४३.  इंद्राच्या पश्चात् ब्राह्मणांनी ब्रह्मदेवाला मोठ्या पदवीला चढविलें खरें, पण तें त्यांच्या गळीं आलें. असा जो दयामय आणि सर्वगुणसंपन्न ब्रह्मा त्याच्या सायुज्यतेला जाण्याला ब्राह्मणहि दयामय आणि सर्वांशीं समभावानें वागणारे हवेत. हें तर ब्राह्मणांना इष्ट नव्हतें; कारण दृढ होत चाललेल्या जातिभेदांमुळे त्यांना मिळालेलें वर्चस्व सोडण्याला ते तयार नव्हते; मग समभावानें वागणें कसें शक्य होणार? अर्थात् लवकरच त्यांना ह्या ब्रह्मदेवाचा नाद सोडून द्यावा लागला ! एवढा मोठा ब्रम्हा;  त्याचें तेवढें एकच मंदिर अजमीर जवळ पुष्कर येथें शिल्लक राहिलें आहे ! दुसरें एक लहानसें मंदिर बंगाल प्रान्तांत कोठें तरी आहे असें ऐकतों. पण तें फारसें प्रसिद्ध नाहीं.

४४.  कविकुलगुरु कालिदासानें तर ह्या ब्रह्मदेवाची नुसती थट्टाच उडवली आहे. त्याच्या विक्रमोर्वशीय नाटकांत पुरूरवा उर्वशीला पाहून म्हणतो –

अस्या: सर्गविधौ प्रजापतिरभूच्चन्द्रो नु कान्तिप्रद:
श्रृंगारैकरस: स्वयं नु मदनो मासो नु पुष्पाकर: |
वेदाभ्यासजड: कथं नु विषयव्यावृत्तकौतूहलो
निर्मातुं प्रभवेन्मनोहरमिदं रूपं पुराणो मुनि:? ( अंक १ श्लोक ९ किंवा १०)


(हिला रचण्यासाठीं कान्तिप्रद चन्द्र, अथवा श्रृंगाररसपरिपूर्ण असा स्वत: मदन, किंवा वसन्त मास प्रजापति झाला असेल काय ? कारण वेदाभ्यासानें ज्याची मति जड झाली आहे, विषयामध्यें ज्याला मजा वाटत नाहीं, तो पुराणा मुनि असें हें मनोहर रूप निर्माण करण्यास कसा समर्थ होईल?)

४५.  येथें कवीनें वैदिक ब्रह्मदेव व बुद्धसमकालीन ब्रह्मदेव ह्या दोहोंचेंहि मिश्रण केलें आहे. वेदकाळीं तो नुसता मंत्र म्हणणारा होता, व बुद्धकाळीं जगाचा कर्ता बनला. पण ब्राह्मणांच्या आणि बौद्ध श्रमणांच्या ओढाताणींत सांपडल्यामुळें बिचार्‍याला कोठेंच स्थान मिळेना, आणि अशा रीतीनें कवीला वाटेल तशी त्याची थट्टा करण्यास मुभा मिळाली !

४६.  वेदांत ब्रह्म म्हणजे मंत्र. पण बुद्धकाळीं त्याचा अर्थ श्रेष्ठ असा होऊं लागला. होतां होतां जगांतील श्रेष्ठ तत्त्वाला ब्रह्म म्हणूं लागले; व त्याच दृष्टीनें तें अद्यापिहि अस्तित्वांत आहे. त्याची मात्र थट्टा झाली नाहीं.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel