१४५. “ही कथा ऐकून जनमेजय विचारतो, ‘पण हा अग्नि खांडब वन कां जाळूं पहात होता?’ वैशंपायन त्याला सांगतो, ‘श्वेतकि नावांच्या राजाला यज्ञाची फारच चट लागली. ऋत्विज धुराला कंटाळून यज्ञ सोडून गेले. त्यांच्या परवानगीनें दुसरे ऋत्विज आणून तें यज्ञसत्र संपविण्यांत आलें. त्यानंतर श्वेतकीनें शंभर वर्षें चालू रहाणारें यज्ञसत्र करण्याचा विचार केला. ब्राह्मणांच्या पायां पडला; त्यांना दान दिलें; पण श्वेतकीच्या यज्ञांना ब्राह्मण येईनात. ते रागावून म्हणाले, ‘आम्ही थकून गेलों आहोंत. तूं रुद्रालाच बोलावून तुझा यज्ञ करावयास लाव.’ तेव्हां त्या राजानें कैलासाला जाऊन उग्र तप केलें. त्यामुळें शंकर प्रसन्न झाला, व वर माग म्हणाला. ‘तूंच माझ्या यज्ञांत ऋत्विज हो’, असा श्वेतकीनें वर मागितला. पण महादेवाला याजक होणें शक्य नव्हतें. त्यानें श्वेतकीला बारा वर्षेंपर्यंत सतत तुपाच्या धारांनी अग्निपूजा करण्यास लावलें. त्या प्रमाणें श्वेतकीनें केल्यावर महादेव प्रसन्न झाला आणि म्हणाला, ‘माझाच अवतार दुर्वास ऋषि आतां तुझ्या यज्ञांत ऋत्विज होईल.’

१४६. “त्याप्रमाणें श्वेतकीनें यज्ञाची तयारी केली; व मग महादेवानें दुर्वासाला पाठविलें. तो यज्ञ फार मोठा झाला. त्यामुळें अग्नीला विकार जडला; तो निस्तेज झाला; व त्याला फार ग्लानि आली. ब्रह्मदेवाजवळ जाऊन त्यानें यावर उपाय विचारला. बारा वर्षें आहुति खाल्यामुळें तुला हा रोग जडला, असें सांगून ब्रह्मा म्हणाला, ‘तूं काळजी करूं नकोस. खांड्व वनांतील सर्व प्राण्यांची चरबी खाल्यावर तुला हा रोग बरा होईल.’ अग्नि खांडव वन जाळण्यास आरंभ करी, व तेथील प्राणी तें विझवीत. असा प्रकार सातदां घडला.

१४७. “तेव्हां अग्नि रागावून ब्रह्मदेवापाशीं गेला. ब्रह्मदेवानें त्याला वासुदेवार्जुनांकडे पाठविलें. त्यानंतर कृष्णार्जुनांनी मोठी तयारी करून खांडव वन अग्निसात् करण्याला सुरुवात केली. त्या वेळीं खांडव वनांतील प्राण्यांची कशी स्थिति झाली, याचें भेसूर वर्णन दोनशें अट्ठाविसाव्या अध्यायांत १ आहे. तें वाचून पाहिलें म्हणजे महमूद गझनीच्या स्वार्‍यांचीं वर्णनें त्याच्यासमोर अगदींच फिकीं वाटतात. अशा संकटसमयीं तेथील प्राणी इंद्राला शरण गेले. इंद्रानें एकदम पावसाचा वर्षाव केला. पावसाला अडथळा करण्याकरितां अर्जुनानें बाणांनी आकाश आच्छादूत टाकलें. त्या वेळीं तक्षक नाग कुरुक्षेत्रांत होता. त्याचा मुलगा अश्वसेन आगींत सांपडला. त्याच्या आईनें त्याला वांचवण्यासाठीं गिळून टाकलें व ती पळूं लागली. अर्जुनानें बाण सोडून तिचें डोकें कापलें. अश्वसेन तिच्या पोटातून बाहेर निघाला. त्याचा बचाव करण्यासाठी इंद्राने वार्‍याचा प्रवाह सोडून अर्जुनाला मोहित केलें. त्यामुळें अश्वसेन बचावला गेला....
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ कुम्भकोण, अ० २५२
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
तस्मिन्वने दह्यमाने षडग्निर्न ददाह च |
अश्वसेनं मयं चैव चतुर: शार्ङ्गकांस्तथा ||

( तें वन जाळलें गेलें असतां अश्वसेन, मय आणि चार शार्ङ्गक म्हणजे शार्ङ्ग पक्षाचीं पिलें, हे सहा प्राणी तेवढे अग्नीनें जाळलें नाहींत. )” १
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ औंध, अ० २३०।४७; कुंभकोण, अ० २५४।४७.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१४८. या कथेचा सारांश तेवढा येथें दिला आहे. त्याच्यावरून असें दिसून येईल कीं, या कथेंत अथपासून इतिपर्यंत ताळतंत्र असा कोठेंच नाहीं. अग्नीला तुपामुळें मांद्य आलें. पण त्याच्यावर उपाय काय, तर खांडव वनांतील प्राण्यांची वसा खाणें. पुष्कळ तूप खाल्यानें उत्पन्न झालेला रोग वसा खाल्ल्यानें बरा होतो ही एक अपूर्वच गोष्ट म्हणावयाची! ब्रह्मदेव सर्व प्राण्यांचा पितामह. पण तोच खांडव वनांतील प्राण्यांना खाण्याचा अग्नीला सल्ला देतो! वासुदेवाचा व अर्जुनाचा खांडव वनांतील प्राण्यांशी कांहीं एक संबंध नाहीं. असें असतां ते तेथील एकूण एक प्राण्यांचा संहार करतात! इतकेंच नव्हे, अश्वसेन पळून गेल्यामुळें खवळून जाऊन ते व अग्नि सगळ्याच नागांना शाप देतात ! इंद्र अर्जुनाचा बाप. इतर ठिकाणीं अर्जुनाचें रक्षण करण्यासाठीं ब्राह्मणवेषानें तो कर्णाची कवचकुंडलें हिरावून घेतो; १  आणि येथें अर्जुनाशींच युद्ध करतो ! तेव्हां अशा असंबद्ध गोष्टी रचणारांची डोकीं ताळ्यावर होतीं की काय, अशी वारंवार शंका येतें.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ औंध, आदिपर्व, अ. १११| २७-२८; कुंभकोण, अ. १२०|४६-४८
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१४९. ह्या गोष्टीच्या मागें लपून बसलेलें थोडेसें सत्य असणें संभवनीय आहे. कृष्णाची व इन्द्राची लढाई झाल्याचा उल्लेख पहिल्या विभागांत आलाच आहे. २ त्यांत इन्द्राला माघार घ्यावी लागली. त्यानन्तर कृष्णानें द्वारकेकडे जाण्याचा प्रयत्‍न केला असावा. पण वाटेंत या खांडव वनांत अशा कांहीं लोकांच्या टोळ्या होत्या कीं, त्या त्याच्या मार्गांत आड येऊं लागल्या. तेव्हां कृष्णानें ह्या वनाला आग लाऊन सर्व वन भस्मसात् केलें, व आपला मार्ग मोकळा करून घेतला. असा कांहीं तरी मूळ प्रकार असून त्याला सध्या महाभारतांत सांपडणारें अत्यन्त विलक्षण व भेसूर स्वरूप आलें असणें शक्य आहे. पण महाभारतांतल्या असल्या गोष्टींतून ऐतिहासिक सत्य शोधून काढणें म्हणजे डांबरांतून साखर काढण्याइतकेंच कठिण काम आहे; आणि अनेक ठिकाणीं तर तें वाळूंतून तेल काढण्याच्या प्रयत्‍नाइतकें निष्फळ आहे. तेव्हां हें महाभारताचें परीक्षण येथेंच सोडून देऊन त्यांतील जें सध्या लोकमान्य झालेलं प्रकरण त्याजकडे वळूं.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२ वि. १|४८-५४.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel