मनाचे दोन भाग असतात असे बरेच जण म्हणतात .सुप्त मन व प्रगट मन .मन जर एक डोह आहे असे कल्पिले तर त्या डोहाच्या वरच्या थरांमध्ये जे मन असते ते प्रगट मन असे म्हटले जाते .आपले नेहमींचे विचार या प्रगट मनात चाललेले असतात .अनेक वेळा सुप्त मन प्रगट मनाला सूचना देत असते . परंतु प्रगट  मन त्याकडे दुर्लक्ष करते तर काही वेळा त्यातून आपल्याला सोयीस्कर असा अर्थ काढला जातो .यातून येणाऱ्या सूचनांना आतला आवाज असे बरेचदा संबोधले जाते.सुप्त मनात येणाऱ्या सूचना जर आपण लक्ष्यपूर्वक ऐकिल्या आणि त्या अंमलात आणल्या तर आपले हित होइल असेही म्हटले जाते .सुप्त मन कधीही चुकीचा सल्ला देत नाही असाही एक समज आहे . 
या विचारांशी मी सहमत नाही सुप्त मन प्रगट मन असे दोन विभाग आहेत असे मला वाटत नाही .त्या दोहोंमधील सीमा रेषा काढता येणार नाही .मन एकच आहे व ते विचार करत असते असे मला वाटते .भूतकाळातील अनेक प्रसंग आपल्या मनात खोलवर गाडलेले असतात त्यांची आपल्याला  नेहमीच्या व्यवहारात कल्पनाही नसते . प्रसंगाने ते वर येतात.आणि त्या वेळेला आपल्याला त्याची जाणीव होते.नेहमीच्या व्यवहारातील गोष्टीही खोल डोहात अदृश्य होतात व त्यांची आपल्याला कल्पनाही नसते .आणि प्रसंगाने त्या वर येतात .मन एकच असते आणि ते लहानपणापासूनच्या विविध संस्कारांनी भारित असते .मनाचे अस्तित्व आपल्याला विचार निर्माण झाल्याशिवाय जाणवत नाही.किंबहुना निरनिराळे विचार म्हणजे मन होय .हे विचार आपल्या संस्कारांवर म्हणजेच धारणेवर अवलंबून असतात  .एकाच कुटुंबात एकाच परिस्थितीत दोन भाऊ किंवा बहिण यांमध्ये विचारात स्वभावात फार अंतर असते असे का ?मित्र मैत्रिणी शाळा वाचन यांमध्ये फरक काही ना काही असतोच असे एक कारण देता येईल .काही फरक पूर्वजांकडून आलेल्या विविध जिन्स मधील फरकामुळे कदाचित असू शकेल .काही फरक मेंदूमधील असलेल्या निरनिराळया  केमिस्ट्रीमुळे कदाचित असू शकेल .जर पुनर्जन्म मान्य केला तर प्रत्येक जण काही ना काही संचित घेऊन जन्माला येतो आणि त्यामुळे फरक असतो असेहि म्हणता येईल .
धारणेमध्ये फरक का असतो हा चर्चेचा विषय नाही तर धारणा असते आणि त्यामध्ये फरक असतोआणि म्हणून विचारांमध्येही फरक असतो .विचारांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असते.भूतकाळातील घटनांबद्दल विचार मनात रेंगाळत असतात .चालू क्षण हा पुढच्या क्षणी भूतकाळात जमा होतो .येणारा क्षण हा भविष्यकाळात असतो .आपण एक भूतकाळात तरी असतो किंवा भविष्यकाळात तरी असतो .वर्तमान काळ जी दोन क्षणामधील फटआहे त्यामध्ये आपण कधीही नसतो .भूतकाळात ,भूतकाळावर आधारित भविष्य काळात ,अापण नेहमी असतो . अशा प्रकारे भूतकाळातून भविष्यकाळाकडे व भविष्यकाळातून भूतकाळाकडे आपला प्रवास चालू असतो.दोन क्षण दोन विचारांमध्ये जी फट असते ती कालातीत असते असे काही जणांचे म्हणणे आहे .निवडशून्य  जागृततेतून त्या काळातीत वस्तूचा आपल्याला साक्षात्कार होईल  असेहि काही जणांचे म्हणणे आहे .

२७/७/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel