जिकडे बघावे तिकडे बर्फच बर्फ दिसत होता .गिर्यारोहण करणारी एक तुकडी हिमालयाचे एक शिखर काबीज करण्याची मोहीम यशस्वी करण्यासाठी हळूहळू पुढे सरकत होती .तंबू व इतर सामान घेऊन शेर्पा त्यांच्या बरोबर जात होते.त्या तुकडीतील अजय एक महत्त्वाचा सदस्य होता.त्याच्या नावाप्रमाणे त्याने आतापर्यंत अनेक शिखरे काबीज केली होती. गिर्यारोहणातील वाकबगार अशा काही मोजक्या व्यक्तींमध्ये त्याची गणना होत असे.त्यांनी संध्याकाळ झाली असे पाहून तंबू उभारण्याला सुरुवात केली.रात्री हवा खराब झाली.पाऊस बर्फवृष्टी आणि बर्फाचे वादळ होणार असा अंदाज होता. दुसऱ्या दिवशी सकाळी हवा सुधारलेली नव्हती .आज पुढे जावे की तिथेच मुक्काम करावा अशी चर्चा सुरू झाली .शेवटी थोडे का होईना परंतु शिखराच्या दिशेने वाटचाल करण्याचे एकमताने ठरले .तुकडी पुढे मार्गक्रमण करू लागली .दुपारी तर हवा फारच खराब झाली .चार वाजता इतके ढग दाटून आले की रात्र झाल्यासारखी वाटू लागली .बर्फाचे कडे कोसळू लागले.वादळामुळे एकेकजण दूर भिरकावला गेला .वादळ संपेपर्यंत ज्यांने त्यांने आहे तिथेच पाय रोवून घट्ट उभे राहावे याशिवाय दुसरा काही उपाय नव्हता . या वादळामुळे अजय त्यांच्या तुकडी पासून जरा जास्तच दूर फेकला गेला होता .त्याच्या पाठीवरील सॅकमध्ये अत्यावश्यक सामान होते.तुकडी पासून जरी आपण काही कारणामुळे दूर गेलो तरी दोन तीन दिवस व्यवस्थित जगता यावे एवढी व्यवस्था त्या प्रत्येकाच्या पाठीवरच्या सामानामध्ये केलेली होती .जरा आडोसा पाहून अजय तिथेच थांबला. एका खडकांमध्ये त्याने त्याच्याजवळची लहानशी पहार ठोकली .त्या पहारीला असलेल्या भोकांमध्ये नायलॉनची दोरी टाकून गाठ मारली.दोरीचे दुसरे टोक आपल्या मनगटाला व्यवस्थित बांधले .एखाद्या वेळी जरी आपण बर्फावरून काही कारणाने घसरलो,पायाखालील बर्फ अकस्मात तुटून पडला, तरी आपण सुरक्षित राहावे अशी त्यामागे कल्पना होती.आकाशात ढगांची दाटी तशीच होती .मधून मधून पाऊस व बर्फ पडत होता .एकंदरीत रात्र व्यवस्थित जाईल असे वाटत नव्हते . तुकडीतील पांगलेल्या लोकांना एकत्र येणे अशक्य होते.रात्र झाली. रात्री न झोपता जागे रहाणे आवश्यक होते.झोपेमध्ये बर्फात गाडले जाण्याचा संभव होता .अजयने पाठीवरील सॅकमधुन काही आवश्यक खाणे काढून खाल्ले. एवढ्यात त्याच्यावर आकाश कोसळले .तो जिथे बसला होता तो बर्फाचा कडा तुटला .कड्याबरोबर अजय खोल दरीमध्ये फेकला गेला .सर्वत्र दाट काळोख पसरला होता .गुरुत्वाकर्षणामुळे अजय खोल खोल खेचला जात होता. आपण दरीत आपटून मरणार याची अजयला खात्री पटली .नकळत त्याने देवाचा धावा मनातल्या मनात सुरू केला .या संकटातून तारले तर देवच आपल्याला तारील याची त्याला खात्री होती.त्याच क्षणी त्याची दरीमध्ये होणारी घसरण थांबली .त्याच्या मनगटाला एक जोरदार हिसका बसला .त्याच्या खांद्यातून जबरदस्त कळ निघाली .तो दोरीच्या आधाराने दरीमध्ये लोंबकळू लागला. सुरक्षिततेसाठी हाताला बांधलेली दोरी व खडकांमध्ये ठोकलेली पहार तो त्या अंतिम क्षणी विसरून गेला होता .स्वतःला वाचविल्याबद्दल त्याने देवाचे मनःपूर्वक आभार मानले .जीवघेण्या प्रचंड गोठवून टाकणार्‍या थंडीमध्ये चारी बाजूला बर्फ पसरलेला असताना मनगटाला बांधलेल्या दोरीला सकाळपर्यंत जिवंत लोंबकळत राहणे फार कठीण होते. त्याने मनातल्या मनात ईश्वराचा धावा केला .स्वतःला वाचविल्याबद्दल त्याचे आभार मानले .त्याच वेळी आकाशातून त्याच्या कानावर पुढील शब्द पडले .*"जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या जवळ मी नेहमीच असतो."

* अजयला त्याच्या पूर्वानुभवानुसार आपण असेच जर सकाळपर्यंत लोंबकळत राहलो तर गोठून मरून जाऊ याची खात्री होती . काळोख इतका दाट होता की खाली जमीन कुठे आहे किती खोल आहे ते काहीही कळत नव्हते .

* त्याने पुन्हा ईश्वराची करुणा भाकली देवा मला सकाळपर्यंत जिवंत ठेव.*

* आकाशातून स्पष्ट परंतु हळू आवाजात शब्द आले तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे का ?*

* परमेश्वर आपल्याजवळ बोलत आहे हे पाहून अजय आश्चर्यचकीत झाला .*

* अजय म्हणाला अर्थात माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे .*

* पुन्हा अज्ञातातून शब्द आले मग आपल्या कमरेला बांधलेली सुरी काढ आणि मनगटाला बांधलेली दोरी कापून टाक .*

अजयला आपल्याला खरेच असे शब्द ऐकू आले का? याची खात्री पटेना .परंतु त्याला अज्ञातातून तसे हळुवार शब्द आल्याचे स्वच्छ आठवत होते .त्याचा विश्वास बसेना देव आपल्याला असे कसे सांगेल ?दोर कापला की आपण दरीमध्ये खोल कोसळणार .आपला तत्क्षणी मृत्यू होणार .त्यापेक्षा असेच लोंबकळत राहू.न झोपण्याचा आटोकाट प्रयत्न करू .जिवंत राहण्याचा प्रयत्न करू .त्या उपर परमेश्वराची जशी इच्छा असेल त्याप्रमाणे होईल . थोड्याच वेळापूर्वी ईश्वराने काय सांगितले ते तो विसरून गेला होता. क्षणापूर्वी परमेश्वराने सांगितलेली इच्छा की "तू तुझ्या मनगटाला बांधलेला दोर कापून टाक"तो सोयीस्करपणे विसरून गेला होता . सकाळ झाली. स्वच्छ सूर्यप्रकाश पडला.आकाशात कुठेही अभ्रे नव्हती .अजयच्या तुकडीतील लोक अजयला शोधीत होते .खडकात ठोकलेल्या दोरीच्या साह्याने त्यांनी अजयचा शोध लावला .गोठवणाऱ्या थंडीत लोंबकळलेल्या अवस्थेमध्ये अजय गोठून गेला होता .तो मृत्यू पावला होता . त्याच्या पायापासून तीन फुटावर जमीन होती . जर त्याने परमेश्वराच्या इच्छेनुसार दोर कापला असता तर तो जिवंत रहाला असता. ईश्वराने त्याला दोर काप असे सांगितले होते. आपण सोयीस्करपणे ईश्वरावर विश्वास ठेवीत असतो .संतांनी अनेकदा आपला भार संपूर्णपणे ईश्वरावर टाका असे सांगितले आहे.परंतु आपण आपला संपूर्ण भार ईश्वरावर टाकत नाही .तू तार किंवा तू मार मी कशालाही तयार आहे .हे फक्त बोलण्याचे शब्द राहतात .आपण विश्वास विश्वास असे म्हणताना कुठेतरी अविश्वास अविश्वास असे म्हणत असतो .परमेश्वराची भागलेली करुणा आपमतलबी असते .

जोपर्यंत आपल्याला हितकर वाटत आहे तोपर्यंत आपला विश्वास असतो .जेव्हा आपल्याला अनिश्चितता वाटते त्यावेळी आपला देवावरचा विश्वास डळमळीत होतो. ही वस्तुस्थिती आहे . *आपण खऱ्या अर्थाने नास्तिकही नसतो आणि आस्तिकही नसतो.*

*नास्तिक कुठे तरी नियती, दैव, निसर्ग, अज्ञात शक्ती,परमेश्वर यावर विश्वास ठेवीत असतो.*

*तर तथाकथित आस्तिक देवावर संपूर्ण विश्वास भार कधीही ठेवीत नसतो.*

*बोलताना आपण तू तार किंवा तू मार असे म्हणतो परंतु प्रत्यक्षात मी बरेच काही करू शकतो असे आपल्याला वाटत असते .*

*अजय प्रमाणे आपण अधांतरी लोंबकळत असतो* तुम्ही देव मानता की नाही मला माहीत नाही .देव म्हणजे काय आहे याची तुमची कल्पना मला माहित नाही . आपापल्या धर्माप्रमाणे तुम्ही अल्ला येशू बुद्ध भगवान राम कृष्ण किंवा आणखी काही बहुधा मानत असता.आपल्यापैकी बरेचजण असा विश्वास ठेवतात कि अशी काही एक शक्ती आहे की जी सर्व विश्वाचे नियंत्रण करीत असते . हा ज्याच्या त्याच्या विश्वासाचा प्रश्न आहे .ईश्वर म्हणून काही तत्त्व आहे की नाही माहीत नाही .*ते* जे जाणतात असे आपल्याला वाटते त्यांच्यावर आपण विश्वास ठेवीत असतो. प्रत्येकाला त्याचा म्हणून "आतला आवाज" असतो याची मला खात्री आहे. सत्य असत्य ,योग्य अयोग्य, चांगले वाईट, कृती योग्य कृती अयोग्य, याची जाण प्रत्येकाला असते.जो अंतरंगात खरेच डोकावून पाहतो त्याला हा आवाज ऐकू येतो.या आवाजाकडे आपण बरेच वेळा स्वार्थापोटी दुर्लक्ष करीत असतो .आपण दुर्लक्ष का करतो याचे अापण समर्थनही करीत असतो. हे समर्थन लटके आहे, ही केवळ स्वतःची व दुसऱ्याची समजूत घालणे आहे,हेही आपल्याला चांगलेच कळत असते परंतु जाणून बुजून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो .आपण त्याकडे कानाडोळा करतो . प्रत्येकाने जर अंतरंगात डोकावले ,आतला आवाज काय आहे हे जाणून घेतले ,तर जग खरेच मंगलमय होईल .माणूस माणुसकी विसरला आहे असे जेआपण म्हणतो ते खोटे ठरेल . *अजय जवळ अज्ञातातून ईश्वर जसा हळूवारपणे बोलत होता तसाच तो प्रत्येकाजवळ बोलत असतो .* *तो आवाज लक्षात येणे ,नेहमी ऐकू येणे, त्याप्रमाणे आपण स्वाभाविक स्वयंभूपणे आचरण करणे जेव्हां वास्तवात येईल ,तीच सत्ययुगाची सुरुवात असेल.* १३/३/२०१९©प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel