श्रमणसंस्कृतीची इतिश्री

२४८. इ.स. ७१२ साली महंमद इब्न कासीम यानें सिंध देश काबीज केला व तेथें मुसलमानांचें ठाणें कायम केलें. त्यानंतर महमूद गझनी याच्या इ.स. १०३० सालापर्यंत या देशावर एकंदर सतरा स्वार्‍या झाल्या. त्यानें हिन्दु देवळांचा एकसारखा संहार मांडला. असें असतां ह्या मुसलमानांच्या स्वार्‍यांचा कांहीं एक विचार न करतां आमच्या  ह्या कृष्णमिश्रासारखे शहाणे संन्यासी लोक असलीं नाटकें लिहिण्यांतच मोठें भूषण मानीत होते! यावरून हिन्दु लोकांचा अध:पात कसा चालू होता, हें स्पष्ट होत आहे. असा एक कोणी माणूस हिन्दुस्थानांत राहिला नाहीं कीं, जो हिन्दु संस्कृतीला चलन देऊन व तिच्यांतील सर्व दोष काढून टाकून पुन्हा तिला कार्यक्षम करील. यासंबंधी अल्बेरुनीचें म्हणणें विचारणीय आहे.

२४९. “नास्तिक ग्रीक ख्रिस्तापूर्वी हिंदूंसारखेच मूर्तिपूजक होते.... परंतु त्यांच्यामध्यें पुष्कळ शास्त्रज्ञ असे निघाले कीं, ते सामान्य जनतेच्या धर्मभोळेपणाला बळी पडत नसत. साक्रेटिसाचेंच उदाहरण घ्याना. तो नक्षत्रांना देव म्हणण्यास तयार नव्हता. ताबडतोब आथेन्समधील बारांपैकीं अकरा न्यायाधीशांनी त्याला मरणाची शिक्षा फरमाविली. पण साक्रेटीस सत्यावर अचल श्रद्धा ठेवून मरण पावला. हिंदूंत अशीं माणसें झालीं नाहींत... हिन्दूंतींल शास्त्रज्ञ देखील आपले शास्त्रीय सिद्धान्त सामान्य जनतेच्या धर्मभोळेपणांत मिसळून टाकतात. म्हणजे मोत्यांच्या शिंप्या आणि आंबट खजूर, मोत्यें आणि शेण, अथवा स्फटिकमणि व सामान्य गोटे, यांची भेसळ करण्यासारखेंच त्यांचें वर्तन आहे. शास्त्रीय पद्धतीच्या पायर्‍या चढण्याचें सामर्थ्य त्यांच्यांत नसल्याकारणानें त्यांच्या दृष्टीनें दोन्ही प्रकारच्या वस्तु त्यांना सारख्याच दिसतात.” १ ( १ हा सारांश आहे. Alberuni’s India, i, 24-25.)

२५०. अल्बेरुनीनें आमच्या पंडितांना दिलेलें हें सर्टिफिकेट वावगें कोण म्हणेल? आणखी एका ठिकाणीं तो म्हणतो, “ हिंदु लोकांना वाटतें कीं, त्यांच्या देशासारखा दुसरा देश नाही, त्यांच्या राजांसारखे दुसरे राजे नाहींत, त्यांच्या धर्मासारखा दुसरा धर्म नाहीं, आणि त्यांच्या शास्त्रांसारखें दुसरें शास्त्र नाहीं... जर तुम्ही खुरासानमधील किंवा पर्शियामधील शास्त्रांविषयीं आणि विद्वानांविषयीं त्याच्यांशीं बोलाल, तर तुम्हाला ते मूर्खच नव्हे, तर लबाडहि समजतील. ते जर प्रवास करतील, व परक्यांत मिसळतील, तर त्यांची ही वृत्ति रहाणार नाहीं. कारण त्यांचे पूर्वज अशा तर्‍हेच्या संकुचित विचाराचे नव्हते. त्यांच्या विद्वानांपैकीं वराहमिहिर म्हणतो कीं, ‘यवन जरी म्लेंच्छ आहेत, तरी त्या लोकांना हें (ज्योतिष) शास्त्र उत्तम माहीत आहे, यासाठीं त्यांचीहि पूजा केली जाते; मग दैवज्ञ ब्राह्मणाविषयीं काय सांगावे?...१   ह्यांत देखील इतरांना न्याय देऊं पहाणारा वराहमिहिर आपले प्रौढी कशी मारतो पहा!” २
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ म्लेच्छा हि यवना तेषु सम्यक् शास्त्रमिदं स्थितम् | ऋषिवत्तेऽपि पूज्यन्ते किं पुनर्दैवविद्विज: ||१५||अ.२||
२ Alberuni’s India, i, 22-23
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel