राष्ट्राभिमान ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे असे प्रत्येक जण म्हणेल असे मला वाटते .याशिवाय दुसरे काही मत असू शकत नाही असेही काही जण म्हणतील. लहानपणापासून शाळेत व प्रत्येक ठिकाणी आपण राष्ट्रप्रेमी व राष्ट्राभिमानी असले पाहिजे अशी शिकवण  दिली जाते .यांच्या विरुद्ध एखादा बोलला तर तो दंडनीय अपराध असेही समजले जाते .लहानपणापासून आपला प्रदेश भाषा जात प्रांत राज्य देश याबद्दल अभिमान कळत नकळत बाळगण्याचे शिक्षण आपल्याला दिले जाते .


यामुळे माणूस माणसापासून दुरावतॊ हे आपल्या लक्षातच येत नाही. मी ब्राम्हण  मराठा ओबीसी वाणी पटेल दलित हिंदू मुसलमान ख्रिश्चन शीख महाराष्ट्रीयन कानडी भारतीय असे म्हणताना आपण असा कधीही पुसटसाही विचार करत नाही की जर आपण ज्या जातीत धर्मात देशात जन्माला आलो त्या ऐवजी दुसऱ्या जातीत प्रदेशात देशात धर्मात जन्माला आलो असतो तर? अापण त्या त्या जातीचा धर्माचा देशाचा तेवढ्याच उत्कटतेने अभिमान धरला असता आणि इतरांनीही आपल्याला तशीच शिकवण दिली असती .हे हास्यास्पद वाटत नाही काय ?एखादा म्हणेल अशीच पद्धत आहे तेच योग्य आहे .जात प्रांत धर्म देश इत्यादीचा आग्रह जरूर असला पाहिजे परंतु दुराग्रह नसावा .वरवर हे बोलणे संयुक्तिक वाटते परंतु आग्रह कुठे संपतो दुराग्रह कुठे सुरू होतो त्याची सीमारेषा कोणती हे ठरवणे अशक्य आहे. एकाला जो योग्य आग्रह वाटेल तोच दुसऱ्याला दुराग्रह वाटेल. इथेच वादाला व कदाचित हिंसेला सुरुवात होते .
   व्यक्ती म्हणून आपण आपल्याला अगदीच नगण्य क्षुद्र  लहान वाटतो. आपला अहंकार दुखावतो .आपल्याला स्व- विस्ताराची गरज वाटते.जात प्रदेश राज्य भाषा धर्म देश इत्यादीमुळे आपल्याला आपण कुणीतरी आहोत असे वाटू लागते.आपला अहंकार सुखावतो . सुदृढ झाल्यासारखे वाटते. मग या आग्रहापोटी एकमेकांचे गळे चिरावयाला काहीच हरकत नाही .जात्याभिमानाच्या ठिकाणी प्रदेशाभिमान प्रदेशाभिमानाच्या ठिकाणी राज्याभिमान राज्य  अभिमानाच्या ठिकाणी राष्ट्राभिमान इ.एकाच्या ठिकाणी दुसरे काहीतरी आलेच पाहिजे काय ?या स्व विस्तारीकरण प्रक्रियेशिवाय अापण राहूच शकणार नाही काय  ?एकाच्या ठिकाणी दुसरे अाणण्यात मला तरी काही शहाणपणा दिसत नाही .

जेव्हा एकाच्या ठिकाणी दुसरे काही येणार नाही व पहिले ही अस्तित्वात राहणार नाही तेव्हा फक्त  शहाणपणा  असेल .जेव्हा ही सर्व प्रक्रिया उमजेल समजेल त्यावेळी आपोआप फक्त  शहाणपणा असेल .वृथा अभिमानापायी आपण आपले किती नुकसान करून घेतो हे कधी लक्षात येणार ?अभिमान हा नेहमीचं वृथा नसतो काय ?निरनिराळ्या प्रकारच्या अभिमानाची साखळी कधी सुटणार ?एका लेबलच्या ठिकाणी दुसरे लेबल ही प्रक्रिया केव्हा थांबणार ?ते असे करीत असतात म्हणून मी असे करतो असे प्रत्येक बाजू म्हणत असते हा प्रकार केव्हा थांबणार ?व्यक्ती  शहाणी झाली तर समाजही शहाणा होईल .दुसरे शहाणे झाले की नंतर मी  शहाणा होईन असे न म्हणता स्वतःपासून सुरुवात करता येणार नाही काय ?एकाच्या ठिकाणी दुसरे आणण्याचा हव्यास सुटला की शहाणपण येईल .मी हव्यास सुटला असे म्हणत आहे हव्यास सोडावयाचा असे म्हणत नाही हे  लक्षात घ्या .या दुराभिमानाची प्रक्रिया समजेल तेव्हा आपोआप हा एकाच्या ठिकाणी दुसरे आणण्याचा हव्यास सुटेल.व केवळ शहाणपणा  असेल .

२१/६/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel