१२८. परन्तु या महाभारताचा काळ ठरविणें जवळ जवळ अशक्य आहे. त्यांत मूळ भाग कोणता व प्रक्षिप्त कोणता याचें पृथक्करण करणें कोणालाहि शक्य नाहीं. तथापि भारतकाव्याला महाभारताचें स्वरूप गुप्तांच्या कारकीर्दींत आलें, यांत शंका नाहीं. कां कीं, त्यांत हूणांचा निर्देश अनेक ठिकाणीं सांपडतो. हूणाशीं सामना स्कन्दगुप्ताला करावा लागला. इ.स. ४५५ च्या सुमारास त्यानें हूणांचा पराभव केला असें त्याच्या भितारी शिलास्थंभलेखावरून दिसून येतें. तरी हूणांच्या स्वार्‍या इ.स. ५२८ पर्यंत चालू होत्याच.१   ह्या काळांत किंवा ह्या कालानंतर भारताला सध्याचें स्वरूप येत चाललें, असें समजण्यास हरकत नाहीं. तथापि इ.स. तेराव्या शतकापर्यंत त्यांत एकसारखी भर पडत चालली असावी.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ The Early History of India pp. 326-337.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१२९. वनपर्वांतील १९० वा ( कुंभकोण, १९३ वा ) अध्याय किंवा त्यांतील बराच मजकूर महंमद घोरीच्या स्वार्‍यांनंतर लिहिला असावा असें दिसतें. कित्येक पंडितांची समजूत अशी आहे कीं, हा सर्व अध्याय बौद्धांना उद्देशून आहे. ही चूक होण्याला मुख्य कारण ‘एडूकान्पूजयिष्यन्ति’ हें वाक्य झालें आहे. पाश्चात्य विद्वानांनी ‘ऐडूक’ शब्दाचा अर्थ बौद्धांचे स्तूप असा केल्यानें व त्यांचीच री आमच्याकडील पौरस्त्य पंडितांनी ओढल्यामुळें हा सर्व घोटाळा झाला.

१३०. एडूक शब्दाचा अर्थ स्तूप असा बौद्ध वाङ्मयांत किंवा वैदिक वाङ्मयांत सांपडत नाहीं. ‘भित्ति: स्त्री कुड्यमेडूकं यदन्तर्न्यस्तकीकसम्’ हें अमरकोषाचें वाक्य. त्याचा अर्थ असा कीं, ‘भित्ति शब्द स्त्रीलिंगी, कुड्य हा पण भित्तिवाचक शब्द; त्यांत आणि एडूक यांत एवढाच भेद कीं, ज्या भिंतींत कठिण पदार्थ घातलेला असतो तिला एडूक म्हणतात.’ कीकस शब्दाचा साधा अर्थ हाड असा आहे. परंतु येथें तो उपलक्षणेनें कठिनद्रव्यवाचक आहे असें टीकाकाराचें (महेश्वर भट्टाचें) म्हणणें;२  आणि तें अगदीं रास्त आहे. ज्या भिंतींत बळकटीसाठीं लाकडाचा किंवा बांबूंचा सांगाडा घालतात, किंवा दगडांचे वगैरे मधून मधून खांब घालतात, त्या भिंतीला एडूक म्हणावें, असा याचा सरळ अर्थ आहे. परंतु पाश्चात्य पंडितांनी कीकस याचा अर्थ हाड असा घेतल्यामुळें एकदम त्यांची बुद्धि बौद्धांच्या स्तूपाकडे धांवली, व भिंतीला एडूक म्हणतात हें ते पार विसरून गेले; आणि भिंत व स्तूप यांच्यामध्ये महदंतर आहे, हें त्यांच्या मुळींच लक्ष्यांत राहिलें नाहीं.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२ कीकसं कठिनद्रव्यस्योपलक्षणम्
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१३१. तर मग हे वरील अध्यायांत सांगितलेले एडूक कोणते? ह्या अध्यायाचें नीटपणें अवलोकन केल्यास त्याचें उत्तर देणें कठिण नाहीं.

म्लेच्छीभूतं जगत्सर्वं निष्क्रियं यज्ञवर्जितम् |
भविष्यति निरानन्दमनुत्सवमथो तथा ||२९||

(सर्व जग म्लेच्छमय होणार. त्यांत यज्ञयागादिक क्रिया, आनन्द व उत्सव रहाणार नाहींत.) हिंसात्मक यज्ञयागादिक क्रिया जरी बौद्धांच्या काळीं नष्ट झाल्या असल्या, तरी त्या अहिंसात्मक अग्निहोत्रादिकांच्या रूपानें चालू होत्याच. आनन्दमय उत्सव हे तर प्रथमत: अशोक राजानें सुरू केलें.१  बौद्धांच्या विहारांतून तें आजलाहि चालू आहेत. अशाच एका बौद्ध उत्सवामुळें १९१५ सालीं सिलोनमध्यें बौद्धांत व मुसलमानांत भयकर दंगा झाला. तेव्हां बौद्धांच्या वेळीं आनन्दमय उत्सव बंद पडतील, असें भविष्य वर्तवणें हें पूर्णपणें चुकीचें आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ ते अज देवानं प्रियस प्रियदसिनो राञो धंमचरणेन भेरीघोसो अहो धंमघोसो || चतुर्थशिलालेख||
“कनोज राजधानीच्या आग्नेयेस एक भव्य विहार आहे. त्याचा पाया दगडी, भिंती विटांच्या व उंची २०० फूट आहे... त्याच्या दक्षिणेला थोड्या अंतरावर आदित्यदेवाचें मंदिर, आणि त्याच्या दक्षिणेला थोड्या अंतरावर महेश्वराचें मंदिर आहे. ह्या तीन ठिकाणीं प्रत्येकीं झाडू देण्यास व पाणी वगैरे आणण्यास १००० नोकर आहेत; आणि ह्या मंदिरांतून रात्रं-दिवस वाद्यांचा व गाण्याचा गजर सारखा चालू असतो.” (Buddhist Records ii, 222-223).  ह्या ह्युएन् त्संगच्या वर्णनावरून त्याच्या वेळींहि बौद्धमंदिरांत वाद्यगानाचा जयघोष चालत असे हें स्पष्ट आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel