बुद्धाची संक्षिप्त माहिती
३६. बुद्धाची पुष्कळशी माहिती अलिकडे सामान्य जनांनाहि उपलब्ध झाली आहे. तथापि ‘बुद्धचरितकाव्य’ व ‘ललितविस्तार’ह्या दोन ग्रन्थांच्या आधारानें बहुतेक बुद्धचरित्रें लिहिलीं गेलीं असल्यामुळें बुद्ध हा एका मोठ्या राजाचा मुलगा होता इत्यादिक दंतकथांपासून तीं अगदीं अलिप्त नाहींत. तेव्हां पालिग्रन्थांच्या आधारें बुद्धचरित्रासंबंधींची संक्षिप्त माहिती येथें देणें योग्य वाटतें.
३७. कोसल देशाच्या उत्तरेला शाक्य नांवाच्या क्षत्रियांचें एक लहानसें गणसत्ताक राज्य होतें. त्यावेळीं अशा प्रकारचीं तीन चार राज्यें अस्तित्त्वांत होतीं. ह्या गणसत्ताक राज्यांत परंपरागत राजसत्ता नसे. गांवोगांवचे अधिकारी जमीनदार असत. त्यांना राजा म्हणत. ते एकत्र होऊन एक अध्यक्ष निवडीत. य अध्यक्षाला महाराजा म्हणत. तो अमुकच वर्षांपुरता निवडला जात असे असें नाहीं. जोंपर्यंत सर्व राजांची संमति त्याला मिळे, तोंपर्यंत तो अध्यक्षाचें काम करी; नाहींतर दुसरा अध्यक्ष निवडला जात असे. महत्त्वाच्या कामांत सर्व राजसंघाची संमति घेण्यांत येत असे, व इतर कामें हा अध्यक्ष व सेनापति वगैरे अधिकारी पाहत असत.
३८. बुद्धजन्मापूर्वीच कपिलवस्तूच्या शाक्यांचे स्वातंत्र्य संपुष्टांत येत चाललें होतें. त्यांना एक प्रकारचें ‘होमरूल’ असे पण एखाद्याला फांशी देण्याचा किंवा हद्दपार करण्याचा अधिकार राहिला नव्हता. त्यासाठीं कोसल महाराजाची परवानगी घ्यावी लागत असे. मगध देशाच्या पूर्वेकडील अंग राजांचीहि हीच स्थिति होती. त्यांचा अंतर्भाव मगध देशांतच होत होता. काशी देशाचेंहि स्वातंत्र्य नष्ट होऊन त्याचा अन्तर्भाव कोसल देशांत झाला होता. पावा व कुशिनारा येथील मल्लांचीं व वैशाली येथील वज्जींचें अशीं तीन गणसत्ताक राज्यें मात्र अद्यापि स्वतंत्र राहिलीं होतीं. कोसल देशांत व मगध देशांत सार्वभौम राज्यपद्धति दृढ होत चालली होती.
३९. अशा परिस्थितींत कपिलवस्तूपासून चौदा पंधरा मैलांच्या अंतरावर असलेल्या शुद्धोदन (जमीनदार) राजाच्या मायादेवी नांवाच्या राणीच्या उदरीं गोतमाचा (बुद्धाचा) जन्म झाला. बुद्धचरितकाव्यांत व ललितविस्तारांत त्याला सर्वार्थसिद्ध किंवा सिद्धार्थ हीं नावें दिलीं आहेत. पण तीं प्राचीन पालिग्रंथांत मुळींच सांपडत नाहींत. सर्व ठिकाणी त्याला गोतम हेंच नाव देण्यांत आलें आहे, व तेंच त्याचें खरें नांव असावें.
४०. बोधिसत्त्व ( म्हणजे भावी बुद्ध) ह्याहि नांवाने पालिग्रंथांत गोतमाचा उल्लेख आहे. पुढें जेव्हां तो बुद्ध झाला तेव्हांपासून त्याला भगवान् म्हणूं लागले. बोधिसत्त्वाला तीन ऋतूंत रहाण्याला तीन घरें होतीं असें वर्णन अंगुत्तर निकायांत सांपडतें. तसें असणें शक्य आहे. कां कीं, शुद्धोदन राजा जरी मोठा राजा नसला, तरी एक सधन जमीनदार होता.
४१. अंगुत्तर निकायांत तिकनिपातांत बुद्ध भगवान् भिक्षूंना उद्देशून म्हणतो, “भिक्षुहो, मी फार सुकुमार होतों. माझ्या सुखासाठी माझ्या पित्यानें तलाव खणून त्यांत नाना-जातींच्या कमळिणी लावल्या होत्या. माझी वस्त्रें-प्रावरणें रेशमी असत. शीतोष्णाची बाधा न व्हावी म्हणून बाहेर निघालों असतां माझ्यावर माझे नोकर श्वेतच्छत्र धरीत असत. हिंवाळ्यासाठीं, उन्हाळ्यासाठीं व पावसाळ्यासाठीं माझे निरनिराळे तीन प्रासाद होते. मी जेव्हां पावसाळ्यासाठीं बांधलेल्या महालांत रहाण्यात जात असें, तेव्हां चार महिने बाहेर न पडतां स्त्रियांच्या गीतांनी व वाद्यांनी कालक्रमण करीत असें. इतरांच्या घरीं दासांना आणि नोकरांना निकृष्ट अन्न देतात. परंतु माझ्या घरी माझ्या दासदासींना उत्तम मांसमिश्रित अन्न मिळत असे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.