"जेथे जातो जेथे तू माझा सांगाती चालविसी हाती धरोनिया "
          
तुकारामांच्या अभंगातील हा भाग मला परवा सहजच आठवला .गुणगुणत असताना याचा अर्थ काय असावा असा विचार सहज मनात घोळत होता .वरवर दिसणारा अर्थ सरळ आहे .मी जिथे जिथे जातो, असतो, तिथे तिथे विठू माऊली माझ्याबरोबर असते.मी पडू नये  यासाठी ती मला हाताला धरून चालवीत असते.मी पडू नये म्हणजे मी चुकीचे वर्तन करू नये यासाठी माऊली सतर्क असते .

मी जिथे जिथे जातो म्हणजे मी जे जे कर्म करतो त्या त्या ठिकाणी माउली सतर्क असते.कर्माचे दोन प्रकार पडतात एक बाह्य कर्म व दुसरे अंतर कर्म .बाह्य कर्माचे दोन प्रकार पाडता येतील. नैमित्तिक कर्म व अनैमित्तिक कर्म नैमित्तिक कर्म म्हणजे जेवण झोप इत्यादी कर्मे . अनैमित्तिक कर्म म्हणजे आपले जे लोकांशी निरनिराळ्या कारणांनी संबंध येतात त्यात आपले असलेले वर्तन होय .हे वर्तन आपोआप बाह्य होत नाही .अगोदर मनात काही तरंग उठतात, मनात काही विचार केला जातो आणि  नंतर त्या विचारांप्रमाणे आपण बाह्य कर्म करीत असतो . अशा प्रकारे बाह्य कर्माचा संबंध आंतर कर्माशी येतो .आपले विचार हेही एक प्रकारचे कर्म होय .ते विचार दुसर्‍यापर्यंत बोलण्यातून पोचवणे म्हणजेही एक प्रकारचे कर्म होय 

आंतर कर्म म्हणजे आपले विचार चक्र होय .हे विचार आपोआप निर्माण होत असतात .विशिष्ट विचार का निर्माण होतात किंवा ते कसे निर्माण होतात ते आपल्याला कळत नाही .इष्ट अनिष्ट, योग्य अयोग्य, चांगले वाईट ,अनुकूल प्रतिकूल, असे अनेक प्रकारचे विचार आपल्या सतत मनात येत असतात .विचार आला की त्याला आपण लेबल लावतो .म्हणजेच त्याची योग्यायोग्यता ठरवितो .हे लेबलही म्हणजेच चिठ्ठी सहज लाविली जाते.जर स्वनिरीक्षण केले तर यातील कुठलीच गोष्ट आपण मुद्दामहून करीत नसतो .सर्व काही आपोआप होत असते .आपल्याला मात्र आपण म्हणजे "मी" विचार करतो असे वाटत असते .योग्य अयोग्य इत्यादी लेबल आपण लावतो असे आपल्याला वाटत असते .परंतु हे चिठीकरण आपोआप होत असते .

आपल्या जवळ पूर्व संस्कारांचा साठा संग्रह असतो .त्या संग्रहा नुसार आपली विचारधारा असते .हे संस्कार कुटुंब, समाज म्हणजे शेजारी पाजारी, वर्तमानपत्रे, इतर मीडिया, शिक्षण संस्था, वाचन,व्याख्याने,प्रवचने,कीर्तन,चर्चा इत्यादींमधून निर्माण होत असतो. स्वाभाविकच प्रत्येक व्यक्तीचा हा संग्रह संस्कार संग्रह निरनिराळा असतो .कारण प्रत्येकाची वर उल्लेख केलेली पार्श्वभूमी निरनिराळी असते .यालाच स्थूलमानाने धारणा हा शब्द वापरता येईल .धारणेतून विचार निर्माण होतो .विचारातून अापण असे करावे असे करू नये असा विचार अस्ती पक्षी किंवा नास्ती पक्षी निर्माण होतो .यात वस्तुतः आपण काय करीत असतो?आपण काहीच करीत नसतो .जे काही होत असते ते आपोआप होत असते .मात्र आपल्याला हे सर्व मीच करतो असा आभास होत असतो .आणि त्यामुळे नेहमी आपण मी असे केले, मी असा विचार केला, मी असा आहे ,मी तसा आहे , असे सारखे मी मी मी करीत असतो .

वस्तूतः आपण काहीच करीत नसताना सर्व काही आपण करतो असे वाटत राहणे म्हणजेच माया होय.मा म्हणजे जी ,या म्हणजे नाही, जी नाही ती माया असे मला वाटते .असा हा सर्व भासाचा खेळ आहे.

इथे आपण म्हणजे काय याचा विचार करणे योग्य होईल .विचार करा जर विचार शून्य असतील, म्हणजेच विचार नसतील तर मी असेन काय? स्वतःला जाणण्याचे ओळखण्याचे विचाराशिवाय दुसरे काही साधन नाही.विचारतरंग म्हणजेच मी होय .मी कसा आहे ते या विचारांवरून कळते.मी चांगलाही आहे आणि वाईटही आहे थोडक्यात मी द्वंद्वमय आहे .आपल्याला आपल्या कल्पनेप्रमाणे चांगले योग्य व्हायचे असते .परंतु जर चांगल्याच्या पाठीला वाईट जोडलेले असेल योग्याच्या पाठीला अयोग्य जोडलेले असेल तर आपण केवळ एकच कसे काय होणार? आपण केवळ हे समजून घेऊ शकतो .आणि आपण त्यातच राहिलो तर आपोआपच द्वंद्वातीत होऊ .

विचारांचे दोन भाग करता येतील  .एक भाग स्वतःला मी कर्ता द्रष्टा म्हणून पाहतो .तर दुसरा भाग हा माझा विचार हे माझे दृश्य म्हणून पाहतो .वस्तुतः द्रष्टा दृश्य ही दोन नाहीत .मुळात हा द्रष्टा व दृश्य एकच आहे .
विचारांमधून वाचनातून ज्यावेळी हे एखाद्याला उमजेल, त्यावेळी हा द्रष्टा दृश्यांमध्ये गुंतून न पडता सतत द्रष्टा म्हणून राहील .यालाच विचारशून्य जागृतता असे म्हणता येईल .मी काहीही करीत नाही सर्व काही आपोआप होत आहे .किंबहुना मी करतो किंवा मी करीत नाही, मी पाहतो किंवा मी पाहात नाही हा सर्व भास आहे .सर्व काही एकच आहे असे लक्षात येणे म्हणजेच साक्षात्कार होय .

ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीमध्ये म्हणजेच माझ्यामध्ये अशा प्रकारच्या उलाढाली किंवा घटना  घडत असतात. आणि त्या माझ्या धारणे प्रमाणे उत्स्फूर्तपणे घडत असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या होणाऱ्या मानसिक व त्याचा  अपरिहार्य परिणाम म्हणून बाह्य क्रिया या एखाद्या कळसुत्री बाहुलीप्रमाणे होत असतात . याचा बोध होण्याला हरकत नसावी .अशाप्रकारे गुणगान करणे, दोष  देणे, हे स्वाभाविक आहे अपरिहार्य आहे .असे लक्षात येते .हे सर्व ज्या व्यक्तीच्या लक्षात येते अशी व्यक्ती कुणालाही दोष देत नाही .त्याचप्रमाणे कुणाचेही विशेष कौतुक स्वाभाविकपणे करीत नाही .किंबहुना तसा विचार त्याच्या मनात येत नाही .

अशी व्यक्ती सर्व धारणा प्रक्रिया व त्याचे सर्व खेळ क्षणोक्षणी पाहात असते. ती सर्व ठिकाणी सर्वांमध्ये असतेहि आणि नसतेही. यालाच साक्षित्व किंवा गतिशून्य जागृतता असे म्हणता येईल .

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसी हाती धरोनिया .या वचनाचा हा अर्थ मला जाणवला आहे.मी काहीही करीत नाही .मी स्वतः चालत नाही .तू माझ्या हाताला धरून जसा चालवशील तसा मी चालतो .तू म्हणजे धारणा, तू म्हणजे प्रारब्ध,तू म्हणजे विठ्ठल,काहीही म्हणा.मी कळसूत्री बाहुले आहे .माझी कळ म्हणजे माझ्या दोऱ्या त्याच्या हातात आहेत.म्हणजेच धारणेच्या हातात आहेत .धारणा मला जसे चालविते तसे मी चालतो .त्याचप्रमाणे धारणा सर्व जगाला इतरांना जशी चालवते तसे ते चालत असतात . काहीच कुणाच्या हातात नाही मात्र सर्व काही माझ्या हातात आहे असे वाटत राहते .हीच जीवनाची गंमत आहे .तसे असेल तर योग्यायोग्य ठरविणारे अापण कोण?


विठ्ठल केवळ आपल्यालाच नव्हे तर प्रत्येकाला त्याचे त्याचे हात धरून चालवीत असतो .विठ्ठल ज्याप्रमाणे बुद्धी देईल त्याप्रमाणे प्रत्येजण वागत असतो. जर विठ्ठलच सर्व काही करीत असतो तर दोष कुणाला द्यावा आणि कौतुक तरी कुणाचे करावे.

अशी ज्याची बुद्धी स्थिर होते तो या जगात कमलपत्राप्रमाणे असतो .तो या जगात असतोही आणि नसतोही .तो या जगाचा असतो आणि नसतोही. तुकारामांच्या अभंगाच्या सुरुवातीच्या  चरणांचा मला जाणवलेला अर्थ  वरील प्रमाणे आहे .
 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel