कापालिकांचा पराक्रम
( प्रबोधचन्द्रोदय नाटकावरून)


२३३. होतां होतां शैवांनी-विशेषत: त्यांतील अघोरी पंथानें – जैनांचा आणि बौद्धांचा विध्वंस कसा चालवला याचें वर्णन प्रबोधचन्द्रोदय नाटकाच्या तिसर्‍या अंकांत सांपडतें. तें जरी काव्यमय आहे, तरी त्यांत थोडाबहुत इतिहासाचा अंश असावा, असें वाटल्यावरून त्याचें रूपांतर येथें देतों.

२३४. शान्ति आणि करुणा प्रवेश करतात. श्रद्धेचा थांग न लागल्यामुळें शान्ति अग्निकाष्टें भक्षण करण्याच्या विचारांत आहे. करुणा तिचें सांत्वन करते, व त्या दोघी जणी श्रद्धेच्या शोधासाठीं पाखंडी लोकांच्या मठाकडे वळतात. इतक्यांत क्षपणक पुढें येतो. त्याला पाहून सत्रात करुणा म्हणते-सखि!
राक्षस, राक्षस !

शान्ति – हा कोण राक्षस बरें?

करुणा – पहा, पहा! अंगावर मळ चढल्यामुळें बीभत्स दिसणारा, डोक्यावरचे केस उपटून काढल्यामुळें व नागवेपणामुळें ओंगळवाणा, मोराची पिसें हातांत घेऊन याच बाजूला येत आहे !

शान्ति - सखि!  हा राक्षस नाहीं. हा बिलकूल निर्वीर्य दिसतो.

करुणा - तर मग हा कोण असूं शकेल?

शान्ति – सखि!  हा पिशाच असावा अशी शंका येते.

करुणा – पण सखि! येवढ्या भर दिवसा सूर्य उत्तम रीतीनें प्रकाशत असतां पिशाचांना अवकाश कुठला?
शान्ति – तर मग नुकताच नरकांतून वर निघालेला नरकवासी प्राणी असावा. ( त्याच्याकडे पाहून व विचार करून) हां, समजलें. महामोहानें पाठविलेला हा दिगंबरसिद्धांत आहे. यासाठीं याचें दर्शन दूरूनच त्यजावें. ( असें म्हणून तोंड फिरवते.)
करुणा - सखि! जरा थांब. इथें मी जरा श्रद्धेचा शोध करतें.

२३५. ( त्या बाजूला उभ्या रहातात. त्यानंतर वर वर्णिल्या प्रमाणें दिगंबरसिद्धांत प्रवेश करतो.)

दिगंबर – ॐ णमो अलिहन्ताणं. ( आकाशाकडे पाहून) अरेरे श्रावका, ऐका. ह्या आमच्या मलमय पुद्नलपिंडाची सगळ्या तर्‍हेच्या पाण्यांनीहि शुद्धि कशी होईल? पण आत्मा विमल स्वभाव आहे; आणि त्याचें ज्ञान ऋषिपरिचर्येनें होतें. काय म्हणतां?  ही ऋषिपरिचर्या कोणती? तर मग ऐका. दूरून पायां पडावें, आणि त्यांना सत्कारपूर्वक मिष्टान्न भोजन द्यावें. जर त्यांनी तुमच्या बायकांशी अतिप्रसंग केला, तर तुमच्या मनांत ईर्ष्यामल उत्पन्न होऊं देऊं नये. ( पडद्याकडे पाहून) श्रद्धे, जरा इकडे ये.

२३६. ( शांति आणि करुणा भयभीत होऊन तिकडे पहातात. त्यानंतर दिगंबरवेषाला साजेसा पोशाख धारण करणारी श्रद्धा प्रवेश करते.)

श्रद्धा - महाराजांची काय आज्ञा आहे? ( हें ऐकून शांति मूर्च्छित होऊन पडते.)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel