१८०. याप्रमाणें पुष्यमित्रानंतर भिक्षूंनी राजाश्रय संपादन करून पुन्हा आपल्या धर्माचें वर्चस्व स्थापन केलें. राजांना आणि वरिष्ठ लोकांना वळवण्यासाठीं मूळच्या बौद्ध वाङ्मयांत त्यांनी इतके फेरफार केले कीं, त्याला बुद्धाचा उपदेश कितपत म्हणतां येईल हें सांगतां येत नाहीं. जरी अहिंसा, सत्य इत्यादिक मुद्दे त्यांनी सोडले नाहींत, तरी पण मूळच्या साध्या उपदेशाचा त्यांच्या ग्रंथांत फारच थोडा अंश राहिला आहे, असें दिसून येतें. शकांच्या दोनशें तीनशें वर्षांच्या कारकीर्दींत ह्या महायानपंथाचा प्रसार फार झाला; व मूळचा स्थविरवादपंथ ( महायानपंथाचे लोक ह्या पंथाला हीनयानपंथ म्हणतात) मागें पडत चालला. ह्या पंथाचे लोक सिलोन, ब्रह्मदेश, सयाम व कांबोडिया या दक्षिणेकडील चार देशांत आहेत. उत्तरेकडील तिबेट वगैरे देश महायानपंथाचे आहेत. म्हणून महायानपंथाला उत्तरेकडील बौद्ध पंथ, व स्थविरवादाला किंवा हीनयानपंथाला दक्षिणेकडील बौद्ध पंथ म्हणण्याचाहि प्रघात आहे. अस्तु.

१८१. महायानपंथाच्या प्रसारामुळें ब्राह्मण लोक अगदींच मागें पडले. सामान्य जनांच्या देवता महायान पंथानें आपल्याशा करून घेतल्या; व यज्ञयागांना तर शकांचा व यवनांचा आश्रय मिळेना. लहानसहान गृह्यसंस्कारादिक कृत्यें करून निर्वाह चालवितां येणें ब्राह्मणांना शक्य होतें. तरी पण राजाश्रयाइतका तो धंदा किफायतशीर नव्हता. बौद्ध भिक्षूंना महादेवाला तेवढें आपल्या पंथांत घेतां आलें नाहीं. कारण त्याच्या ज्या गोष्टी होत्या त्यांना अहिंसात्मक स्वरूप देतां येणें शक्यच नव्हतें. अर्थात् शक राजांना प्रसन्न करण्यासाठीं, किंवा त्यांच्याकडून राजकीय दक्षिणा मिळविण्यासाठीं महादेवाचे पुजारी होणें हाच काय तो एक मार्ग ब्राह्मणांना खुला होता; व तो त्यांनी प्रथमत: अढेवेढे घेऊन पतकरला असावा. पण पतकरल्यावर तो किफायतशीर आहे, असें त्यांस दिसून आलें. कारण शक राजांकडूनच नव्हे, तर त्यांच्या मांडलिकांकडूनहि महादेवाच्या पूजेसाठीं ब्राह्मणांना चांगली दक्षिणा मिळूं लागली.

१८२. ‘इन्द्र-वरुण-भव-शर्व-रुद्र-मृड-हिमारण्य-यव-यवन-मातुलाचार्याणामानुक्’ ४|१|४९, ह्या पाणिनीच्या सूत्रावरून भवानी, शर्वाणी, रुद्राणी व मृडानी ह्या देवींची त्या काळी पूजा होत असे, हें सिद्ध होतें. ह्या निरनिराळ्या चार देवी होत्या, कीं एकाच देवीचीं हीं निरनिराळी चार नांवे होतीं, हें सांगतां येत नाहीं. पण पुढें ती एकाच पार्वतीचीं नांवे बनलीं; व पार्वतीची पूजाहि लोकप्रिय झाली. त्यामुळें गांवो-गांवच्या भिन्न भिन्न देवींचा या एकाच देवींत समावेश करून त्या देवीचीं पूजा करणेंहि ब्राह्मणांना फायदेशीर वाटलें. अशा रीतीनें ब्राह्मणांनी यज्ञयागांचा नाद सोडून व ‘आलिया भोगासी सादर’ होऊन आपली उपजीविका चालवली. आणि त्यामुळें महादेव व पार्वती या दैवतांना वरिष्ठ जातींत फारच महत्त्व आलें.

१८३. ह्याच अवधींत विहाराच्या नियमावलींत असंतुष्ट झालेले श्रमण व जटिल यांच्या मिश्रणानें लिंगपूजेला प्राधान्य देणारा पाशुपंताचा पंथ निघाला. १ प्रथमत: ब्राह्मण लिंगपूजा करीत नसावे. पण जेव्हां पाशुपतांच्या प्रभावानें राजेहि लिंग आपल्या खांद्यांवर घेऊन चालूं लागले, तेव्हां ब्राह्मणांनी लिंगपूजाहि सुरू केली. त्यामुळें ब्राह्मणांना राजाश्रयच नव्हे, तर पाशुपतांचाहि आश्रय मिळाला.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ वि० ३।८९-९१.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१८४. शकांचें राज्य मोडकळीला आल्यावर पहिल्या चंद्रगुप्त राजानें गुप्तसाम्राज्याचा पाया घातला. त्यावर समुद्रगुप्तानें साम्राज्याची मोठी इमारत उठवली. हे गुप्त राजे वासुदेवाचे भक्त होते. वासुदेव त्यांचा कुलदेव होता हें पूर्वीं सांगण्यांत आलेंच आहे.१  तथापि महादेवाच्या किंवा लिंगाच्या पूजेला त्यांनी मुळींच विरोध केला नाहीं. त्यामुळें ती पूजा तशीच चालू राहिली; आणि तिच्या मागोमाग वासुदेवाचीहि पूजा सुरू झाली. कोणत्या देवाची पूजा करावी व कोणत्या देवाची करूं नये, हा विधिनिषेध ब्राह्मणांनी निखालास सोडून दिला. कोणताहि कां देव होईना, त्याच्या पूजेनें जर ब्राह्मणांना दक्षिणा मिळत असली, तर त्या दैवताचें स्तोम माजवण्यास ब्राह्मण जणूं काय एका पायावर उभे असत. आणि ह्या गुप्त कालांत त्यांनी अनेक दैवतांची व तीर्थांची महती वाढवण्यासाठीं वाटेल तेवढीं पुराणें रचलीं.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ वि० ३।१२२
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel