कृष्णाने सांगितलेले कलियुग काय आहे? 

एकदा चार पांडव (युधिष्ठीर वगळता) भगवान श्रीकृष्णाला विचारतात- "कलियुग काय आहे आणि कलियुगात काय होईल?"

       या प्रश्नावर कृष्ण हसला आणि म्हणाला,"कलियुगात काय परिस्थिती असेल त्याचे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो."

      " असे म्हणून त्याने आपल्या भात्यातून चार बाण घेतले आणि धनुष्याच्या सहाय्याने चार वेगळ्या दिशेला सोडले आणि चारही पांडवांना ते बाण घेवून येण्याची आज्ञा दिली."
 
       सर्व चारही पांडव बाणाच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने गेले.

        जेव्हा अर्जुनाने बाण शोधून तो उचलला तेव्हा त्याला मंजुळ आवाज ऐकूआला तो त्या आवाजाकडे वळला त्याने पाहिले एक कोकिळा खूप गोड आवाजात गात आहे पण त्याचवेळी जिवंत सशाचे मांस खात आहे, तो ससा खूप वेदना सहन करत आहे.
या दैवी पक्षीचे हे घृणास्पद कृत्य पाहून अर्जुनाला धक्का बसला त्याने ते ठिकाण पटकन सोडले.

       भीमाने ज्या ठिकाणाहून बाण उचलला त्या ठिकाणी पाच विहिरी होत्या. 
       एका विहरीभोवती चार विहीरी होत्या. 
       चार विहिरीतील गोड पाणी त्यांच्यात साठून राहू शकत नसल्याने त्या विहिरीबाहेर पडत आहे.
       पण आश्चर्याची बाब म्हणजे या चारही विहीरी पूर्ण भरून वाहत असताना मात्र मधे असेलेली विहीर कोरडी होती.
       हे पाहून भीम चक्रावून गेला.

      नकूल जेव्हा बाण घेवून माघारी येत होता तेव्हा त्याने एक ठिकाणी पाहिले की एक गाय वासराला जन्म देत आहे. 
       जन्म दिलेल्या वासराला ती गाय चाटू लागली. 
       पण ते वासरू स्वच्छ झाले तरी गाय चाटतच राहते.
      खूप मुश्किलीने लोक त्या वासराला गायीपासुन वेगळे करू शकले. 
      तेव्हा ते वासरू खूप जखमी झाले होते. 
      हे पाहून नकूल गोंधळून गेला.

      सहदेवाने एका डोंगराजवळून बाण उचलला आणि पाहिले एक मोठ्ठी शिळा खाली कोसळत आली.
      ती शिळा खाली येताना वाटेत येणाऱ्या मोठमोठ्या झाडांचा, दगडांचा चुराडा करत होती पण तीच शिळा एका लहान रोपामुळे थांबली.


      यावेळी सहदेवही चकीत झाला.
      या चौघांनी या सर्व घटनांचा अर्थ श्रीकृष्णाला विचारला. 
      श्रीकृष्ण हसला आणि अर्थ सांगितला.
१ 
     "कलियुगात धर्मगुरूंचा आवाज खूप मधूर असेल आणि खूप ज्ञानही असेल पण ते साधकांचे शोषण करतील जसं कोकिळा त्या सशाचे करत होती.
________________________________
हल्ली कोणत्याही धर्माचे धर्मगुरू घेतले तर ते मधुर भाषण सामान्यपणे करताना आढळून येतात .परंतु साधकाचे कल्याण व्हावे. साधकांचा उद्धार व्हावा. साधक संपन्न व्हावा.असा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न क्वचितच आढळून येतो .साधक आपल्याकडे आकृष्ट व्हावा तो आपल्या नादी लागावा त्यांचे शोषण आपल्याला करता यावे हा हेतू  त्यामागे बऱ्याच वेळेला असलेला आढळून येतो.साधकांचे बऱ्याच वेळा आर्थिक मानसिक शोषण करताना ते आढळून येतात .काही तथाकथित धर्मगुरू तर लैंगिक शोषणही करताना आढळून येतात .निरनिराळ्या तथाकथित धर्मगुरू विरुद्ध कोर्टात चाललेल्या केसेस यांचे उदाहरण म्हणून देता येईल .सर्व मार्ग ईश्वराकडे जातात सर्व धर्म शांती स्नेह बंधुभाव यांचा उपदेश करतात.परंतु प्रत्यक्षात धर्मगुरू आपल्या साधकाना म्हणजेच अनुयायांना चिथावणी देऊन त्यांना अन्य धर्मियांविरुद्ध भडकवताना आढळून येतात .
श्रीकृष्णाने ते गोड बोलतील व त्याचवेळी साधकांचे शोषण करतील असे म्हटले आहे .इथे ससा म्हणजे केवळ साधक नसून अन्य धर्मीयही आहेत असा अनुभव येतो .अशा धर्माधर्मातील भांडणामध्ये तथाकथित धर्मगुरू चिथावणी देऊन स्वतः सुरक्षित अंतरावर बसतात आणि त्यांचे अनुयायी मात्र नाहक मरतात असा अनुभव आहे .
कोकिळा म्हणजे धर्मगुरू व ससा म्हणजे केवळ त्यांचेच साधक असे नव्हे तर सर्व  धर्मीय असे म्हणता येईल .
धर्मगुरू म्हणजे एखाद्या समाजाचे प्रमुख होय असे श्रीकृष्णाला म्हणावयाचे असावे. श्रीकृष्णाच्या वेळी एकच धर्म होता .हल्ली अनेक धर्म आहेत त्यामुळे श्रीकृष्ण असते तर त्यांनी त्यावर कसे भाष्य केले असते ते कल्पनेनेच समजून घ्यावे लागेल.
त्याच क्रमाने श्रीकृष्णाच्या वेळी पक्ष पद्धतीही नव्हती हल्ली निरनिराळे पक्ष हे धर्माहून कमी कडवे नाहीत .आणि त्यांचे प्रमुख प्रत्यक्षात काय करीत असतात त्याचा सर्वांनाच अनुभव आहे .कोकिळा मधुर गायन करण्याऐवजी कर्कश गायन करीत आहे असेही म्हणता येईल .कर्कश गायन म्हणजे त्यांचे ज्ञानही किती व कशा प्रकारचे आहे हेही सर्वश्रुतच आहे .
*थोडक्यात श्रीकृष्णाने दिलेल्या उपमेचा उदाहरणाचा अर्थ हल्लींच्या काळात जरा वेगळ्या पद्धतीने लावला पाहिजे असे मला वाटते. *********************************


      कलियुगात गरीब लोक श्रीमंतांसोबत राहतील.
      श्रीमंताकडे खूप धन असेल ठेवायला जागा नसेल पण ते त्यातील एक कवडीसुद्धा गरीबांना देणार नाहीत जसं त्या विहिरींनी कोरड्या विहिरीला एक थेंबसुद्धा दिला नाही.
_.______________________________

जगातील संपत्तीचे जास्त जास्त केंद्रीकरण होत आहे असे हल्ली दिसून येते.आहे तिथे संपत्ती समृद्धी अक्षरश: वाहत आहे असे दिसून येते.जिथे दारिद्र्य गरीबी आहे तीही अलोट व प्रचंड दिसून येते .ही गोष्ट केवळ एखाद्या देशांमध्ये आहे असे नव्हे तर प्रत्येक देशामध्ये कमी जास्त प्रमाणात अशी परिस्थिती आढळून येते .एवढेच नव्हे तर जागतिक संपत्तीचे जर आपण राष्ट्रा राष्ट्रांमध्ये वाटप पाहिले तर तेही अत्यंत असामान झालेले आढळून येते.श्रीमंतांनी आपणहून आपल्या संपत्तीचा बराच मोठा भाग  सामाजिक कार्यांमध्ये वाटला पाहिजे प्रत्यक्षात काहीच असे करताना आढळून येतात .श्रीमंतांमध्ये काही कौशल्य आहे म्हणून ते श्रीमंत झाले हे बरोबर आहे .वाटप होत असताना दारिद्र्याचे वाटप होता कामा नये तर संपन्नतेचे वाटप झाले पाहिजे हेही बरोबर आहे .श्रीमंतांनी धर्मादाय संस्था धर्मादाय ट्रस्ट यांच्या मार्फत आपल्या संपत्तीचा भाग समाजापर्यंत पोचवला पाहिजे. सामाजिक जबाबदारीची जाणीवही निर्माण झाली पाहिजे .सरकारनेही याबाबतीत बऱ्याच गोष्टी करता येण्यासारख्या आहेत .परंतु निवडणुकीच्या राजकारणामुळे सरकार काहीच गोष्टी करू शकते हे ही निखळ सत्य आहे .काही विहिरी भरभरून वाहत आहेत तर काही विहिरीसंपूर्ण कोरड्या आहेत हे कुणालाच भूषणावह नाही.
******************************** 


      कलियुगात पालक मुलांवर एवढं प्रेम करतील की त्या प्रेमाने मुलं बिघडतील आणि त्यांचे आयुष्य उध्वस्त होईल जसं त्या गायीचे प्रेम वासराला त्रासदायक ठरले.
________________________________
ही गोष्ट तर फारच पटण्यासारखी आहे .हल्ली एक किंवा दोन मुले सर्वसाधारणपणे असतात .जर मध्यमवर्गीय घेतले किंवा कनिष्ठवर्गीय घेतले तरीही त्यांनी आपले लहानपण फार कष्टात काढले असे दिसून येते.आपल्याला लहानपणी जे जे मिळाले नाही ते ते आपल्या मुलांना मिळावे असे स्वाभाविकपणे पालकाना वाटते.
परिणामस्वरूप मुले जे जे मागतील ते ते त्यांना देण्याची प्रवृत्ती दिसून येते .त्यामुळे मुलांना नाही हा शब्द ऐकण्याची सवयच जाते .जेव्हा केव्हा नाही हा शब्द ऐकावा लागतो त्याची प्रतिक्रिया काही वेळा भयानक स्वरूपाची असते .मोबाइल स्कूटर मोटारसायकल मोटार चैनीच्या वस्तू या न मिळाल्यामुळे काही मुले आत्महत्येस प्रवृत्त होतात .तर चैनीला चटावल्यामुळे काही मुले बेकायदेशीर उद्योग करताना आढळून येतात .अशी मुले पकडली गेल्यावर त्यांचे सविस्तर वृत्त वर्तमानपत्रे मोबाईलवरील मेसेजेस रेडिओ टीव्ही इत्यादि मार्फत आपल्यालापर्यंत पोचते.
* प्रेमाचा अतिरेक मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त करताना आढळून येतो* 

*प्रेमाने अति चाटल्यामुळे वासरू ज्याप्रमाणे जखमी झाले तशी परिस्थिती मुलांची ओढवत आहे .*

*****************************:*:**

       कलियुगात माणसे चारित्र्याच्या बाबतीत खूप घसरतील जसे ती शिळा डोंगरावरून घसरली आणि त्यांचे अधःपतन काही केल्या थांबणार नाही पण सर्वात शेवटी देवाचे नाम त्यांचे संरक्षण करील, त्यांचा उद्धार होईल जसं त्या लहान रोपाने त्या शिळेला आणखी खाली जाण्यापासुन रोखले."
________________________________

ज्या व्यक्ती चारित्र्यसंपन्न आहेत त्यांचा अावाज या कलकलाटामध्ये व्यवस्थित ऐकू येत नसला जरी तो अत्यंत क्षीण  असला तरीही तो शेवटी प्रभावी ठरतो असे दिसून येते .एक ना एक दिवस हा क्षीण आवाज सर्वांपर्यंत पोचेल आणि समाजाची घसरगुंडी थांबेल असे म्हणायला हरकत नाही .*हेच ते लहान रोपटे* निदान आपण याबाबतीत आशावादी राहू शकतो .
* प्रत्येक व्यक्तीच्या आत कुठेतरी एक सदबुद्धी निश्चित असते .त्याला चांगले काय व वाईट काय याची अंतर्यामी जाणीव असते. हा आतला क्षीण आवाज शेवटी व्यक्तीची  व पर्यायाने समाजाची घसरगुंडी थांबवील असेही म्हणता येईल .*
*********************************
९/१/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel