६. यावरून असें दिसून येईल कीं, आहिंसा किंवा दया हा एक तपाचरणाचा प्रकार होता, आणि  तें तप आचरण करणारे बुध्दकालापूर्वीं एक दोन शतकें तरी अस्तित्वांत होते. त्यांपैकीं कृष्णाचा गुरू घोर आंगिरस – किंवा जैनांच्या म्हणण्याप्रमाणें नेमिनाथ – हा एक असणें  संभवनीय आहे. पण त्यांचे संघ नव्हते; व संघटितपणें अहिंसेचा प्रचार करण्याचा ते प्रयत्न करीत नसत. त्यामुळें कुरु देशांत यज्ञयागाचें स्तोम माजलें, व अहिंसेचें वातावरण नष्ट झालें.

७. जैनांचा तेवीसावा तीर्थंकर पार्श्व, हा ऐतिहासिक आहे असें बहुतेक पाश्चात्य पंडितांचें मत आहे. त्याच्या चरित्रांतहि दंतकथा आहेतच. परन्तु त्या पूर्वींच्या तीर्थंकरांच्या चरित्रांतील दंतकथांपेक्षां पुष्कळच कमी आहेत. पार्श्वाचें शरीर नऊ हात उंच होतें; आयुष्य शंभर वर्षे होतें; सोळा हजार साधु शिष्य, अडतीस हजार साध्वी शिष्य, एक लक्ष चौसष्ट हजार श्रावक, व तीन लक्ष एकोणचाळीस हजार श्राविका होत्या. या सगळ्यांत मुख्य ऐतिहासिक भाग म्हटला म्हणजे चोविसाव्या वर्धमान तीर्थंकराच्या जन्मापूर्वीं एकशें अठ्ठयाहत्तर वर्षें पार्श्वतीर्थंकराचें परिनिर्वाण झालें.

८. वर्धमान किंवा महावीर तीर्थंकर बुध्दसमकालीन होता, हें सर्वविश्रुतच आहे. बुध्दाचा जन्म वर्धमानाच्या जन्मानंतर कमींत कमी पंधरा वर्षंनी झाला असला पाहिजे. म्हणजे बुध्दाचा जन्म आणि पार्श्व तीर्थंकराचें परिविर्वाण यांच्यामध्यें एकशें त्र्याण्णवद वर्षांचा फरक पडतो. पार्श्व तीर्थंकर मरणापूर्वीं पन्नास वर्षे तरी उपदेश करीत असावा. म्हणजे बुध्दजन्मापूर्वीम सरासरी दोनशें त्रेचाळीस वर्षें पार्श्व मुनीनें उपदेशाला सुरूवात केली. निर्ग्रंथ श्रमणांचा संघहि प्रथमत: त्यानेंच स्थापन केला असावा.

९.परिक्षित् राजाचा काळ बुध्दापूर्वीं तीन शतकें जाऊं शकत नाहीं, हें वर दाखविलेंच आहे.१. परिक्षित् राजानंतर जनमेजय आला, व त्यानें कुरू देशांत महायज्ञ करून वैदिक धर्माची ध्वजा उभारली. त्याच सुमारास काशी देशांत पार्श्व एका नव्या संस्कृतीचा पाया घालीत होता. पार्श्वाचा जन्म वाराणसी नगरीत अश्वसेन राजाच्या वामा नांवाच्या राणीच्या उदरीं झाला अशी कथा जैन ग्रंथांत आहे.२ ( २ श्रीकाललोकप्रकाश, सर्ग ३२।८८७-८८ ). त्याकाळीं राजा म्हणजे अधिकारी जमीनदार असे. तेव्हां अशा एका राजाला हा मुलगा झाला असल्यास नवल नाहीं. पार्श्वची नवीन संस्कृति काशी राष्ट्रांत टिकाव धरून राहिली असावी. कां कीं, बुध्दालाहि आपले पहिले शिष्य शोधून काढण्यासाठी वाराणसील यावें लागलें.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ वि० १।१०४ पहा )
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१०. पार्श्वाचा धर्म अगदीं साधा होता. हिंसा, असत्य, स्तेय व परिग्रह या चार गोष्टींचा त्याग करावा असा तो उपदेश करी.१ ( १ पार्श्वाच्या उपदेशाला चातुर्यामसंवरवाद म्हणत. वि० २।२ व २८ पहा ). इतक्या प्राचीन काळीं अहिंसेला सुसंबध्द स्वरूप दिल्याचें हें पहिलेंच उदाहरण आहे.

११. सिनाई पर्वतावर मोझेसला परमेश्वरानें ज्या दहा आज्ञा (To Commandments) सांगितल्या त्यांत हत्या करूं नकोस हिचाहि समावेश आहे. परन्तु त्या आज्ञा स्वीकारून मोझेस आणि त्याचे अनुयाची पॅलेस्टाइनमध्यें शिरले, व तेथें त्यांनी नुसत्या रक्ताच्या नद्या वाहविल्या ! किती लोकांची कत्तल केली व कितीतरी तरुण स्त्रिया पकडून नेऊन त्यांना आपल्या लोकांना वांटून दिलें ! ह्या कृत्यांना जर अहिंसा म्हणावयाचें तर मग हिंसा ती कसली ? तात्पर्य पार्श्वापूर्वीं जगांत खर्‍याखुर्‍या अहिंसेनें ओथंबलेला असा कोणताहि धर्म किंवा तत्त्वज्ञाना नव्हतें असेंच म्हणावें लागतें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel