२५१. परंतु परदेशांत प्रवास करण्याचें सामर्थ्य ब्राह्मणांमध्यें किंवा श्रमणांमध्येंहि मुळींच राहिलें नव्हतें. ज्या श्रमणांनी हिमालयावरून खोटानसारख्या निर्जल आणि निर्जन प्रदेशांतून प्रवास करून चिनी लोकांना बौद्ध धर्म शिकविला, तेच श्रमण आपल्या संघारामाच्या तटाच्या आंतच सर्व विश्व आहे असें समजूं लागले होते!  किंबहुना हे संघाराम म्हटले म्हणजे त्यांच्यासाठीं जणूंकाय सापळेच होऊन बसले होते!  मुसलमानांच्या स्वार्‍या जेव्हां या देशावर होऊं लागल्या, तेव्हां त्यांना संघारामांच्या सापळ्यांत सांपडलेल्या भिक्षूंचा संहार करणें अति सोपें झालें. अशा एका संघारामाचा उच्छेद महंमद बख्त्यार यानें केल्याचा उल्लेख वर आलाच आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ ( १ वि० ३।१३७.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२५२. मुसलमानांनी बौद्धांच्या मठांबरोबरच जैनांच्या आणि शैवांच्याहि मठांचा उच्छेद केला असला पाहिजे. बौद्ध श्रमणांना नेपाळ व तिबेट या ठिकाणी आश्रयस्थान असल्यामुळें मुसलमानांच्या कत्तलींतून जे कोणी भिक्षु बचावले, त्यांनी त्या देशांचा आश्रय धरला. त्याचा परिणाम एवढाच झाला कीं, हिंदी आणि तिबेटियन भिक्षूंच्या सहकारानें तिबेटियन वाङ्मयांत पुष्कळ भर पडली. आजला जे बौद्ध ग्रंथ संस्कृतांत सांपडत नाहींत, त्या सर्वांचीं भाषांतरे तिबेटियन भाषेंत सांपडतात.

२५३. परंतु जैन आणि शैव संन्याशांना आपला वेष पालटून ह्याच देशांत कोठेंतरी दडून बसण्याची पाळी आली असावी. ह्या दोन्ही पंथांचें पुनरुज्जीवन झालें खरें, परंतु त्यांत मुळींच दम राहिला नाहीं. बौद्ध आणि जैन श्रमणांच्या अनाचारामुळें लिंगपूजा व मनुष्याचें बलिदान करणारा कापालिकांसारखा शैव पंथ निघाला. लोखंडाचा गंज जसा लोखंडाला खाऊन टाकतो व शेवटीं स्वत: हि धुळींत मिळून जातो, त्याप्रमाणें मुसलमानांच्या कारकीर्दींत हा पंथ देखील बौद्ध आणि जैन श्रमणांबरोबरच जमीनदोस्त होऊन गेला.

२५४. सोन्याच्या, रुप्याच्या व तांब्याच्या मूर्ति मुसलमानी कारकीर्दीत गडप झाल्या. एक तेवढें महादेवाचें लिंग, व आजुबाजूला कोठें तरी इतर देवतांच्या कांहीं मूर्ति शिल्लक राहिल्या असाव्यात. पण ब्राह्मण जिकडे तिकडे थोड्याबहुत प्रमाणांत राहिलेच होते. तेव्हां त्यांचा पुजारीपणाचा धंदा चालू ठेवण्यासाठीं गयेच्या विष्णुपदासारखीं पुजाचिन्हें व शक्य असेल तेथें देवतांच्या नवीन मूर्ति उत्पन्न करून त्यांनी आपला व्यवसाय चालू ठेवला. मात्र श्रमणसंस्कृति ह्या देशांतून पार नष्ट झाली. आजला हिंदुस्थानांत असलेले जैन साधु, आणि सर्व हिंदुस्थानभर पसरलेले शैव व वैष्णव महंत, यांना श्रमणसंस्कृतीचे पुरस्कर्ते म्हणणें बरोबर होणार नाहीं. कां कीं, आपली संस्कृति फैलावण्याचा त्यांचा प्रयत्‍न दिसून येत नाहीं. कोणा तरी गरिबांच्या मुलांना आपले चेले करून आपली परंपरा कशी-बशी चालू ठेवावी, एवढाच कायतो त्यांचा प्रयत्‍न दिसतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel