महाभारतामध्ये एक कथा आहे संध्याकाळ झालेली होती .पांडव वनवासाला जाण्याच्या अगोदरची गोष्ट आहे .राजसूय यज्ञानंतर धर्मराज लहानश्या  राज्याचा राजा होता .धर्मराजाचा असा लौकिक होता की तो कुणाही याचकाला विन्मुख पाठवीत नाही .दिवे लागणी झालेली होती .एवढ्यात एक याचक आला.रात्र झाली की धर्मराज कुणालाही काही  दान देत नसे .याचकाने पशुधनाची नम्रपणे मागणी केली .त्याला पशुधन कां पाहिजे तेही नम्रपणे सांगितले .रात्र होत असल्यामुळे युधिष्ठिराने त्या याचकाला तू *उद्या ये* मी तुला हवे ते देईन असे सांगितले .

यावेळी भीम तिथे होता . युधिष्ठिराचे हे बोलणे ऐकून तो खदाखदा हसू लागला .धर्मराजाने त्याला तू का हसतोस असे विचारले .त्यावर भीम म्हणाला ,दादा तुम्ही *मृत्यूवर विजय* मिळविला असे दिसते .तुम्ही सांगाल त्या वेळी तो येईल असे वाटून मला हसू आले .तुम्ही उद्या सकाळपर्यंत निश्चित जिवंत राहणार याची तुम्हाला खात्री आहे असे दिसते. भीमाचे बोलणे युधिष्ठिराच्या लगेच लक्षात आले. त्यांने त्या याचकाला परत बोलाविले व त्याला जे काही हवे होते ते देण्यास आपल्या नोकरांना सांगितले .

जीवन क्षणभंगूर आहे .याक्षणी  आपण आहोत म्हणजे पुढच्या क्षणी अापण असू असे सांगता येणार नाही .प्रत्यक्षात आपल्या पैकी प्रत्येजण अापण चिरंजीव आहोत असे गृहीत धरून सर्व गोष्टी करीत असतो . तसे गृहीत जर प्रत्येकाने धरले नाही ,तर त्याला व्यवस्थित विचार करून आपल्या योजना पार पाडता येणार नाहीत . आपली नेहमीची दैनंदिन कर्मे करता येणार नाहीत.अर्थात विमा कंपन्या आपल्याला जीवन क्षणभंगूर आहे याची जाणीव निरनिराळया  मार्गाने करून देत असतात .अापण स्वतःचा कुटुंबाचा आपल्या मालमत्तेचा विमा जरूर उतरत असतोही .असे असले तरी मनुष्य ज्या मग्रुरीने उन्मत्तपणे वागत असतो ते पाहता याची खरेच जाण त्याला किती आहे त्याची शंका येते .

.*तो मगाशी फोनवर बोलत होता. एवढ्यात तो गेल्याची बातमी आली .*

*काल रात्री तो व्यवस्थित जेवला.गप्पा मारल्या.टीव्ही बघितला . सकाळी उठला नाही .*

*गप्पा मारून पत्ते खेळून निरोप घेऊन तो नेहमीप्रमाणे क्लबमधून घरी निघाला .मोटरसायकलवरून जात असताना एका ट्रकने त्याला उडविले आणि तो गेला .*

रस्ता क्रॉस करत असताना, ट्रेनमधून जात असताना पडून, विमान कोसळून, दुभाजकावर आपटून, हेल्मेट न घातल्यामुळे, गाडी स्लिप झाल्यामुळे ,सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे, कोणत्या ना कोणत्या कारणाने  अनेक प्रकारचे मृत्यू आपण वाचत ऐकत किंवा टीव्हीवर पाहात असतो .

अश्या मृत्यूच्या बातम्या वारंवार ऐकून आपले मन *मद्दड *झाले आहे की काय असे मनात येते .

प्रत्येक मृत्यूच्या बातमीवर आपण रडत बसावे .काळजी करीत राहावे.चिंतातूर असावे.जीवनाचा आनंद मुळीच उपभोगू नये .असे मी म्हणत नाही .

उलटा परिणाम होऊन उन्मत्तपणे वागावे असेही मी म्हणत नाही ."ऋणम् कृत्वा घृतम् पिबेत्"असेही नसावे .

पण कुठेतरी आपण अमर नाही याची खोलवर जाणीव असावी व त्याचा परिणाम आपल्या बाह्य वर्तणुकीवर व्हावा असे मला वाटते .

भा .रा .तांबे यांनी म्हटल्याप्रमाणे " *जन पळभर म्हणतील हाय हाय तू जाता राहिल कार्य काय *" याची खूणगाठ सदैव  राहिल्यास आपले कितीतरी निर्णय, आपली किती तरी वागणूक बदलेल, लोकांबरोबरचेआपले संबंध जास्त योग्य होतील असे मला वाटते .दुसर्‍यांवर ओढवते ती जगरहाटी,आपल्यावर ओढवतो तो प्रसंग, असा आपला दृष्टिकोन असतो हे नाकारून चालणार नाही .

*आपण गेल्यावर प्रथम सारवलेली जमीन(नुसतीच फारशी व त्यावर दिवा)व त्यावर एक दिवा असेल .*

*त्यानंतर एक छानशी प्रेम असलेला आपला फोटो व त्यावर हार घातलेला असेल .*

*भिंतीवर एक खिळा ठोकून त्यावर हार घातलेला आपला फोटो लटकत असेल .*

*काही दिवस त्या फोटोवरची धूळ पुसली जाईल .हार घातला जाईल.*

*हळूहळू ती फ्रेम जुनी होईल .हळूहळू त्यातील कागद पिवळा पडेल*

*काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी ती फ्रेम अडगळीत जाईल .हळूहळू आपण विस्मरणात जाऊ .*

*भिंतीवरील खिळा केव्हातरी निघून जाईल व त्या जागी एक फक्त छिद्र राहील .*

*नवीन रंग काढण्याच्या वेळी ते छिद्रही व्यवस्थित बुजविले जाईल व मग आपण कुठेच नसू.*

*आपल्या अस्तित्वाची,सर्वांच्या अस्तित्वाची,हीच खूण होय *

*हे सर्व अपरिहार्य आहे फक्त याची जाण कुठेतरी खोलवर मनात असावी.*

*खरी समज आली तर जे काही होईल ते आपोआप होईल अापण काहीही करण्याची गरज नाही *.

९/१२/२०१८ ©प्रभाकर  पटवर्धन 

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel