नार्सिसस ही ग्रीक पुराणातील एक व्यक्तीरेखा आहे .नार्सिससची गोष्ट पुढील प्रमाणे,( लहानपणी वाचलेली) आठवते .या नावाचा एक मुलगा होता. तो फार देखणा व सुंदर होता .तरुणपणी तर तो फारच देखणा दिसत असे.अर्थातच् त्याला आपल्या रूपाचा फार गर्व होता .एके दिवशी अरण्यात फिरत असताना त्याला एक देवता भेटली.आपल्या रूपामुळे तो फार गर्विष्ठ झाला होता . तो पाण्यात आपले रूप न्यहाळत होता .त्याने त्या देवतेकडे दुर्लक्ष केलॆ .ते पाहून देवता रागावली .तिने त्याला शाप दिला कि ज्या रूपाचा तुला एवढा गर्व आहे, जी प्रतिमा पहाताना तुझे माझ्याकडे दुर्लक्ष झाले  ,ती न्यहाळताना तुला मृत्यू येईल .तेव्हापासून त्याने आरशात किंवा पाण्यात आपले प्रतिबिंब पाहणे सोडून दिले .एके दिवशी अरण्यात फिरत असताना त्याला खूप तहान लागली.  पाणी पिण्यासाठी तो एका तलावाच्या काठी गेला .तिथे आपले रूप बरेच वर्षांनी पाहून तो मोहित झाला .त्या रूपाकडे पाहताना तो खाणे पिणे व देहभान विसरला .व त्यातच त्यांचा अन्न पाण्याशिवाय मृत्यू झाला  .
    हल्ली फेसबुक व्हॉट्सअॅप आणि इतर ठिकाणी आपला प्रोफाईल डीपी  कव्हर फोटो वगैरे वारंवार बदलला जातो .सेल्फी काढण्याचे वेड इतके पराकोटीला गेलेले आहे की सेल्फी काढताना आत्तापर्यंत पाण्यात पडून किंवा दरीत कोसळून किंवा अन्य अपघात होऊन कित्येक मृत्यू झालेले आहेत .त्याचप्रमाणे आपले फोटो जेव्हा तेव्हा भरमसाट प्रमाणात  काढून ते फेसबुकवर किंवा इतरत्र टाकण्याचे प्रमाणही अतिशय वाढलेले आढळून येते.इतकेच नव्हे तर मी कुठे आहे ,काय करीत आहे ,कुठून कुठे जात आहे ,इत्यादी गोष्टीही मोठ्या प्रमाणात अनेक जणांकडून फेसबुकवर टाकल्या जातात .अर्थात त्यामुळे कोण कुठे आहे व काय करीत आहे हे प्रियजनांना व इतरांनाही कळते.!हा भाग वेगळा .
   हे वेड इतके का वाढले आहे असा विचार सहज मनात आला आणि मला सुरुवातीला सांगितलेली नार्सिससची गोष्ट आठवली.याला मानसशास्त्रीय कारण आहे .हे स्व-प्रतिमा वेड आहे. त्याला मानसशास्त्रज्ञ नार्सिसिझम असे म्हणतात.(नार्सिसस या नावावरूनच हा शब्द आला आहे ) .हे प्रतिमा वेड प्रत्येकांमध्ये कमी जास्त प्रमाणात असतेच .ही प्रतिमा फक्त बाह्य सौंदर्याची नसते तर एकूणच आपण इतरांहून निराळे व चांगले आहोत अशी  प्रत्येकाची खात्री असते .बुद्धी ,विचारधन, सामाजिक जाणीव ,वक्तृत्व ,राजमान्यता ,अभिनय- कौशल्य, संशोधन, काव्य,लेखन कौशल्य, शक्ती ,राजकारण ,राजकीय परिपक्वता, लोकांचा पाठिंबा, प्रेमळपणा, मृदुता, अध्यात्मातील प्रगती,बळकटपणा अगदी गुंडगिरीही, धूर्तपणा ,कावेबाजपणा, कुठच्या ना कुठच्या क्षेत्रात आपण वेगळे आहोत निराळे आहोत, आपली प्रतिमा श्रेष्ठ आहे ,अशी प्रत्येकाची कल्पना असते .म्हणजेच आपल्या प्रतिमेच्या प्रेमात, मोहात ,प्रत्येकजण पडलेला असतो .हा प्रतिमा- मोह एका विशिष्ट मर्यादेपर्यंत असेल तर ते वेड होत नाही. परंतु ही मर्यादा केव्हा ओलांडली जाईल याचा नेम नसतो.गमतीची गोष्ट म्हणजे नार्सिससिस्टला आपण नार्सससिस्ट आहोत, असे कधीही वाटत नाही .एक प्रकारे आपल्या प्रत्येकामध्ये एक नार्सिसस लपलेला असतो असे म्हणता येईल .या लिहण्याचा अर्थ अापण आपल्या प्रतिमेच्या प्रेमात पडावे किंवा पडू नये असा नाही .फक्त आपण नार्सिसस आहोत हे लक्षात नसले तर यावे एवढाच आहे .आपल्या अहंकाराचा तो एक नैसर्गिक आविष्कार आहे असेही म्हणता येईल.आपण किती टक्के नार्सिसस आहोत हे ज्याने त्याने शोधून काढावयाचे आहे .(सहज गुगलवर नार्सिससचा आवांका शोधताना असे लक्षात आले की  आपल्या देशात एक दशलक्ष लोकांमागे एक नार्सिसचा शिकार असतो. हा विकार चांचण्यामधून नव्हे तर अनुभवातून शोधावा लागतो .त्यावर औषधे आहेत परंतु तो पूर्णपणे कधीही मरेपर्यंत बरा होत नाही .हल्ली हे प्रमाण बरेच ?वाढलेले असावे असा माझा अंदाज आहे !!!)
   २३/६/२०१८ प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel