५८. दोस्त राष्ट्रांवर हें एक महासंकट गुदरलें. जर्मनीला नुकताच कोठें आळा बसत चालला आहे, तोंच बोल्शेव्हिझमची उत्पत्ति होऊन तें सगळ्या भांडवलशाहीला ग्रासून टाकतें कीं काय, अशी सर्व मुत्सद्दयांना भीति पडली. त्यांनी ह्या नवीन उत्पन्न झालेल्या पंथाला हरतर्‍हेनें अडथळा करण्यास सुरुवात केली. रशियन क्रांतीचें वारें जर्मनींत शिरल्यामुळें व दोस्त राष्ट्रांचा जोर अमेरिकेच्या मदतीनें उत्तरोत्तर वाढत गेल्यामुळें जर्मनी डबघाईस आला, व त्यानें १९१८ सालीं विल्सनच्या चौदा अटींवर लढाई तहकूब केली. अर्थात् दोस्त राष्ट्रांना आपल्या पूर्वेकडील दोस्ताकडे विशेष लक्ष्य देण्यास सवड सांपडली. त्यांच्याकडे युद्धसामग्री विपुल होती. पण सर्व देशांतील माणसें लढाईला फार कंटाळून गेलीं होतीं. त्यामुळें कोणत्याहि दोस्त राष्ट्राला रशियांत मोठें सैन्य पाठवणें शक्यच नव्हतें. दुसरी एक भीति होती ती ही कीं, बोल्शेव्हिकांच्या प्रचारकार्यानें जर हें सैन्य बिथरून गेलें, तर त्याचा परिणाम आत्मघातांतच व्हावयाचा. दोस्त राष्ट्रांच्या सुदैवानें रशियांतून पळून आलेले धनिक व सरदार घरण्यांतील लोक रशियाबाहेर जिकडे तिकडे फैलावले होते. त्यांच्या शिवाय रशियांत झेकोस्लावाकियामधील हजारों सैनिक कैद होऊन पडले होते. जर्मनी-विरुद्ध लढण्यास तयार केलेल्या युद्धसामग्रीची ह्या लोकांना जर मदत करण्यांत आली, तर ते परस्परच बोल्शेव्हिझम् नष्ट करून टाकतील, असें दोस्त राष्ट्रांतील धुरंधरांना वाटणें अगदीं साहजिक होतें.

५९. त्याप्रमाणें सर्व दोस्त राष्ट्रांनी खलबत करून रशियन गोर्‍यांची १  व झेकोस्लावाकियन कैदी सैनिकांची नवीन रचना केली, आणि बोल्शेव्हिकांवर चारी बाजूंनी हल्ला चढविला. या संकटांतून पार पडण्याची बोल्शेव्हिक पुढार्‍यांनाहि फारशी आशा नव्हती. कां की, सर्व देश हलाख झालेला; आणि दारूगोळा तर मुळींच नाहीं. लढून मरणें किंवा फांशीं जाणें याशिवाय तिसरा मार्ग नसल्याकारणानें लढून मरण्याचा मार्ग बोल्शेव्हिकांनी पसंत केला, हें सांगावयास नकोच.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ बोल्शेव्हिकांविरुद्ध असलेल्या श्रीमंतांना ‘गोरे’ (White) व बोल्शेव्हिकांना ‘तांबडे’ (Red) म्हणतात
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
६०. परंतु जसजसे हे गोरे रशियन मास्को आणि लेनिनग्राडकडे चाल करून जाऊं लागले तसतसे दुर्बळ होत गेले. नवीन मालक बनलेल्या शेतकर्‍यांची त्यांना मदत करण्याची मुळींच इच्छा नव्हती. अर्थात् गोर्‍या रशियनांना शेतकर्‍यांवर जुलूम करून अन्नसामग्री मिळवावी लागली, व त्यामुळें त्यांच्या पिछाडीला बंडें उपस्थित झालीं. दोस्त राष्ट्रांनी पाठवलेली युद्धसामग्री आपोआपच त्या बंडवाल्यांच्या-बोल्शेव्हिकांच्या-हातीं आली! व गोरें सैन्य, ग्रीष्म काळच्या सूर्यकिरणांनी वितळणार्‍या बर्फाप्रमाणें तेथल्या तेथेंच वितळून गेलें!  राहिलेल्या श्रीमंत घराण्यांतील लोकांना बरोबर घेऊन व्रांगल वगैरे सेनापतींना पळ काढतां पुरेवाट झाली. युद्धसामग्री तर गेलीच, आणि हे रशियन गोरे मदतीसाठीं दोस्त राष्ट्रांच्या दारीं येऊन बसले!  पण आतां त्यांची दोस्त राष्ट्रांना काय गरज होती?

६१. याप्रमाणें अनपेक्षितपणें बोल्शेव्हिकांचा जय झाला. एस्तोनिया, लातविया, लिथुवानिया, पोलंड, फिनलंड व बेसाराबिया येवढे प्रांत खेरीज करून झारच्या ताब्यांत असलेल्या सर्व साम्राज्यावर बोल्शेव्हिकांची सत्ता स्थापित झाली. पण ती घेऊन काय करावयाचें? आगगाडीचे रस्ते मोडून पडलेले, बहुतेक गिरण्या बंद पडून यंत्रांना गंज चढलेला, व दोस्त राष्ट्रांनी तर चारी बाजूंनी बोल्शेव्हिकांचा कोंडमारा केलेला. इतक्यांत १९२१ सालचा भयंकर दुष्काळ आला. अन्नावांचून लाखो लोक मरण पावले. गोर्‍या रशियनांचा पराभव करून आपली सत्ता स्थापन करणें जितकें कठिण होतें त्याच्याहून या सर्व संकटपरंपरेंतून पार पडणें बोल्शेव्हिकांना दसपटीनें जड गेलें असलें पाहिजे. पण ते करतात काय? ह्या सर्व संकटांना तोंड दिल्यावांचून दुसरी वाटच नव्हती. या वेळीं भांडवलशाही दोस्त राष्ट्रांनी अन्नसामग्री बरोबर घेऊन रशियावर चाल केली असती, तर फार मोठ्या लढाईशिवाय त्यांना सर्व रशिया जिंकतां आला असता. रशियावर चाल केली असतां आपलेच लोक आपणावर बिथरतील व आपल्याच राज्यात क्रांति घडून येईल, एवढीच कायती त्यांतील पुढार्‍यांना भीति होती; आणि तिजमुळें रशियाचा कोंडमारा करण्यांतच त्यांना समाधान मानून घ्यावें लागलें.

६२. त्यानंतर बोल्शेव्हिकांनी पांचवर्षिक योजना सुरू करून तींत कितपत यश संपादन केलें, ग्रामसंघटना कशा सुरू केल्या, इत्यादि गोष्टी अगदीं ताज्या आहेत; आणि त्यांत त्यांनी मिळवलेल्या यशापयशाबद्दल अनेक देशांत चर्चाहि चालू आहे. येथें एवढें कबूल केलें पाहिजें कीं, बोल्शेव्हिकांच्या हातीं राजसत्ता अत्यंत आणीबाणीच्या प्रसंगीं आली असतां ती त्यांनी मजूर आणि शेतकरी यांच्या जोरावर टिकवून धरली, एवढेंच नव्हे, तर असह्य आपत्तींतून आपलें डोकें वर काढून सर्व जगाला एक नवीनच धडा घालून दिला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel