अपरिग्रह

४०. तृ्ष्णेवर किंवा कामवासनेवर इलाज म्हटला म्हणजे अपरिग्रह होय, असें पार्श्वाचें आणि बुद्धाचें म्हणणें दिसतें. पार्श्वानें तर आपल्या चार यामांत अपरिग्रहाचा समावेश केला; व वरील चार उतार्‍यांतच नव्हे, तर दुसर्‍या अनेक ठिकाणीं उपभोग्य वस्तूंचा त्याग करण्याचा बुद्धाचा उपदेश सांपडतो. बुद्धाचा आणि तत्समकालीन पार्श्वाच्या परंपरेंतील वर्धमान तीर्थंकराचा परिग्रहासंबंधीं तपशिलाचा मतभेद होता; मुद्दयाचा मतभेद नव्हता. बायको, दासदासी, वतनवाडी इत्यादिक सर्व उपभोग्य वस्तूंचा त्याग करावा असा दोघांचाहि उपदेश असे. फक्त शरीराला जरूर लागणारें वस्त्रप्रावरण जवळ ठेवावें असें बुद्धाचें म्हणणें, व त्याचाहि त्याग करावा असें वर्धमान तीर्थंकराचें म्हणणें होतें. पण हा बौद्धांचा आणि जैनांचा अपरिग्रह त्यांच्या संघांपुरताच होता. पांचशें भिक्षूंनी आपल्या बायका आणि दासदासी सोडून संघांत प्रवेश करावा, व दुसरीकडे एकाच राजानें त्यांच्याहिपेक्षा दुप्पट बायका, आणि चौपट दासदासी ठेवाव्या, असा ह्या अपरिग्रहाचा प्रकार होत असे. याप्रमाणें अपरिग्रहाचें क्षेत्र आकुंचित झाल्याकारणानें त्याजपासून इष्ट परिणाम होण्याऐवजीं अनिष्ट परिणाम घडून आले.


४१. बायका आणि दासदासी सोडून पुष्कळ बुद्धिमान् लोक भिक्षु आणि जैन साधु झाले, तरी निर्वाहाची व निवार्‍याच्या जागेची त्यांना आवश्यकता होतीच; व ती सामान्य जनतेला पुरी पाडतां येणें शक्य नव्हतें. कां कीं, ह्या संघांची वाढ एकसारखी होत चालली होती. तेव्हां ह्या संघांना राजांकडून इनामें मिळविणें भाग पडलें. त्यायोगें ते परिग्रही बनले; आणि परिग्रहापासून उद्‍भवणारे सर्व दोष त्यांच्यांत शिरले. सारांश, परिग्रहापासून इतर जनतेप्रमाणें हे संघहि मुक्त राहूं शकले नाहींत. मात्र त्यांचा उपदेशांत तेवढा अपरिग्रह बाकी राहिला.

४२. बौद्ध आणि जैन सगळ्या परिग्रहांत स्त्री परिग्रह मोठा समजत असत. उघडच आहे कीं, एकदां बायको आली म्हणजे तिच्या मागोमाग घरदार, नोकर चाकर, बागबगीचे हें सगळें क्रमाक्रमानें यावयाचेंच. तेव्हां त्यांच्या मताप्रमाणें स्त्री परिग्रहासारखा दुसरा परिग्रह नव्हता; आणि म्हणूनच संघाच्या नियमाप्रमाणें कोणत्याहि रीतीनें स्त्रीशीं संबंध ठेवणें हा मोठा गुन्हा समजला जात असे. भिक्षुणीसंघांतील भिक्षुणींनाहि पुरुषांशीं कोणत्याहि रीतीनें निकट संबंध ठेवतां येत नसे. स्त्रीपुरुषांचा संबंध परस्परांना बाधक आहे, व त्याच्यापासूनच सर्व संसारदु:ख वाढतें अशी त्यांची समजूत होती. परंतु अनुभवावरून असें दिसून आलें आहे कीं, अशा रीतीनें भिक्षूंचे आणि भिक्षुणींचे संघ स्थापल्यानें उपायांपेक्षां अपायच जास्त घडून आले. प्रथमावस्थेंत हे संघ जरी नीतिमान् होते, तरी परिग्रही झाल्यानंतर त्यांची नीतिमत्ता बिघडत गेली; व त्यांतूनच अनेक तंत्रें, लिंगपूजा इत्यादिक बीभत्स प्रकारांचा प्रादुर्भाव झाला.

४३. अगदीं अलीकडे स्त्रीस्वातंत्र्याची कल्पना निघाल्यापासून, स्त्री हा परिग्रह नव्हे, या विचाराची एकसारखी अभिवृद्धि होऊं लागली आहे. जोंपर्यंत स्त्रीला परिग्रह समजण्यांत येईल, तों पर्यंत त्या समाजाची नैतिक उन्नति झाली, असें म्हणतां यावयाचें नाहीं. अहिंसेची आणि संस्कृतीची कसोटी म्हटली म्हणजे स्त्रीस्वातंत्र्यच होय. मनुष्याच्या हिंसक बुद्धीनें स्त्रियांना दास बनवलें. स्त्रियांच्या अन्त:करणांत निस्सीम मातृप्रेम नसतें, तर त्यांनी हें दास्य कधींहि स्वीकारलें नसतें; आत्महत्येनें सगळ्या मानवजातीचाच अन्त करून टाकला असता. पडद्यासारख्या भयंकर प्रथांचा स्त्रियांनी अवलंब करूनहि जर आपणाला अद्यापि जिवंत ठेवलें असेल, तर तें केवळ या मातृप्रेमामुळेंच. स्त्रियांना अशा रीतीनें कोंडून टाकण्यांत मनुष्याच्या हिंसात्मक बुद्धीची मात्र पराकाष्टा झाली आहे. तेव्हां अहिंसात्मक संस्कृतीचा जर पूर्णपणें विकास व्हावयाचा असेल, तर स्त्रीला परिग्रह न समजतां सर्वतोपरि स्वतंत्रता दिली पाहिजे. स्वतंत्र स्त्रियांच्या साहाय्यानें जी संस्कृति उदय पावेल तीच अहिंसात्मक, अतएव मानवजातीला सुखकारक आणि हितावह होईल.

४४. आजकाल पाश्चात्य देशांत जें स्त्रीस्वातंत्र्य आहे, तें वरपांगी आहे, असें आम्हास वाटतें. बहुतेक स्त्रिया आर्थिक दृष्टीनें पुरुषांवर अवलंबून असल्याकारणानें स्वतंत्र नसतात. त्यांना आपले नवरे व्यसनी असले, तरी केवळ संततीच्या मोहामुळें त्यांच्याकडून सोडचिठ्ठी घेऊन मोकळें होतां येत नाहीं. एकाद्या बाईनें नवर्‍याला सोठचिठ्ठी दिली, तर ती कसा बसा आपला निर्वाह करूं शकेल. पण आपल्या मुलांचें काय होईल, या विवंचनेनें ती तसें करीत नाहीं, व आपल्या नवर्‍याचें दुर्वर्तन मुकाट्यानें सहन करते. कारकुनी वगैरे करून निर्वाह करणार्‍या पुष्कळ स्त्रिया पाश्चात्य देशांत आहेत. पण त्याहि स्वतंत्र नाहींत. त्यांपैकीं एकाद्या बाईला एकादें मूल असावें अशी उत्कट इच्छा असली, तरी ती पुरी पाडतां येत नाहीं. त्यासाठीं पुरुषाचें कायमचें दास्य पतकरावें लागेल, या भयानें ती शेवटपर्यंत अविवाहित रहाते, व मातृप्रेमाला मुकते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel