११४ या दंतकथेंतून एक अनुमान निघतें तें हें कीं, अशोककालापासून काश्मीर देशांत संघारामांची संख्या वाढत गेली; व राजे रजवाड्यांनी भिक्षूंच्या सेवेसाठीं लाखो आरामिक दिले. किंबहुना काश्मीर देशांत इतरांपेक्षा आरामिकांचीच संख्या जास्ती वाढली. त्यांच्यावर लागू केलेला कर त्यांना आवडेनासा झाला; व त्यांनी भिक्षूंविरूद्ध बंड केलें. त्यांचें दमन करण्यासाठीं भिक्षूंना बाहेरच्या राजांची मदत घ्यावी लागली, व त्यामुळें ह्या आरामिकांना बुद्धाचा धर्म अप्रिय झाला.

११५. अशा प्रकारें भिक्षु परिग्रही बनल्यावर आपल्या परिग्रहाचें रक्षण करण्यासाठीं त्यांना खोट्यानाट्या गोष्टी रचाव्या लागल्या. शस्त्र धारण करून परिग्रहाचें रक्षण करणें शक्य नव्हतें. कां कीं, ती उघड उघड हिंसा झाली असती, व भिक्षूंच्या संघारामांना किल्यांचें स्वरूप आलें असतें. तेव्हां कल्पित गोष्टी रचून तद्वारा राजांची मनधरणी करून आपल्या संघारामांचें रक्षण करणें त्यांना भाग पडलें. अर्थात् परिग्रहामुळे सत्याच्या यामाचाहि त्यांच्याकडून भंग झाला.

११६. असत्य गोष्टी रचण्याच्या कामीं बौद्धांची आणि जैनांचीं चढाओढ लागलेली दिसते. उदाहरणार्थ, बौद्धांनी दशरथादिक राजांना सोळा हजार बायका असल्याचीं वर्णनें केलीं आहेत. परंतु जैन साधूंनी त्यांच्यावर ताण केली. चक्रवर्तीला किती बायका असतात याचा हिशोब जैन साधूंनी दिला आहे तो असा –

ऋतुकल्याणिकानां स्यु: परुंध्रीणां सहस्त्रका:|
द्वात्रिंशतश्च सुस्पर्शा: सर्वर्तुषु सुखावहा: || ५४४||
देशाधिपानां कन्या या उद्ढाश्चक्रवर्तिना |

तासामपि सहस्त्राणि द्वात्रिंशत्स्वर्वधूश्रियाम् ||५४५||
पुरंध्रीणां भवन्त्येवं चतुष्पष्टि: सहस्त्रका: |

भवन्ति द्विगुणास्ताभ्य: सुरूपा वारयोषित: || ५४६||
एकं लक्षं द्विनवति-सहस्त्राभ्यधिकं तत: ।

अंत:पुरीणां निर्दिष्टं भोगार्थ चक्रवर्तिन: || ५४७||

( चक्रवर्ती राजाला सर्व ऋतूंत सुखकारक आणि सुख-स्पर्शवती अशा ऋतुकल्याणी बत्तीस हजार स्त्रिया असतात. इतर राजांच्या मुलींशीं चक्रवर्ती राजा लग्न लावतो. त्यांचीहि संख्या बत्तीस हजार असते. त्या देवांगनांप्रमाणे सुरूपसंपन्न असतात. याप्रमाणें एकंदर स्त्रिया चौसष्ट हजार होतात. आणि त्याच्या दुप्पट म्हणजे एक लक्ष अठ्ठावीस हजार रुपवती वारांगना असतात. येणेंप्रमाणे चक्रवरर्तीच्या उपभोगासाठीं त्याच्या अन्त:पुरांत एकंदर एक लक्ष ब्याण्णवद हजार स्त्रिया रहातात.)१
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ श्रीकाललोकप्रकाश, सर्ग ३१.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
११७. ह्या गोष्टी सामान्य कवीनें लिहिलेल्या नसून जैन साधूंनी लिहिल्या आहेत; आणि त्या कां, तर केवळ एखाद्या राजाची मर्जी संपादून त्याच्याकडून आपल्या मन्दिरांचें व वसतिस्थानांचें रक्षण करावें या उद्देशानें !
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel