विभाग पाचवा - संस्कृति आणि अहिंसा

वन्य संस्कृति


१. अहिंसेचा मानवी संस्कृतीशीं निकट संबंध आहे. अहिंसेचा जसजसा विकास होत जातो तसतशी संस्कृतीहि वाढत जाते. आईबापांत आपल्या संततीविषयीं अहिंसक बुद्धि नसती, तर मनुष्यसमाजाची किंवा पशुपक्षादिकांच्या समाजांची वाढच झाली नसती. प्राथमिक वन्यावस्थेंत मुलाच्या संगोपनासाठीं मानवी आईबापांना किती कष्ट सहन करावे लागले असतील, याची नुसती कल्पनाच केली पाहिजे. आपल्या व आपल्या संततीच्या बचावासाठीं जेव्हां मनुष्य प्राणी परस्परांवर विश्वास टाकून एका पुढार्‍याच्या नेतृत्वाखालीं एकवटून शिकार वगैरे करण्याला प्रवृत्त होतात, तेव्हां कोठें त्यांच्या वन्य संस्कृतीला आरंभ होतो असें म्हणतां येईल.

२. अशा एकाद्या वन्य समूहाविषयीं विचार केला असतां दिसून येईल कीं, आपल्या पुढार्‍यावर त्यांचा पूर्ण विश्वास असतो; त्यानें दिलेला न्याय सर्वांना पसंत पडतो. आपल्या टोळींतील आजारी किंवा जखमी लोकांना मदत करण्यास ते तत्पर असतात. थोडक्यांत सांगावयाचें म्हटलें म्हणजे त्यांची अहिंसात्मक बुद्धि त्यांच्या टोळीपुरतीच असते. दुसर्‍या टोळीचे लोक हातीं लागले असतां त्यांना ते बायकांपोरांसकट ठार मारून टाकतात. त्यांना जर जिवंत ठेवलें, तर त्यापासून या टोळीचा कांहीएक फायदा नसतो. उलट आपली शिकार त्यांना खायाला देऊन स्वत:चीच उपासमार करण्याची पाळी यावयाची. दुसर्‍या टोळींतील लोकांना मारून त्यांचा निकाल केला म्हणजे त्यांच्या प्रदेशांतील शिकारहि या लोकांच्या ताब्यांत येते, व ह्यांच्या शिकारी साम्राज्याची अभिवृद्धि होते. असा प्रकार वन्यावस्थेंतील बहुतेक सर्व टोळ्यांत घडून येऊन अनेक टोळ्या काळाच्या जबड्यांत गेल्या. त्यांच्या इतिहासाची आठवण झाली म्हणजे अंगावर नुसते शहारे उभे रहातात!

साम्राज्य व त्याचे गुणदोष

३. पण जेव्हां अशा कांही टोळ्यांतील लोकानां धान्यावर रहातां येऊं लागलें, व धान्य उत्पन्न करण्याचीं साधनें मिळालीं, तेव्हां हा इतिहास पार बदलला. दुसर्‍या टोळींतील निदान सशक्त माणसांना मारण्याची जरूरी राहिली नाहीं. त्यांना धरून आणून जर शेतीच्या कामाला लावलें, तर त्यापासून ह्या टोळीचा अतोनात फायदा होई. त्यांनी कांबाडकष्ट करावे, व ह्यांनी त्यांच्या संपत्तीचा उपभोग घेऊन राज्यशासनाचा व धर्माचा विचार करावा. बाबिलोनियामध्यें प्रथमत: जीं राज्यें अस्तित्वांत आलीं तीं सुमेरियन लोकांच्या हुशार टोळ्यांनी स्थापलेलीं होतीं. एका टोळीनें कांहीं मुलुख ताब्यांत घेऊन तेथें एक शहर स्थापन करावयाचें व आपल्यापेक्षां कमी दर्जाच्या लोकांना दास बनवून त्यांच्याकडून सर्व अंगमेहनत करवून घ्यावयाची, अशी पद्धति सुरू झाली. वरिष्ठ वर्गाची काबाडकष्टांपासून मुक्तता झाल्यामुळें त्यांना शिल्पकला, लेखनकला, युद्धकला, धातुसंशोधनकला इत्यादि कलांचा विकास करण्यास मुबलक सवड सांपडली; व उत्तोरोत्तर हीं नगरराज्यें बलाढ्य होत गेलीं.

४. परंतु शेजारच्या नगरांशीं टक्कर देण्यासाठीं त्यांना सतत सज्ज रहावें लागत असें. त्यामुळें क्षत्रियांचा वर्ग उत्पन्न झाला. देवाच्या अनुग्रहानें आपल्या शहराचें रक्षण करतां येतें, अशा समजुतीनें देवाची प्रार्थना करण्यासाठीं एक निराळा पुजारी किंवा ब्राह्मणी वर्ग तयार करावा लागला. क्षत्रियांना युद्धाची कवाईत वगैरे शिकण्यांत वेळ घालवावा लागत असे. परंतु ब्राह्मणांना देवाची पूजा केल्यानंतर बाकीच्या वेळीं कांहींच काम नसल्याकारणानें लेखनकलेचा व ज्योतिषाचा विकास करण्यास मुबलक सवड सांपडली.

५. दोन शहरें जवळ वसलीं; त्यांच्या प्रदेशांच्या सीमा एकामेकाला येऊन भिडल्या. तेव्हां सीमेसाठीं तक्रारी उपस्थित होऊं लागल्या; व कधीं कधीं त्यांचा निकाल लढाईनें करून घेणें भाग पडलें. अशा रीतीनें क्षत्रियांची वाढ होऊं लागली. त्यांना फार दिवस रिकामपणांत घालवतां येईनात. कांही तरी कुरापत काढून दुसर्‍या शहरावर हल्ला करून त्यांतील क्षत्रियांना आपले दास करावे व तो सर्व प्रदेश आपल्या शहराला जोडून घ्यावा हा प्रकार अंमलांत येऊं लागला; व त्यापासून साम्राज्यसंस्था उत्पन्न झाली. लहान सहान शहरांत सतत लढाया चालू रहात, त्या मोडून सम्राटानें सर्वत्र एकसत्ता स्थापन केल्यावर लोकांना किती सुख वाटलें असावे, याची नुसती कल्पनाच केली पाहिजे. बाबिलोनियांत त्या त्या शहराचे निराळे देव होते; एक शहर सूर्याची व दुसरें चंद्राची उपासना करीत असे. जेव्हां साम्राज्य स्थापन झालें, तेव्हां त्या देवतांबरोबर सम्राटाचीहि पूजा होऊं लागली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel