली आहे. पब्बज्जासुत्तांत बुद्धाच्या प्रव्रज्येची हकीकत आहे. आपलें घरदार सोडून मगध देशांत हिंडत असतां तो मगधाची राजधानी, राजगृह, येथें आला. मगध देशचा राजा बिंबिसार यानें बुद्धाची भेट घेतली व आपल्या दरबारीं राहण्यास विनविलें पण बुद्धानें तें नाकबूल केलें व आपलें ध्येय गांठण्याकरितां अवश्य ते प्रयत्‍न करणें प्राप्त आहे असें सांगून तो निघून गेला. पधानसुत्तांत मार व गौतम यांचें संभाषण आहे. गौतम नैरंजरा (४२५) नांवाच्या नदीच्या कांठीं बसला असून आपलें ध्येय गांठण्यासाठीं ध्यानस्थ बसलेला आहे. मार बुद्धाला त्या मार्गापासून परावृत्त करण्याचा प्रयत्‍न करतो व असा उपदेश करतो कीं, “ह्या कांहीं भानगडींत न पडतां बह्मचर्याच्या जीवनानेंच किंवा यज्ञ करूनच पुण्यसंचय करतां येईल.” पण गौतम पुण्यसंपादन करण्याबद्दल बेफिकिर असतो. शेवटीं, “सात वर्षे मी तुझा पाठलाग करीत आहें तरी मी तुझें मन वळवूं शकलों नाहीं व तुझ्यावर ताबा मिळवूं शकलों नाहीं,” अशी कबुली देऊन निरुत्साही व दु:खित मनानें मार नाहींसा झाला (४४६-४४९). ही गोष्ट म्हणजे गौतमाच्या मनांतील सत्प्रवृत्ति व असत्प्रवृत्ति ह्यांचा झगडा सुचविणारें काव्यमय रूपकच होय. लोभ,. असमाधान, क्षुत्-पिपासा, तृष्णा, अनुत्साह व आलस्य, भीति, कुशका, परगुणांबद्दल तिरस्कार, दुराग्रह, लाभ, कीर्ति व खोट्या मार्गानें मिळविलेल्या यशामुळें प्राप्त होणारीं आत्मस्तुति व परनिंदा- हीं माराची आयुधें होतीं (४३६-३९). ह्या सर्व असत्प्रवृत्तींवर जय मिळवल्यावर बुद्धाच्या मनांतील सतप्रवृत्तीचा विजय होतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel