ज्ञात म्हणजे जे आपल्याला माहित आहे ते .अज्ञात म्हणजे जे अापल्याला माहीत नाही ते.


ज्ञात शब्द एखाद्या व्यक्तीला जे माहित आहे ते, अश्या अर्थी वापरला आहे .अज्ञात शब्दही त्याच अर्थी वापरला आहे . निरनिराळ्या व्यक्तींना माहीत असलेल्या गोष्टी निरनिराळ्या असतील .त्या त्या व्यक्तीचे ते ते ज्ञात होय .व्यक्ती त्यांच्या दृष्टीने, जे अज्ञात आहे, व जे ज्ञात व्हावे असे वाटते ,ते माहीत करून घेण्याचा प्रयत्न करते .ज्याला आपण ज्ञान म्हणून म्हणतो ते अक्षरश:अमर्याद  आहे .व्यक्ती ज्ञानाच्या एखाद्या शाखेत प्रवीण होते आणि आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढवण्याचा प्रयत्न करते .एखादी व्यक्ती कुठल्याच क्षेत्रात विशेष प्रगती करीत नाही . कोणाही व्यक्तीच्या बाबतीत ज्ञात कमी व अज्ञात अमर्याद असते .


इथून पुढे अज्ञात हा शब्द वेगळ्या अर्थाने वेगळ्या संदर्भात वापरीत आहे .प्रत्येक व्यक्तीचा मूलत: प्रयत्न कशासाठी असतो ?समाधान, आनंद,शांती ,यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्नशील असते .या बाबतीत दुमत होण्याचे कारणनाही.शिक्षण,सत्ता,संपत्ती,प्रेम किंवा आणखी काही, यातील एक किंवा अनेक  मिळाली की  समाधान मिळेल असे वाटत असते .व्यक्तिपरत्वे समाधान आनंद कशात मिळेल ,या गोष्टी निरनिराळ्या असतील .यांच्या प्राप्तीमुळे मनुष्य जर सुखी झाला असता ,तर प्रश्नच नव्हता .परंतु प्रत्येकाच्या प्रवृत्तीनुसार आणखी शिक्षण(नेहमींच्याअर्थाने ज्ञान)आणखी सत्ता ,आणखी संपत्ती ,आणखी आणखी काही, अशी वाटचाल सुरू असते .हे आणखी आणखी कधीही संपत नाही .यातील एक किंवा अनेक कितीही मिळाले तरी शेवटी आपण अंतर्यामी असमाधानी आहोत,असे प्रत्येकाच्या लक्षात येते .अश्या वेळी मनुष्य एक सोडून दुसरे काही मिळवण्याचा प्रयत्न करतो. शारीरिक पीडा , सामाजिक पीडा ,राजकीय पीडा,किंवा अन्य कोणती पीडा ,काही वेळा कोणतीही पीडा नसते . फक्त मनुष्य भीतीग्रस्त असतो .आहे हे वैभव सुख शांती समाधान संपत्ती इत्यादी जाऊ नये, ती जाईल की काय अशी भीती असते . याला आशंका पीडा असे म्हणता येईल . त्याला सातत्य स्थैर्य हवे असते .जे चांगले आहे ते तसेच टिकून  राहावे व वृद्धिंगत व्हावे ,असे त्याला वाटते.हा मनाचा डोलारा दोन गोष्टींवर अवलंबून असतो . आणखी- आणखी, सातत्य व स्थैर्य .या सर्वामुळे  मानसिक असमाधान अशांती दुःख असते .आहे ते हरवेल कि काय अशी भीती असते ,ही सर्व मानसिक पीडा होय .मानसिक पीडे व्यतिरिक्त अन्य पीडा, त्यावरचे जे उपाय असतील त्यांनी बहुधा दूर करता येतील .निदान कमी करता येतील. भौतिक शास्त्रांची प्रगती व सामाजिक राजकीय रचना यावर ते अवलंबून राहील . माझा रोख मानसिक दुःख ,पीडा ,अशांती, असमाधान ,याबद्दल आहे .प्रत्येक व्यक्ती लहानपणापासून कोणत्या ना कोणत्या  संस्कारात वाढलेली असते.हे संस्कार ,कौटुंबिक, सामाजिक परिस्थितीनुसार व काही स्वयंभू स्वरूपाचे असतात . शांती समाधान इ. मिळवण्यासाठी;  प्रत्येकाच्या जाती उपजाती धर्म प्रदेश कालखंड  याप्रमाणे, हे संस्कार काही उपाय सुचवितात .व्यक्ती त्याप्रमाणे उपाय करू लागते .यामध्ये उपासतापास भजन पूजन नामस्मरण वाचन दर्शन समर्पण इत्यादी अनेक उपाय असतात.यामुळे मिळणारे आंतरिक समाधान क्षणभंगुर आहे, असे हळूहळू लक्षात येऊ लागते. काही काळ बरा जातो, परंतु नंतर पुन: आपण जिथे होतो तिथेच आहोत,मनाची चलबिचल अशांती असमाधान कमी झालेले नाही ,असे लक्षात येऊ लागते.स्वाभाविक मनुष्य आणखी काही उपायांचा विचार करू लागतो . चिरंतन सुख, आनंद ,समाधान, मिळविण्यासाठी , एका अढळ स्थानाच्या प्राप्तीसाठी ,अनादि अनंत  निराकार अश्या परमेश्वराची, भेट झाली पाहिजे, असे त्याला आतून उत्कटतेने वाटू लागते .परमेश्वर असा असाआहे असे अनेक धर्मग्रंथ व त्यावरील टीका सांगतात.या ठिकाणी ज्ञातातून अज्ञाताचा शोध सुरू होतो .नेहमी ज्ञातातून अज्ञात सापडते तसेच इथे सापडेल असे वाटत असते .अनादि अनंत निराकार याचा खरा अर्थ ,आदि अंत साकार अशा  ज्ञातातून समजणे शक्य नाही .त्यासाठी ज्ञाताचा शोध घेतला पाहिजे .ज्ञाताचा शोध म्हणजे मनाचा शोध होय .मनाचा शोध मनानेच घेतला पाहिजे . याशिवाय आपल्याजवळ दुसरे काही साधन नाही.हा शोध मनाचे निरीक्षण मनाच्याच एका भागाने अलिप्तपणे केल्याशिवाय शक्य होणार नाही .हा शोध सुरू असताना आपले संस्कार बोलत आहेत, हे लक्षात येउ लागते.हळूहळू इतरांचेही संस्कार त्यांच्या त्यांच्या बोलण्यातून व हालचालीतून प्रगट होत आहेत ,असे लक्षात येते .हे सर्व अपरिहार्य आहे हेही लक्षात येते.मनुष्य मी करतो मी करतो असे म्हणत असतो परंतू बोलविता धनी(संस्कार संग्रह ) वेगळाच असतो असे लक्षात येते. ज्यावेळी अलिप्तता नसेल तेव्हा आपण मनाबरोबर वहात जातो.क्षणार्धात आपण मनाबरोबर वहात आहोत हे लक्षात येते.आणि लगेच आपोआप साक्षित्व येते . आपले मन किती परस्परविरुद्ध गोष्टींनी भरलेले आहे हे लक्षात येऊ लागते.

मी ची ओळख नव्याने होऊ लागते.आपण स्वत:ला नेहमी योग्य बरोबर चांगले वगैरे समजत असतो .आपण तसे नाही हे लक्षात येऊ लागते .आग्रह अट्टाहास अहंकार मीपणा हळूहळू कमी होत जातो.मनाचा खळखळाट  कमी होतो,आंतरिक शांती समाधान आनंद जाणवू लागतो .केव्हां तरी मन स्तब्ध होते .मनाची स्तब्धता म्हणजेच मनाचा तात्पुरता लय होय. अश्या वेळी अकस्मात अगोदर सूचना दिल्याशिवाय ते अनंत ,निराकार ,अज्ञात, प्रगट होईल .ज्ञातातून अज्ञात समजणार नाही .त्याचा शोधही लागू शकणार नाही .ज्ञात जेव्हा स्तब्ध होईल तेव्हा आपोआपच अज्ञात  प्रगटेल .तुम्ही अज्ञाताकडे जाऊ शकत नाही, ते तुमच्याकडे आले पाहिजे.अंधारातून प्रकाश शोधता येणार नाही .जेव्हा अंधार नसेल तेव्हा प्रकाश आपोआप  असेल.थोडक्यात ज्ञात व अज्ञात यांचा विचार करताना ,ज्ञातातून अज्ञाताचा शोध व विचार  मृगजळ ठरेल .स्वतः निवड शून्य  जागृततेतून घेतलेला ज्ञाताचा शोध, ज्ञाताची समज ,ज्ञाताचे निरीक्षण, आपल्याला अज्ञाताकडे घेऊन जाईल.किंबहुना अज्ञात आपल्याकडे येईल.निराकार , अनंत ,तो प्रकाश, आपल्याकडे येईल ,असे बऱ्याच जणांचे म्हणणे आहे .तो प्रकाश ,तो आनंद ,ते समाधान , ते अज्ञात, ते निराकार, येईल तेव्हा येईल परंतु  निरीक्षणातून ,गतिशून्य जागृततेतून ,होणारी मनाची ओळख, तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकील.त्यातून निर्माण होणारा आनंद व समाधान तुम्हाला तृप्त करून टाकील.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel