भीती ही नेहमी कशाबद्दल तरी वाटत असते .प्रत्येकाला कशाची ना कशाची भीती नेहमी वाटत असावी .काळोख अरण्य  साप  समुद्र पाणी हिंस्र पशू एकाकीपण  मृत्यू  भूत किंवा आणखी काही .भीती ही नेहमी आपल्या धारणेवर अवलंबून असते .समुद्रात पाण्यात बुडून मेलेल्या लोकांच्या कथा ऐकून पाण्याबद्दलची भीती निर्माण होते .हिंस्र पशूंचे हल्ले व भुताखेतांच्या कथा यांमुळेही भीती निर्माण होते.सिनेमा नाटक कादंबऱ्या रहस्य कथा लहान पणी दाखवलेली बागुलबुवाची भीती ,लोकांनी सांगितलेले खरे खोटे अनुभव इत्यादींमधून एक विशिष्ट प्रकारची धारणा निर्माण होते .भीतीचे स्वरुप हे बहुतांशी काल्पनिक असते.मनाने काही प्रतिमा संकल्पना आराखडे निर्माण केलेले असतात.एखाद्या गोष्टीचे स्वरूप जर आपल्याला कळावयाचे असेल तर त्याला आपण सामोरे गेले पाहिजे.मी म्हणजे कोण याचा विचार केला पाहिजे .मी म्हणजे संबंधमयता हे नीटपणे लक्षात आले तर भीती म्हणजेच मी हे लक्षात येईल.आपण अज्ञाताला घाबरतो परंतु जे अज्ञात आहे त्याची भीती कशी वाटणार जे अज्ञात  आहे ,जे काय आहे ते माहित नाही ,त्याची भीती कशी वाटणार? त्याच्या काल्पनिक आराखड्याला प्रतिमेला आपण घाबरतो असे लक्षात येईल.आपली चराचराशी असलेली संबंधमयता ,त्याच बरोबर कल्पनांशी असलेली संबंधमयता, म्हणजेच मी. धैर्यही मी व भीतीही मीच असे जर  लक्षात आले तर मीच मला का घाबरावयाचे हे लक्षात येईल. आणि भीती आपोपच नाहीशी होईल .ही जादू केव्हा होईल ,कशी होईल ,ते वर्णन क.रता येणार नाही,सांगता येणार नाही ,भीतीची भीती वाटणार नाही किंबहुना भीती ही कल्पनाच नष्ट होईल  .जेव्हा होईल तेव्हा क्षणार्धात परिवर्तन झालेले आढळून येइल.

१९/६/२०१८ ©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel