भूतकाळातील साठवलेल्या विविध स्मृतींचा म्हणजेच ठशांचा संग्रह म्हणजे स्मरण होय.हे ठसे दोन प्रकारचे असतात भौतिक व मानसिक .तांत्रिक व व्यावहारिक शिक्षणाला भौतिक स्मरण असे म्हणता येईल .भौतिक स्मरण आपल्याला आपला व्यवसाय आपली नोकरी आपले काम उत्तम प्रकारे करण्याला उपयोगी पडतो . सर्जन ऑपरेशन करून रोग्याचे प्राण वाचवतो .डॉक्टर तपासून योग्य औषध योजना करून रोग्याला निरोगी करण्यास मदत करतो .चार्टर्ड अकाउंटंट योग्य प्रकारे हिशोब ठेवण्याला मदत करतो .याप्रमाणे इंजिनिअर ड्रायव्हर इत्यादी आपापले काम योग्य प्रकारे करतात.

मानसिक स्मरणाचा आपण विचार करत आहोत .मानसिक स्मरणांमध्ये अापण वस्तुस्थितीला व्यक्तीला निसर्गाला सामोरे जाताना कोर्‍या मनाने मुक्त मनाने मोकळ्या मनाने सामोरे जात नाही .एखाद्या व्यक्तीला भेटताना आपण त्या व्यक्तीसंबंधी जे काही पूर्वग्रह मनात साठविलेले असतात ते घेऊन भेटतो.  चष्मा स्वच्छ नसून तो पूर्वग्रहांनी व्यापलेला असतो .जर आपले मत त्या व्यक्तीबद्दल वाईट असेल तर त्यातूनच आपण त्या व्यक्तीला पाहतो.चांगले असेल तर तसे पाहतो. थोडक्यात आपला दृष्टिकोन ताजा नसतो .ती व्यक्ती कदाचित बदललेली असेल .चांगली किंवा वाईट कसाही बदल असू शकतो .पण आपण मात्र पूर्वग्रहदूषित असतो. व त्या प्रमाणे त्याचे मूल्यमापन करीत असतो.म्हणजे एक प्रकारे अापण समस्येला न पाहता स्वतःला पाहात असतो. स्मरणाचे अशाप्रकारे क्रमशःदृढीकरण  व विस्तार होत असतो .प्रिय व अप्रिय दोनही प्रकारचे प्रसंग आपल्या मनात साठवले जात असतात .अप्रिय प्रसंग विसरण्याचा व प्रिय प्रसंग साठवण्याचा आपला प्रयत्न असतो. परंतु प्रत्यक्षात प्रिय प्रसंग मागे पडतात व अप्रिय आठवले जातात .

प्रत्येक वेळी व्यक्ती, वस्तुस्थिती व निसर्ग , ताजेपणाने सामोरे जाणे म्हणजे काय,  हे मी एक उदाहरण देऊन स्पष्ट करतो .एखादा समुद्रातील सूर्यास्त प्रथमच पाहत आहे अशी कल्पना करूया .आत्तापर्यंत त्याने चित्र सिनेमा किंवा कोणत्याही अन्य मार्गाने सूर्यास्त पाहिलेला नाही .अशा वेळी तो जवळजवळ कोर्‍या मनाने सूर्यास्ताला सामोरा जाईल व त्याचा आनंद घेईल .जवळजवळ असे म्हणतो याचे कारण म्हणजे त्याच्या मनात कुठेतरी त्याने पाहिलेल्या पूर्वीच्या अन्य दृश्यांशी तुलना सुरू असेल .दुसऱया दिवशी पुन्हा सूर्यास्त पाहताना तो त्याची तुलना अगोदरच्या दृश्यांशी करील म्हणजेच शिळ्या मनाने भागलेल्या मनाने तो त्याला सामोरा जाईल .त्याचे पाहणे ताजे नसेल .मन नुसते पाहात नसते भेटत नसते तर त्याची सतत नामकरण प्रक्रिया चालू असते . 

लहान मुलाला निरागस असे म्हणतात कारण त्यांचा शब्दसंग्रह तोकडा असतो त्याची नामकरण प्रक्रियाही विशेष नसते तो प्रसंगाला ताजेपणाने सामोरा जात असतो .म्हणूनच काही वेळा खऱया अर्थाने मोठ्या असलेल्या  लोकांना निरागस बालका सारखा निरागस, असा शब्दप्रयोग वापरला जातो .स्मरण म्हणजेच मी हे आपल्या लक्षात आले आहे का ?जर स्मरण नसेल तर अर्थातच मीही नसेन .साधू संत सांगतात की मी नष्ट झाल्याशिवाय तुम्हाला ते परमतत्त्व भेटणार नाही .त्यासाठी तुम्ही धर्म ग्रंथ वाचले पाहिजेत नामस्मरण केले पाहिजे इत्यादी अनेक उपाय सुचविले जातात.यामुळे स्मरण दृढीकरण प्रक्रिया होते .जे तत्त्व मनातीत आहे अनाम आहे अनंत आहे असे तुम्ही म्हणता ते नामाच्या साहाय्याने मनाच्या  मशागतीतून स्मरणदृढीकरणातून स्मरण विस्तारातून कसे काय प्राप्त होणार ?विचार साखळी अखंड चालू असते परंतु एक विचार संपून दुसरा सुरू होतो त्यामध्ये एक लहानशी फट असते हे तुमच्या लक्षात आले आहे काय ?

आपली परमार्थातील विचार पध्दत थोडीशी अशी असते .मी आज कारकून आहे परंतु परीक्षा देत जास्त चांगले काम करीन व एक दिवस ऑफिसचा प्रमुख होईन. त्याच प्रमाणे मी आता सामान्य आहे परंतु शिस्तीत कठोर तपश्चर्या करून धर्म ग्रंथांचा अभ्यास करून सत्संग करून मी संतांच्या जवळ जाईन व परमेश्वर प्राप्ती करून घेईन .कदाचित तुम्ही ज्याची इच्छा करता ते तुम्हाला मिळेलही परंतु  ते सत्य अनाम अनंत असेल का ?प्रश्नांची उत्तरे एखाद्या गाइड प्रमाणे मिळू शकत नाहीत .ती ज्याची त्यानेच शोधावयाची असतात .

मी एवढेच म्हणेन की स्मरण प्रक्रिया नीट समजून घ्या आपण कोणत्याही समस्येला ताजेपणाने सामोरे जात नाही असे का होते ते लक्षात घ्या .प्रत्येक वेळी प्रश्नाला ताजेपणाने सामोरे जाण्याची गरज लक्षात असुद्या. त्याशिवाय त्या प्रश्नाची योग्य समज उकल होणार नाही एकदा ही समज आली की जो बदल घडून यावयाचा तो आपोआपच येईल .

३०/६/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmailcom

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel