ह्या ऋग्वेदांतील ऋचेचा अर्थ ऐतेरेय आरण्यकांत (आरण्यक २, आध्याय १) असा केला आहे. ‘प्रजा ह तिस्त्रो अत्यायमीयुरिति या वै ता इमा: प्रजास्तिस्त्रो अत्यायमायंस्तानीमानि वयांसि वङावगधाश्चेरपादा: ।’ याचा अर्थ सायणाचार्यांनी असा केला आहे कीं, ‘तीन प्रजा श्रध्दारहित झाल्या (वैदिक कर्मांवर त्यांचा विश्वास राहिला नाहीं). तीं हीं त्यांची तीन शरीरें. वयांसि म्हणजे कावळे वगैरे पक्षी; वङा म्हणजे अरण्यगत वृक्ष; व अवगधा म्हणजे तांदूळ जवस वगैरे. चेरपादा = च + इरपादा. इरपादा म्हणजे बिळांत रहणारे सर्प वगैरे. हे सगळे वैदिक कर्में व केल्यामुळें नरक अनुभवतात.’ हा अर्थ विचित्रच नव्हे तर हास्यास्पदहि आहे. कांहीं कारणांनी ह्या आरण्यकाची सदोष प्रत सायणाचार्यंच्या हातीं आली, किंवा हें वाक्य त्यांना बरोबर वाचतां आले नाहीं. यांत ‘वङा मगधाश्चेरपादा:’ असा मूळचा पाठ असावयास पाहिजे. येथें अंग देशालाच वंग म्हटलें आहे, किंवा मगधाच्या पूर्वेकडील सर्वच देशालाच वंग म्हटलें आहे. त्यानंतर मगध येतो, व मागाहून चेरपादा म्हणजे वज्जींचा देश. वज्जी हा शब्द वृजिन: (फिरस्ते) यापासून आलेला आहे. चेर किंवा चेल हा धातुहि गत्यर्थ आहे. तेव्हां चेरपादा: म्हणजे वृजिन: असें सिध्द होतें. च निराळा धरून इरपादा: किंवा ईरपादा: असा पदच्छेद केला तरीहि तोच अर्थ निघतो. तथापि चेरपादा: हाच पाठ इष्ट दिसतो.

१०७. ऋग्वेदांतील ऋचेंत ज्या तीन प्रजा सांगितल्या त्या कोणत्या हें सांगतां येत नाहीं. ऐतेरेय आरण्यकाची टीका बरोबर धरली तर ही वैदिक ऋचा बुध्दानंतर तिसर्‍या किंवा चौथ्या पिढींत रचली असावी, व ती प्रक्षिप्त असावी असें धरावें लागेल. मात्र ह्या आरण्यकाच्या काळाबद्दल शंका रहात नाहीं. बुध्दाच्या वेळीं मगध देशांत मोठमोठाले यज्ञयाग होत असत, याला दाखला दिघ निकायांतील कूटदंत सुत्तांत आहे. कूटदंत ब्राह्मणानें मोठा यज्ञ आरंभिला होता;  गाई, बैल वगैरे शेंकडो प्राणी यज्ञांत बळी देण्यासाठीं यूपांना बांधले होते. त्यानंतर बुध्दाची कीर्ति ऐकून तो बुध्दाजवळ येतो. त्याच्या विनंतीवरुन बुध्द त्याला, ‘प्राचीन काळीं महाविजित राजानें निरामिष यज्ञ कसा केला, व त्यामुळें त्याच्या राज्यांतील प्रजा कशी सुखी झाली’, ही गोष्ट सांगतो. बुध्दाचा धर्मोपदेश ऐकून ब्राह्मण बुध्दाचा उपासक होतो, व बलिदानासाठीं आणलेल्या पशूंना जीवदान देतो. यावरून असें दिसतें कीं, बुध्दसमकालीं मगध देशांत यज्ञयाग होत असत, व बुध्दाच्या धर्मोपदेशामुळें ते बंद पडले. तेव्हां ऐतेरेय आरण्यक व तत्समकालीन इतर वैदिक वाङमय बुध्दानंतर तीन चार पिढयांनी रचलें गेलें या बद्दल शंकाच रहात नाहीं.

१०८. येथें वैदिक वाङ्‌मय म्हणजे चार वेद, ब्राह्मणें, आरण्यकें व उपनिषदें. आजकाल पुराणांचीहि वैदिक वाङ्‌मयांत गणना करण्यांत येते. पण त्यांची गणना वैदिक वाङ्‌मयांत करणें योग्य नाहीं. तें एक निराळेंच वाङ्‌मय आहे, व त्याचा विचार ह्या पुस्तकाच्या तिसर्‍या विभागांत करण्यांत येईल.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
समाप्त
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel