दु:खाचें मूळ तृष्णा

२१. शरीराला लागणार्‍या अत्यावश्यक पदार्थांचा उपभोग घेणें ह्याला तृष्णा म्हणत नाहींत. जेव्हां ह्या उपभोग्य वस्तूंचा हव्यास सतत वाढत जातो, तेव्हां त्याला तृष्णा म्हणतात. हा दुर्गुण मनुष्येतर प्राण्यांतहि दिसून येतो. एकाद्या कुत्र्याला भरपूर खाऊं घातलें व त्याच्यानें तें खाववलें नाहीं, तर तो तेथें बसून रहातो, आणि जवळपास दुसर्‍या कुत्र्यांना येऊं देत नाहीं. मनुष्यजातीमध्यें ह्या तृष्णेची वाढ जोमानें होत असते. ज्याला रोजीं दोन आणे मिळत नसत, त्याला पांच रुपये मिळूं लागले, तर तेवढ्यानें त्याचें समाधान होईल असें मुळींच नाही. आपलें उत्पन्न निदान रोजीं दहा रुपये झालें पाहिजे, अशाबद्दल तो सारखा प्रयत्‍न करीत राहील; आणि जितका लाभ, त्याच्या दुप्पट त्याला लोभ वाढत जाईल.

२२. बौद्ध ग्रंथांत ही तृष्णा तीन प्रकारची आहे. कामतृष्णा म्हणजे उपभोग्य वस्तूंची तृष्णा, भवतृष्णा म्हणजे परलोकाविषयीं तृष्णा, व विभवतृष्णा म्हणजे विनाश पावण्याची तृष्णा, हे ते तीन प्रकार होत. मनुष्याला यथास्थित उपभोग्य वस्तु मिळाल्या, तरी त्यांत त्याचें समाधान होत नाहीं. मेल्यानंतर चिरकाल स्वर्गीय संपत्ति उपभोगण्यास मिळावी, यासाठीं तो श्रमणब्राह्मणांना दानधर्म करतो, यज्ञयाग करतो, व्रतउपोषणें करतो, व सर्वसंगपरित्याग करून तपश्चर्येलाहि प्रवृत्त होतो. विभवतृष्णेचा प्रसार वरील दोन तृष्णांएवढा नसला, तरी तिचा प्रभाव कमी आहे असें नाहीं. आपण मेलों म्हणजे जग संपलें, असें समजणारे लोक आहेतच; आणि ह्या तृष्णेमुळें आपला व परक्यांचा घातपात करण्याला त्यांना मुळींच दिक्कत वाटत नाहीं.

२३. कामतृष्णा किंवा विषयवासना हिच्यामुळें किती अनर्थ होतात, याचीं विस्तृत वर्णनें त्रिपिटकवाङ्मयांत बरींच सांपडतात. त्यांतील कांहीं उतारे येथें देणें योग्य वाटतें. मज्झिमनिकायांतील महादुक्खक्खन्ध सुत्तांत भिक्षूंना उद्देशून भगवान् म्हणतो, “भिक्षुहो, विषयोपभोगांमध्ये दोष कोणता? एकादा तरुण होतकरू कारकुनी करून, व्यापारधंदा करून किंवा सरकारी नोकरी करून आपला निर्वाह करतो. त्या धंद्यामुळें त्याला अत्यंत ताप होतो. तथापि तो उपभोग्य वस्तु मिळवण्यासाठीं रात्रंदिवस खटपटतो; व तेवढ्यानें जर त्या वस्तूंचा लाभ झाला नाहीं, तर शोकाकुल होऊन आपला प्रयत्‍न व्यर्थ गेला या विवंचनेनें मूढ होतो. जर त्या उद्योगांत त्याला यश आलें, व इच्छिलेल्या वस्तु त्याला मिळाल्या, तर त्या राजांनी आणि चोरांनी लुटूं नयेत, आगीनें जळून जाऊं नयेत, पाण्यांत वाहून जाऊं नयेत, किंवा अप्रिय दायादांच्या ताब्यांत जाऊं नयेत, म्हणून तो त्यांचा सांभाळ करण्यांत गढून जातो; व त्यामुळें त्याच्या मनाला फार त्रास होतो. पण एवढी खबरदारी घेतली असतांहि राजे लोक किंवा दरोडेखोर त्याची संपत्ति लुटतात; आगीनें किंवा पाण्यानें तिचा नाश होतो; किंवा अप्रिय दायाद ती हिरावून घेतात. अशा प्रसंगीं त्याला अत्यंत दु:ख होतें.

२४. “आणि, भिक्षुहो, या विषयांसाठींच राजे राजांबरोबर भांडतात; क्षत्रिय क्षत्रियांबरोबर, ब्राह्मण ब्राह्मणांबरोबर व वैश्य वैश्यांबरोबर भांडतात; आई मुलाबरोबर, मुलगा आईबरोबर, बाप मुलाशीं, मुलगा बापाशीं, भाऊ बहिणीशीं, बहीण भावाशीं आणि मित्र मित्रांशी भांडतात. त्यांच्या कलहाचा परिणाम कधीं कधीं असा होतो कीं, ते हातांनी, दगडांनी, दांड्यांनी किंवा शस्त्रांनी एकमेकांवर प्रहार करतात, व त्यामुळें मरण पावतात, किंवा मरणान्तिक दु:ख भोगतात....
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel