सूफी संत उमर बगदादमध्‍ये राहत होते. त्‍यांच्‍या ख्‍यातीने प्रभावित होऊन मोठया संख्‍येने लोक त्‍यांच्‍याकडे येत असत. ते सर्वानाच प्रेमाने भेटायचे आणि प्रसन्न व संतुष्‍ट करायचे. एकदा एक भटका माणूस त्‍यांच्‍याकडे भेटण्‍यासाठी आला. जेव्‍हा तो उमर यांच्‍या निवासस्‍थानी पोहोचला तेव्‍हा त्‍याला दिसले की, संत उमर हे एक फकीर म्‍हणवतात पण त्‍यांचे बसायचे आसन हे सोन्‍याचे आहे. खोलीला सगळीकडे जरीचे पडदे लावलेले आहेत आणि रेश्मी दो-यांची सजावट होती. दो-यांच्‍या खालील बाजूस सोन्‍याचे घुंगरू बांधलेले होते. चहुकडे सुगंधी अत्तराचा वास दरवळत होता. थोडक्‍यात काय विलास आणि वैभवाची छाया या फकीराच्‍या घरावर पसरलेली दिसत होती. उमर काही बोलण्‍याच्‍या आधीच हा भटका माणूस त्‍यांना म्‍हणाला,'' मी आपली फकीरी ख्‍याती ऐकून आपल्‍या दर्शनासाठी आलो होतो पण येथे आल्‍यावर माझी निराशा झाली. आपण फकीरी सोडून वैभवाचा सागर पसरलेला दिसून येतो आहे.'' संत उमर हसले आणि म्‍हणाले,''हे मात्र खरे आहे, पण तुझी हरकत नसेल तर हे सर्व सोडून मी तुझ्याबरोबर यावयास तयार आहे.'' भटका तयार होताच, उमर यांनी सर्व सोडून नेसत्‍या कपड्यांनिशी ते भटक्‍याबरोबर निघाले. काही अंतर जाताच भटका एके ठिकाणी थांबला व उमर यांना म्‍हणाला,'' तुम्‍ही इथेच थांबा, मी माझा भिक्षेचा कटोरा तुमच्‍या घरी विसरलो आहे. तेवढा मी परत जाऊन घेऊन येतो.'' उमर मोठमोठ्याने हसू लागले आणि भटका अचंबित झाला. त्‍याला काही कळेना की तो असा काय वेगळे बोलला की उमर एवढे मोठ्याने हसताहेत. मग उमर म्‍हणाले,'' अरे मित्रा, तुझ्या सांगण्‍यावरून मी माझे सर्व ऐश्‍वर्य सोडून या रानावनात हिंडायला तयार झालो मात्र तुझी त्‍या कटो-याची आसक्ती मात्र सुटली नाही. मनात जोपर्यंत मोह आहे तोपर्यंत मनुष्‍य मोठा होत नाही हे मात्र खरे'' भटक्‍याला आपली चूक कळाली व त्‍याने संतांची माफी मागितली.


      विचारतरंग:
बाह्य रूपावरून मूल्यमापन करू नये .संन्यस्त प्रवृत्तीला वृत्तीला महत्त्व आहे.बाह्य वेष फकिराचा असेल किंवा श्रीमंताचा असेल त्याला महत्व नाही.  अंतरंग कसे आहे ते अनुभवावरूनच लक्षात येते. नेहमी आपण शारीरिक सौंदर्य रुबाबदारपणा आणि पोशाख व श्रीमंती यावरून  मूल्यमापन  करीत असतो. एखादा कसा दिसतो याऐवजी तो कसा आहे त्याचे अंतरंग काय आहे यावर याचे मूल्यमापन केले पाहिजे.
         भोजराजाची एक गोष्ट मला आठवते.त्याला भेटण्यासाठी एक विद्वान गृहस्थ आले .त्यांचा पोषाख मळका आणि अत्यंत सामान्य होता .राजाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले.बऱ्याच वेळानंतर त्याने त्या ग्रहस्थाना तुम्ही का आलात म्हणून विचारले .बोलता बोलता राजाला  विद्वत्ता, ज्ञान , समयसूचकता इत्यादी अनेक गुण त्यांच्यामध्ये आढळून आले. राजाने त्यांना भरपूर धन दिले. राजाने त्यांचा आदरसत्कार केला.त्याना आपल्याकडे राहण्याचा आग्रह केला .जेव्हा ते निघाले तेव्हा तो त्यांना पोचवण्यासाठी दरवाजापर्यंत गेला .त्यांना असे का म्हणून विचारल्यावर भोज राजा म्हणाला ,प्रथमदर्शनी बाह्यरूपावरून परीक्षा होते तर काही काळ गेल्यानंतर अंतरंगावरून परीक्षा होते .एखाद्याची  खरी परीक्षा अंतरंग परीक्षा होय .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel