गुरुवर्यांनीं आपल्या प्रस्तावनेच्या शेवटी म्हटल्याप्रमाणें संस्कृतज्ञ पण पालि न जाणणार्‍या लोकांनाही ह्या प्रसिद्ध होत असलेल्या ग्रंथामुळें पालि जाणण्याचें बाबतींत फारच मदत होईल कारण ह्या ग्रंथामध्यें मूळ पालि ग्रंथ वर व खाली लगेच त्याचें मराठी भाषांतर असल्यामुळें मूळ ग्रंथाचें आकलन होण्यास फारसे सायास पडणार नाहींत. गुरुवर्यांनीं पालि भाषेच्या ज्ञानाचा प्रसार करण्याकरितां किती कष्ट केले हें त्यांचें आत्मचरित्रपर ‘निवेदन’ ज्यांनी वाचलें असेल त्यांना परिचितच असेल. पालि भाषेच्या प्रसाराकरितां त्यांनीं प्रथम कलकत्ता विद्यापीठांत शिकविण्याचें काम पत्करिलें होतें. पण महाराष्ट्रांत ह्या भाषेच्या ज्ञानाचा प्रसार व्हावा ह्या कळकळीनें त्यांनीं तिकडील काम सोडून देऊन इकडे महाराष्ट्रांत येण्याचें ठरविलें. इकडे येऊन डॉ. सर रामकृष्ण भाण्डारकर ह्यांच्या खटपटीमुळें मुंबई  विद्यापीठांत पालि भाषेचा शिरकाव झाला व त्यांनीं पुण्यांत फर्ग्युसन कॉलेजमध्ये पालि भाषा शिकविण्याचा उपक्रम १९१२ साली सुरूं केला. त्यांनी आपलें स्वतंत्र लिखाण मराठीमध्यें केलेलें आहे. व ह्या त्यांच्या उपक्रमास अनुसरूनच धर्मानंद स्मारक ट्रस्टनें त्यांचे ग्रंथ छापून काढण्याचें ठरविलें आहे हेंही स्तुत्यच होय.

हा ग्रंथ तयार करण्याचे कामीं ज्यांची मला मदत झाली त्यांचे त्यांचे आभार मानणें मी आपलें कर्तव्य समजतों. मी १९२४ साली प्रसिद्ध केलेल्या पालि सुत्तनिपाताच्या प्रती उपलब्ध नसल्यामुळें छापखान्याच्या उपयोगाकरितां लागणारी प्रत मिळविणें दुरापास्त झालें होतें. तें काम पं. ना. वि. तुंगार, काव्यतीर्थ, पालितीर्थ ह्यांनीं आपल्या संग्रहीं असलेल्या प्रतींपैकीं एक प्रत उपलब्ध करून दिल्यामुळें सुकर झालें. तसेंच छापखान्याकरितां भाषांतराचें लिखाण तयार करण्याचें काम आमचे माजी विद्यार्थी श्री. ल. पां. सातपुते, एम्. ए. व तें तपासून पाहण्याचें काम श्री. स. त्र्यं. केंघे, एम्. ए. ह्यांनीं केलें. तसेंच आमच्या स्नुषा श्री. सौ. शीला बापट, बी. ए. ह्यांनीं प्रुफें तपासण्याचे कामीं मदत केली. तसेंच ‘ग्रंथ-परिचय’ लिहिण्याचे बाबतींत आमची कन्या श्री. सौ. मालतीबाई (कमला) जोशी बी. ए. ह्यांनीं मदत केली. आमचे फर्ग्युसन कॉलेजांतील चिरकालीन सहाध्यापक प्रा. रं. द. वाडेकर, एम्. ए. ह्यांनीं तर अनेक प्रकारें मदत केली. ह्या सर्वांचे मी मन:पूर्वक आभार मानतों.

ह्या ग्रंथांत मुद्रणदोष बरेच राहिले आहेत ह्याची जाणीव आहे. मुद्रणालयाच्या व्यवस्थापकांच्या मतें ह्यांतील कांहीं दोष जरी टाळतां आले असते, तरी एकदां मशीन चालूं झाल्यानंतर टाईप जेव्हां उडून जागचे ढळतात तेव्हां नाइलाज असतो असें त्यांचें समर्थन आहे, असो. वाचकांनीं शुद्धिपत्रकांत दिलेल्या दुरुस्त्या करून ग्रंथ वाचनास घ्यावा ही विनंति आहे. सहज समजण्याजोग्या दुरुस्त्या दाखविलेल्या नाहींत.

२० जुलै १९५५
पु. वि. बापट


संक्षिप्त अक्षरांचा खुलासा

अ.-- अट्ठकथा (परमत्थजोतिका भाग २).
अनु. – अनुक्रम.
नि. – निद्देस.
भा. – भाषांतर.
म. – मरम्म (ब्रह्मी हस्तलिखितें)
रो. – रोमन ( Anderson and Smith ह्यांनीं संपादिलेला व पालि टेक्स्ट सोसायटीनें छापलेला ग्रंथ).
सि. – सिआम (सयामी छापील ग्रंथ).
सी. – सीहल (सिंहली हस्तलिखितें किंवा छापील ग्रंथ).
Fsb. – फाउसबोलनें संपादिलेला ग्रंथ (पालि टेक्स्ट सोसायटीनें छापलेला)
सूचना – वर ज्या हस्तलिखितांचा उल्लेख केलेला आहे तीं म्हणजे रो. प्रती करितां वापरलेलीं.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel