एक छोटेसे गाव होते .त्या गावात अनेक शेतकरी कुटुंबे राहात असत .काही मेंढपाळाची ही घरे होती .शेतकरी आपापल्या शेतात निरनिराळी धान्ये भाजीपाला वगैरे पिकवीत असत .त्यातील काही धान्य भाजीपाला वगैरे विकून जो पैसा मिळे त्यातून ते आपल्याला हव्या असलेल्या जीवनावश्यक  वस्तू विकत घेत असत.ती सर्व कुटुंबे सुखी समाधानी होती .मेंढपाळ शेळ्या मेंढ्या चरविण्यासाठी रानात जात असत.शेतकर्‍यांची गुरे त्यांच्याबरोबर चरण्यासाठी जात असत.सर्वजण आपल्या छोट्याश्या घरात उत्पन्नात जागेत समाधानी होते .
                  मेंढपाळामध्ये कान्हा नावाचा एक मेंढपाळ होता.मेंढ्या गुरे चरत असताना तो दगडावर बसून आपली मुरली वाजवीत असे.हिरवी वनराई मेंढ्या  निसर्ग यांमध्ये तो रममाण होत असे. त्याच्या मुरलीचे सूर सर्वत्र आणखी प्रसन्नता आणित असत .
                  एक दिवस त्याला एका झुडपामागे एक चेंडू दिसला .हा चेंडू पारदर्शक व स्वयंप्रकाशी होता .त्याला कुतुहूल निर्माण झाले .त्याने तो चेंडू उचलला .त्यामधून अस्पष्ट असा आवाज आला.तू माझ्या जवळ हवे ते माग मी ते देण्याला समर्थ आहे .कान्हाने विचार केला की आपल्याला काय पाहिजे ?म्हणजे आपल्याला आनंद होईल .तो  सुखी समाधानी आनंदी होता .आणखी काही मिळाल्यावर आपल्या आनंदात भर पडेल असे त्याला वाटेना .त्याने तो चेंडू आपल्या खिशात ठेवून दिला .रोज तो चेंडू त्याला तू काय हवे ते माग असे म्हणे.काय मागावे ते त्याला समजत नसे.आणखी काही हवे असे त्याला वाटत नसे .तो जिथे जसा आहे तसा सुखी समाधानी व आनंदी होता .असे अनेक दिवस गेले .एक दिवस एका गावकऱ्याने तो चेंडू बोलत असताना त्याचे बोलणे ऐकले .गावकऱ्यांनी तो चेंडू कान्हाजवळ मागितला.कान्हाने लगेच तो चेंडू गावकऱ्यांना दिला .
                   त्या चेंडूजवळ काहीतरी मागण्याची गावकऱ्यांमध्ये अहमहिका लागली.कुणी मोठी घरे मागितली. कुणी राजवाडा मागितला .कुणी पुष्कळ घोडे, कुणी गुरेढोरे,कुणी खूप जमीन ,कुणी सोने, कुणी जवाहीर,कुणी दासदासी अशा अनेक गोष्टी मागितल्या .त्या जादूच्या चेंडूने ज्याला जे हवे असेल ते मागितल्याप्रमाणे दिले .काही दिवस सर्व आपल्याला जे हवे ते  मिळाल्यामुळे समाधानी होते.काही दिवस गेल्यावर प्रत्येकाला आपल्या जवळ जे नाही ते हवे असे वाटू लागले .आपल्याजवळ असलेल्या वस्तू देऊन दुसऱ्या वस्तू मिळविण्याचा त्यांनी प्रयत्न केला .परंतु त्यांना त्यांच्याजवळ जे होते ते  पाहिजेच होते आणि त्याशिवाय दुसऱ्यांजवळ जे होते  तेही पाहिजे होते.
                   अशा प्रकारे प्रत्येक जण जो पूर्वी आहे त्यात समाधानी होता तो आता असमाधानी झाला .प्रत्येकाला आपण पूर्वी जसे होतो तेच छान होते असे वाटत होते .सर्वजण कान्हाकडे गेले.त्यांनी कान्हाला आम्हाला पूर्वीसारखेच व्हायचे आहे असे सांगितले .तो चेंडू अजूनही कान्हाच्या खिशातच होता .त्याने त्याच्या जवळ अजूनही काही मागितले नव्हते. दुसऱया दिवशी रानात गेल्यावर त्याने पहिल्यांदाच चेंडूकडे काही मागितले. "गावातील सर्वजण पूर्वी जसे होते तसे होऊ देत "अशी मागणी त्याने केली .सर्व मिळालेल्या गोष्टी राजवाडा सोने जवाहिर घोडे गुरे ढोरे इ.क्षणार्धात नाहीश्या झाल्या .सर्वजण पूर्वी जसे होते तसे झाले .सर्वजण पूर्वीसारखे सुखी समाधानी आनंदी झाले .कान्हाने तो चेंडू दूर तळ्यामध्ये भिरकावून दिला .
* तात्पर्य: ज्याने त्याने जे काही आहे त्यात सुखी समाधानी असावे .सुख मानण्यांमध्ये आहे वस्तूंमध्ये नाही. *
                 ही बोधकथा अनेक वेळा मुलांना सांगितली जाते .मोठ्यांनाही सांगितली जाते._जे आहे त्यात सुखी समाधानी असा .जास्त कशाची हाव करू नका ._हा सुखाचा मूलमंत्र सांगितला जातो .
                विचार करा हे सर्व मनुष्यांच्या स्वभावाला धरून आहे का ?त्या तथाकथित आदर्श गावातील लोक खरेच सुखी समाधानी होते का ?जर असते तर त्यांनी त्या चेंडू जवळ निरनिराळ्या गोष्टी कशाला मागितल्या असत्या ?त्यांनी जेव्हा जेव्हा अनेक गोष्टी पाहिल्या होत्या उदाहरणार्थ गुरेढोरे सोनेनाणे जवाहीर राजवाडा दासदासी इत्यादी . त्या त्या वेळी त्यांना मनात कुठेतरी या गोष्टी आपल्याला हव्यात अशी इच्छा निर्माण झाली होती .त्या आपल्याला कधीच मिळू शकणार नाहीत हे माहित असल्यामुळे ते आहेत त्यात समाधानी वाटत होते .परंतु अंतर्यामी कुठेतरी ते असमाधानी दुःखी होते .चेंडूच्या रूपाने त्यांना संधी मिळताच हव्या असलेल्या अनेक सर्व गोष्टी त्यांनी भराभर मागितल्या .
                ज्या गोष्टी मिळाल्यामुळे आपण सुखी होऊ असे त्यांना वाटत होते त्यातून ते सुखी झाले नाहीत .उलट त्यांच्या असमाधानामध्ये वाढ झाली.म्हणून त्यांनी पूर्वीची स्थिती मागितली .
                दुःख वस्तू आपल्याजवळ नाहीत यांचे नसून त्यामुळे आपण ढवळले जातो.अस्वस्थ होतो याचे असते.
                पूर्वीच्या स्थितीमध्ये ते गावकरी असमाधानी होते परंतु त्यांचे असमाधान सुप्त होते.त्यामुळे ते फारसे  ढवळले जात नव्हते.
                नवीन स्थितीमध्ये त्यांनी मागितलेल्या सर्व गोष्टी मिळाल्यानंतर ते काही दिवसांनी जास्त अस्वस्थ जास्त ढवळले गेले .त्यामुळे त्यांना परत पूर्वीच्या स्थितीला जायचे होते .
                आहे त्यात समाधान माना असा जर मूलमंत्र आहे असे म्हटले .तर नवीन स्थितीमध्येही ते सर्व समाधानी असणे आवश्यक होते .त्यासाठी पूर्वस्थितीला जाण्याची काही गरज नव्हती .
                समाधान किंवा असमाधान वस्तूंमध्ये नसते ते अंतरंगामध्ये असते.
                 मनामध्ये सदैव निरनिराळे तरंग उठत असतात.मनामध्ये तरंग उठतात या ऐवजी हे सर्व तरंग म्हणजेच मन होय ही वस्तुस्थिती आहे .
                  आहे त्यात समाधान माना ही मनाने आपली घातलेली समजूत आहे. कारण त्याला जे हवे ते मिळणार नाही याची त्याला खात्री आहे .
                  आहे त्यात समाधान माना हा सुखाचा मूलमंत्र आहे असे मला वाटत नाही .ही दुर्बळाने केलेली तडजोड आहे .ही मनाने मनाची घातलेली समजूत आहे .
                  आपण असमाधानी का आहोत? आपण अस्वस्थ का आहोत? आपण ढवळले का जातो ?याचा तपास मनाने मनाशी करणे आवश्यक आहे .आपल्याजवळ मना शिवाय दुसरे काही साधन नाही .मनाचाच एक भाग वेगळा होऊन त्याने उरलेल्या मनातील तरंगांवर विचारांवर लक्ष ठेवले पाहिजे .हे सर्व आपोआप झाले पाहिजे .जर मनाच्या व्यापाराबद्दल योग्य समज मनाला येईल तर हे सर्व आपोआपच होईल .
                  आपण चवीने अंबानी टाटा बिर्ला अशा श्रीमंतांच्या निरनिराळ्या गोष्टी का वाचतो?पहातो?सिनेकलावंतांचे रंगढंग श्रीमंती विलास या गोष्टी आपण चवीने का वाचतो ?पहातो?राजकीय पुढार्‍यांच्या निरनिराळ्या गोष्टी आपण का वाचतो? पाहतो? ऐकतो ?
वेळ घालविणे हा एक उद्देश त्यामागे निश्चितच असतो .परंतु आपल्याला जे व्हावे असे वाटते, जे करावे असे वाटते, जे असावे असे वाटते ,ते सर्व आपण अशा वाचनातून दर्शनातून मिळवीत तर नाही ना?याचा विचार प्रत्येकाने अंतर्मुख होऊन प्रामाणिकपणे केला पाहिजे .
मन आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी कश्या निरनिराळ्या मार्गाने मिळवू पाहते ते यातून स्पष्ट होईल .
सत्ता संपत्ती सामर्थ्य विलास रंगढंग या सर्वांचे आपल्याला आकर्षण असते .आणि आपण अशा मार्गांनी ते मिळवित तर नाही ना ?दुधाची तहान ताकावर भागवीत नाही ना?विचार करा .
विचार करून पाहा ?
मनाचे मार्ग अगम्य,चटकन न कळणारे,वक्र ,असतात .
आहे त्यात सुख समाधान मानावे का? आपण मानतो का? विचार करावा .त्यामुळे आपण खरेच समाधानी आनंदी असू का ?

*आपला कान्हा खऱ्या अर्थाने समाधानी होता.तो आहे त्यात समाधान मानत नव्हता तर तो समाधानातच तरंगत होता*
*त्यामुळे तर त्याला आपण काय मागावे ते कळत नव्हते .  रोज चेंडू त्याला टोचीत असे .आणि त्याला आपल्या समाधानात काही कमतरता आहे असे वाटत नसे *.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel