इथे मला अभिप्रेत असलेली  फूटपट्टी म्हणजे  एखादी घटना व्यक्ती संस्था पक्ष इत्यादीचे मूल्यमापन करण्याचे प्रत्येक व्यक्तीचे एकक होय.  मूल्यमापन करताना एखादी व्यक्ती, ज्या व्यक्तीला किंवा पक्षाला डोक्यावर घेऊन नाचेल,त्या व्यक्तीला किंवा पक्षाला दुसरी व्यक्ती वेळ प्रसंगी पायी  तुडवण्याला उद्युक्त होईल.हीच गोष्ट धर्म पंथ जात प्रदेश इत्यादी बद्दल आहे. याचे कारण प्रत्येकाची वेगळी फूटपट्टी होय.व्यक्तीच्या मित्रांना जर  त्यांचे मित्राबद्दल मत विचारते तर ते निरनिराळे असेल.त्यांची मते, बरा ,बराच बरा, चांगला ,एकदम उत्तम, होपलेस ,काही दम नाही ,अशी अनेक प्रकारची असू शकतील .असेच एखाद्या घटनेबद्दल असू शकेल.सिनेमामध्ये चित्रण जवळून लांबून वरून विशिष्ट निरनिराळ्या प्रकारच्या कोनातून  केले तर ते वेगवेगळे भासते.प्रत्येक जण आपआपल्या विचारांशी प्रामाणिक असूनही ते एकमेकांची डोकी  फोडण्याला उद्युक्त होतात  त्या प्रमाणेच घटनेची समीक्षा भिन्न असते .इथे कुणी मुद्दाम खोटे बोलत नसते तर प्रत्येकाला जे प्रामाणिकपणे वाटते तेच तो सांगण्याचा प्रयत्न करीत असतो .ऐकणार्‍याला मात्र खरे काय खोटे काय याचा संभ्रम स्वाभाविक पणे पडतो.या सर्वाचे कारण म्हणजे प्रत्येकाच्या निरनिराळ्या फूटपट्ट्या होय. असे का होते ? प्रत्येक जण वेगवेगळ्या  भौतिक परिस्थितीत व मानसिक वातावरणात वाढलेला असतो संस्कार भिन्नतेमुळे धारणा भिन्नता असते .त्यामुळे परिस्थितीचे मूल्यमापन  बदलते .प्रत्येक जण प्रामाणिक असूनही एकमेकांची डोकी फोडली जातात.ह्यामुळे निरनिराळे पंथ धर्म विचार  निर्माण होतात. एक विचार त्याला विरोधी दुसरा विचार मग त्या विचारांचा समन्वय मग पुन्हा या समन्वय विचाराला विरोधी विचार पुन्हा समन्वय अशा प्रकारे वैचारिक प्रगती होत जाते व त्यातून भौतिक  प्रगती अस्तित्वात येते असा विचारही मांडला जातो.यातूनच मानवाची प्रगती झाली असाही विचार मांडला जातो .  हे सर्व आवश्यक आहे का?. खरोखरच या वैचारिक गुंत्यामध्ये गुंतून पडण्याचे कारण आहे का ?हे सर्व काय चालले आहे ?हा कोलाहल कां ?साधा सरळ स्वच्छ सोपा मार्ग आपल्याला सापडणार नाही का ?या फुटपट्ट्यांचे गणित आपल्याला समजले तर आपण उगीच कुणाची स्तुती किंवा कुणाला दोष देत बसणार नाही .आपली निष्कारण बडबड व वाचाळता थांबेल .आपण प्रत्येकाला योग्य प्रकारे समजू शकू .टोकाचे विचार व टोकाची भूमिका मांडली जाणार नाही .उलट जो मांडीत असेल त्याला, त्यालाच काय कुणालाही अापण चांगल्या प्रकारे समजू शकू.कारण  त्या वेळी आपल्याला आपली फूटपट्टी दिसत राहील. आपली फुटपट्टी ही आपल्या संस्कारावर अवलंबून असते. आपल्याप्रमाणेच जगातील प्रत्येक व्यक्तीची फुटपट्टी त्याच्या त्याच्या संस्काराप्रमाणे वेगळी  असते.त्यामुळे लोकांविषयी समज व्यवस्थित होत नाही .या सर्वांची जाण असणे व त्याचे सदैव भान असणे म्हणजेच साक्षीत्व(जागृतता ) होय.
१३/६/२०१८ ©   प्रभाकर  पटवर्धन

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel