एकदा एक संत देवाबरोबर बोलत होता.

त्याने देवाला स्वर्ग आणि नरक मधला फरक विचारला.

"ये तुला प्रत्यक्ष दाखवतो."
देव म्हणाला.

त्याने संताला दोन दरवाजांजवळ नेलं.

त्याने पहिला दरवाजा ढकलला.एका मोठ्या खोलीत प्रवेश केला.

एका मोठ्या गोल टेबलाभोवती अनेक माणसे बसली होती.

टेबलाच्या मध्यावर रुचकर खिरीने भरलेले मोठे भांडे ठेवलेलं होतं.

त्या खिरीच्या सुगंधाने त्या संत माणसाच्या तोंडाला देखील पाणी सुटलं होतं.

पण मग त्याच्या लक्षात आलं की ती माणसे उपाशी भुकेलेली दिसत होती.
त्यांच्या हाताला लांब दांड्यांचे चमचे बांधलेले होते.

त्यांना हात लांब करून खीर खाता येत नव्हती.

कारण चमच्याचा दांडा हातापेक्षा लांब होता

त्यांच्या यातनांना अंत नव्हता.

भुकेच्या भरीला खिरीच्या सुवासाने त्यांना वेड लावले होते.

"हा नरक आहे..."देव म्हणाला.

"चल आता स्वर्ग पाहू.

"ते दुस-या दारातून आत आले.

ती खोली सुद्धा हुबेहूब पहिल्या खोली सारखीच होती.

तेच टेबल तेच खिरीचं भांडं.

भोवताली माणसं आणि हाताला बांधलेले चमचे.

पण ही सगळी माणसे तृप्त
समाधानी व आनंदी दिसत होती.

आपापसात हसत आनंदाने राहत होती.

"मला कळत नाहीये"
संत म्हणाला,"सारख्याच खोल्या,टेबल,भांडी,खीर आणि तेच लांब दांड्यांचे चमचे,मग ही माणसे खाऊन तृप्त आणि ती उपाशी आणि दु:खी का??

"सोपं आहे..."देव म्हणाला
"या खोलीतील माणसे एकमेकांना भरवायला शिकली आहेत.

हावरट मनुष्य फक्त स्वत:चा विचार करतो"

गोष्ट संपली.........

*जेव्हा तुम्ही दुस-याला त्यांची इच्छा पूर्ण करायला मदत कराल तेव्हा आपोआपच तुमची स्वप्ने सुद्धा पूर्ण होतील*

*स्वत:च्या गरजांपेक्षा इतरांच्या इच्छा व आवश्यकतांना अधिक मान किंवा प्राधान्यक्रम देणे हे समूह यशाचे गुपित आहे.*

*यात आनंदाची बातमी अशी की हा स्वर्ग किंवा नरक निर्माण करणे आपल्याच हातात असते.*

खोली,खीर,टेबल आणि चमचा..

सगळ्यांना समान संधी मिळते.
सर्वांना मदत करा.

मग बघा आपल्या जीवनातील अंतरंग कसे खुलतात ते...

असे आपण वागा म्हणून सांगितले तर त्याप्रमाणे आपण वागू शकू का ?
सर्व मानव समान आहेत .आपण मान डोलावतो परंतु त्याप्रमाणे आपले वर्तन आहे का? 
असे आचरण करावे असे म्हणून तसे आचरण होणार नाही .
जर आपल्यामध्ये मूलभूत बदल व्हावा अशी इच्छा असेल तर आपण असे का वागतो ते  समजून घेतले तरच योग्य तो बदल कदाचित अस्तित्वात येईल.
जर अंतर्यामी बदल झाला तर बाह्य बद्दल अस्तित्वात येईल .

आपण विशिष्ट प्रकारे विचार करतो कारण त्या पाठीमागे आपला संस्कार संग्रह असतो.संस्कार लहानपणापासूनच्या सभोवतालच्या  परिस्थितीवर अवलंबून असतात. घर,जात,धर्म,  शेजार ,मित्र, शाळा,समाज माध्यमे(नाटक सिनेमा वर्तमानपत्रे टीव्ही रेडिओ पुस्तके इ.)या सर्व संस्कारांमधून योग्य अयोग्य चांगले वाईट यांच्या काही निश्चित कल्पना निर्माण होतात .त्यामुळे काय असावे व काय नसावे या बद्दलही आग्रही कल्पना निर्माण होतात.  आपल्याला जे हवे असे वाटते त्याप्रमाणे झाले तर आनंद निर्माण होतो .अन्यथा दुःख निर्माण होते .

एकच घटना काही जणांना आनंद निर्माण करील तर तीच घटना काही जणांना दुःख देण्यास कारणीभूत होईल .उदाहरणात जो जात धर्म पाळत नाही त्याला आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह झाल्यास आनंद वाटेल .जो जात पोटजात धर्म यांचा कट्टर पुरस्कर्ता आहे त्याला अशा गोष्टींमुळे संताप चीड दुःख होईल .घटना घडत असतात . आपल्या धारणेप्रमाणे(समग्र संस्कार संग्रह ) त्यातून दुःख किंवा सुख प्राप्त होते .दुसरे आपल्याला सुख किंवा दुःख देत नसून आपणच आपल्या मानसिक सुख दुःखाला कारणीभूत असतो .

धारणा कशी असावी ते आपल्या हातात नाही .
त्यामुळे विचार कसा असावा तेही आपल्या हातात नाही .
त्यामुळे कृती कशी असावी तेही आपल्या हातात नाही .जे आहे व जे होत आहे ते सर्व अपरिहार्य आहे .
अापण बोलत नसून आपले संस्कार बोलत असतात .
हे सातत्यपूर्ण निवडशून्य जागृतीतून लक्षात येइल .
असे होईल त्यावेळी योग्य विचार व योग्य कृती स्वाभाविकच आपोआप निर्माण होईल .

वरील बोधकथेच्या भाषेत बोलावयाचे झाल्यास अापण हाताला बांधलेल्या चमच्यांचा उपयोग परस्परांना खीर पाजण्यासाठी न करता परस्परांना मारण्यासाठी करीत आहोत.

जेव्हा स्वसमजातून अंतरंग सुधारेल तेव्हाच बाह्य कृती योग्य होईल .

आपल्या बाह्य कृती अगोदर मानसिक कृती असते .जर आपले आपल्या मनावर लक्ष असेल  तर आपण असे का वागतो ते आपल्याला सतत समजत जाईल .आपण व मन यांमध्ये काही फरक नाही .मन म्हणजेच विचार .आपण म्हणजेच मनाचाच एक भाग जेव्हा मनावर लक्ष ठेवीत राहिल त्यावेळी आपल्या मनाचे निरनिराळे पदर उलगडत जातील .अशा सातत्यपूर्ण  जागृततेतून आपली धारणा वितळत जाईल .योग्य मानसिक कृती अस्तित्वात येइल .नंतर बाह्य योग्य कृती होईल .

वर म्हटल्याप्रमाणे चमच्यांचा उपयोग न करता किंवा  एकमेकांना मारण्यासाठी न करता भरवण्यासाठी केला जाईल.
स्वर्ग नरक इथेच आहे .

जे आहे त्याचा स्वर्ग करायचा की नरक करायचा ते आपल्यावर अवलंबून आहे .

२७/१२/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com                     

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel