११३. ह्या मुसलमान लोकांनी अशा प्रकारें अनेक वेळां या मूर्तीचा उच्छेद केला असला तरी सूर्याची पूजा मुलतान येथें औरंगजेबापर्यंत चालू होती असें दिसतें. औरंगजेबानें हें मंदिर तोडल्यावर मात्र ती पूजा नामशेष झाली. तात्पर्य इ. स. सतराव्या शतकापर्यंत मूर्तीच्या रूपानें सूर्याची पूजा अस्तित्वांत होती; व आजलाहि ती कांहीं ठिकाणीं सूर्यनमस्कारांच्या रुपानें चालू आहे.

११४. निद्देसाच्या वेळीं इंद्र, ब्रह्मा व अनेक देव यांची पूजा होत असे, हें सांगावयास नकोच. दिशांची पूजा करण्याचा परिपाठ बुद्धाच्या वेळीं होताच. त्याचा उल्लेख दीघनिकायांतील सिगालोवाद सुत्तांत सांपडतो. ती पूजा निद्देसापर्यंत चालू होती. त्यानंतर ती कोणत्या काळापर्यंत चालू राहिली हें सांगतां येत नाहीं.

११५. निद्देसानंतर वासुदेवाचा उल्लेख पाणिनिव्याकरणामध्यें सांपडतो, तो असा-‘वासुदेवार्जुनाभ्यां वुन्’ ४|३|९८.  ह्या सूत्राचा अर्थ असा कीं, वासुदेवामध्यें ज्यांची भक्ति त्यांना वासुदेवक म्हणतात; व अर्जुनामध्यें ज्यांची भक्ति त्यांना अर्जुनक म्हणतात.

११६. बेसनगर येथें एक शिलास्तंभ सांपडला आहे. त्यावर जो शिलालेख आहे त्यावरून असें दिसतें कीं, वासुदेवाच्या पूजेसाठीं हेलियोदोर यानें भागभद्र महाराजाच्या वेळीं तो शिलास्तंभ किंवा गरुडध्वज उभारला. ह्या लेखांत वासुदेवाला देवांचा देव म्हटलें आहे. हा शिलालेख ख्रिस्ती शकाच्या पूर्वीं पहिल्या किंवा फार झालें तर दुसर्‍या शतकांतील असावा.

११७. निद्देसाच्या उतार्‍यांत, पाणिनीच्या व्याकरणांत व या शिलालेखांत सांपडणार्‍या वासुदेवाच्या उल्लेखावरून सर भांडारकर असें सिद्ध करूं पहातात कीं, ख्रिस्ती शकाच्या पूर्वीं तिसर्‍या शतकांत वासुदेवाच्या भक्तीचा पंथ अस्तित्वांत होता. भगवद्‍गीता व एकांतिक धर्माची स्थापना त्याच वेळीं झाली असें त्यांचें म्हणणें.१  पण त्यांच्या ह्या पुराव्यानें आमचें समाधान झालें नाहीं, असें निरुपायानें म्हणावें लागतें. त्यांचें म्हणणें बरोबर नाहीं एवढें दाखवण्यासाठींच वरील निद्देसाच्या उतार्‍याचें वर्णन विस्तारपूर्वक करण्यांत आलें आहे. त्यावरून असें दिसून येईल कीं, वासुदेव ही देवता त्या वेळीं पूर्णभद्र, बलभद्र, नाग, सुपर्ण वगैरे देवतांइतकीच प्रसिद्ध होती. म्हणजे त्या पूजेला फारसें महत्त्व नव्हतें.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ Vaishnavism etc. p. 5.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
११८. वासुदेवाच्या भक्तांना भागवत म्हणण्यांत आलें आहे, यावरून वासुदेवभक्तांचा एक मोठा पंथ होता असें समजण्याचें कांहीं कारण नाहीं. वासुदेवांच्या भक्तांना वासुदेवभागवत म्हणत. त्याचप्रमाणें शिवाच्या भक्तांना शिवभागवत म्हणत असत. ‘अय:शूलदण्डाजिनाभ्यां ठकठञौ’ ५|२|७६,  ह्या सूत्राची चर्चा करतांना पतंजलि शिवभागवतांचा उल्लेख करतो. त्यावरून असें दिसतें कीं, हे शिवभागवत हातांत एक लोखंडाचा त्रिशूळ घेऊन फिरत असत. ते शिवाची मूर्ति दारोदार फिरवून आपली उपजीविका करीत हें ‘जीविकार्थे चापण्ये’ ५|३|९९, ह्या सूत्राच्या भाष्यावरून सिद्ध होतें. तेव्हां शिवभागवत जसे त्रिशूळ व शिवाची मूर्ति घेऊन आपला निर्वाह करीत, त्याचप्रमाणें वासुदेवक किंवा वासुदेवभागवतहि कांहीं विशेष चिन्हें धारण करून व वासुदेवाची मूर्ति बरोबर घेऊन दारोदार हिंडून आपला निर्वाह करीत असत असें दिसतें. त्यांच्याशिवाय जे गृहस्थ शिवाची आणि वासुदेवाची पूजा करीत त्यांनाहि शिवभागवत व वासुदेवभागवत म्हणत असत.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel