परवा माझा एक मित्र म्हणत होता की त्याला खूप  कंटाळा आला अाहे .कशामध्येही रस वाटत नाही .प्रत्येक मनुष्य नेहमी आपल्याला मानसिक व शारीरिक द्दष्ट्या कश्यात ना कशात सतत गुंतवून ठेवीत असतो. मित्र ,शाळेमधले कॉलेजमधले हॉस्टेलवरचे व्यवसायातील व इतर यांचे  ग्रुप करून, त्याच्यामध्ये आपल्याला गुंतवून ठेवतो .त्या शिवाय स्वतःची पत्नी व मुले वाचन नाटक सिनेमा इत्यादी मध्ये आपला वेळ घालवीत असतो .कधीतरी त्याला या सर्वांचा कंटाळा येतो व मन कुठेतरी दुसरीकडे गुंतवावे असे वाटू लागते.भूतकाळातील निरनिराळ्या प्रकारच्या निरनिराळ्या  कालखंडातील विविध आठवणी ,त्याचप्रमाणे भविष्यकाळातील ,भूतकाळातील   आपल्या अनुभवावर आधारित अश्या विविध योजना ,चिंतन मनन ध्यान धारणा नामस्मरण पूजा इत्यादींमध्ये मनाला गुंतवून ठेवीत असतो .त्याशिवाय व्यवसायातील किंवा नोकरीतील विचारही त्यामध्ये असतात .या शारीरिक व मानसिक गिरक्यामध्ये मनुष्य केव्हातरी दमून थकून जातो .त्याला सगळ्याचा कंटाळा येतो व सर्वच रसहीन वाटू लागते .आता आणखी दुसऱ्या कशामध्ये तरी आपले मन रममावे असे त्याला वाटू लागते .लहान मुलं, तरुण, मध्यम ,वयस्कर ,वृद्ध ,आपापल्या सर्कल प्रमाणे आपले मन गुंतवण्याचे मार्ग शोधीत असतात .केव्हा तरी त्यांना त्या सगळ्याचा कंटाळा येतो व मग ते म्हणतात की आता मी काय करू ?

इथे मला माझ्या एका नातीची गोष्ट आठवते .आम्ही तिला कोकणात घेऊन जात असू. तीही आमच्या बरोबर मोठ्या आवडीने येत असे.ती त्यावेळी दहा बारा वर्षांची असेल. तिला कंटाळा आला की ती जोरात ओरडून म्हणायची की दादाsss कंटाळा आला .हे सर्वांना इतके पाठ झाले की तिने नुस्ती दादा म्हणून हाक मारली, तरी बाकी सर्व कोरसमध्ये ओरडत असत की कंटाळा आला.  यावर एकच हशा पिके व त्यामध्ये तिचा कंटाळा काही वेळ निघून जाई .


    आपल्याला सारखे कशात ना कशात तरी गुंतून का पडावयाचे असते.?आपण रिकामे स्वस्थ का बसू शकत नाही ?समजा आपण एखादा निराळा  दुसरा वेळ घालविण्याचा मार्ग शोधून काढला तरी तिथेही पुन्हा कंटाळा येणार नाही कशावरून ?आपण घरच्या नेहमीच्याच जेवणाला काही वेळा कंटाळतो व मग  रुचीपालट म्हणून हॉटेलात जेवावयास जातो .नंतर हॉटेल्स बदलत रहातो!मनाचे असेच आहे. त्याला नेहमीच एकाच गोष्टीचा कंटाळा येतो .मग ते दुसरा मार्ग शोधू लागते.कंटाळा का येतो ?कितीही ठिकाणी मन गुंतवण्याचा प्रयत्न केला तरी काही काळाने पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी मनाची  स्थिती होते.


काही केले तरी कंटाळा का येतो हे जर आपल्याला समजून घ्यायचे असेल , एखादी गोष्ट समजून घ्यावयाची असेल ,तर त्या गोष्टींमध्ये आपण राहिले पाहिजे तरच ती आपल्याला समजू शकेल .त्यापासून दूर पळून ती कशी समजेल ?त्या प्रमाणेच कंटाळा म्हणजे काय हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल , तो का येतो हे जर समजून घ्यायचे असेल, तर कंटाळ्यापासून दूर न पळता आपण त्याचा स्वीकार   करून त्यामध्ये राहिले पाहिजे जर आपण त्यांच्या सोबत राहिलो तरच आपल्याला तो यथार्थतेने समजू शकेल .एकदा तुम्ही त्यांच्यासोबत राहण्याला सुरुवात केली की मग सर्व काही एकदम सोपे होईल .हळूहळू मी म्हणजेच कंटाळा सुखदुःख लोभ क्रोध मोह मत्सर द्वेष इत्यादी आहे हे लक्षात येईल.मग सर्व काही सोपे होईल कंटाळा किंवा इतर भावना त्याच राहणार नाहीत. मग काय होते हे ज्याने त्याने त्यामध्ये राहूनच अनुभवण्याची गोष्ट आहे .
११/६/२०१८   ©प्रभाकर  पटवर्धन 
 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel