४९. आडार कालामाचा आश्रम कपिलवस्तूमध्यें होता ह्याला पुरावा याच तिकनिपातांत सांपडतो. “एके समयीं भगवान् कोसल देशांत प्रवास करीत करीत कपिलवस्तूला आला. तो आल्याचें वर्तमान ऐकून महानाम शाक्यानें त्याची भेट घेतली. तेव्हां महानामाला त्यानें आपल्याला एक रात्र रहाण्यासाठीं जागा पहाण्यास सांगितलें. परंतु भगवंताला रहाण्यासाठी जागा पहाण्यास सांगितलें. परंतु भगवंताला रहाण्यासाठी योग्य जागा महानामाला कोठेंच सांपडली नाहीं. परत येऊन तो भगवंताला म्हणाला, ‘भदन्त आपणासाठीं योग्य जागा मला सांपडत नाहीं. आपण पूर्वींचा सब्रह्मचारी भरण्डु कालाम याच्या आश्रमांत आपण एक रात्र रहा.’ भगवंतानें महानामाला तेथें आसन तयार करावयास सांगितलें, व तो त्या रात्रीं त्या आश्रमांत राहिला.

५०. “दुसर्‍या दिवशीं सकाळीं महानाम भगवंताच्या भेटीला गेला. तेव्हां भगवान् त्याला म्हणाला, ‘या लोकीं, हे महानाम, तीन प्रकारचे धर्मगुरु आहेत. पहिला कामोपभोगांचा समतिक्रम ( त्याग) दाखवितो, पण रूपांचा आणि वेदनांचा समतिक्रम दाखवीत नाहीं. दुसरा कामोपभोगांचा व रूपांचा समतिक्रम दाखवितो, पण वेदनांचा समतिक्रम दाखवींत नाहीं. तिसरा ह्या तिहींचाहि समतिक्रम दाखवितो. ह्या धर्मगुरूंचे ध्येय एक आहे कीं भिन्न आहे?

५१. “त्यावर भरण्डु कालाम म्हणाला, ‘हे महानाम, ह्या सर्वांचें ध्येय एकच आहे असें म्हण.’ पण भगवान् म्हणाला, ‘महानाम, त्यांचें ध्येय भिन्न आहे असें म्हण.’  दुसर्‍यांदा व तिसर्‍यांदाहि भरण्डूनें त्यांचें एकच ध्येय असें म्हणण्यास सांगितलें; व भगवंतानें त्यांचीं ध्येये भिन्न आहेत असें म्हणण्यास सांगितलें. महानामासारख्या प्रभावशाली शाक्यासमोर श्रमण गोतमानें आपला उपमर्द केला असें वाटून भरण्डु कालाम जो कपिल-वस्तूहून चालता झाला, तो कधींहि परत आला नाही.”१.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( १ अंगुत्तरनि. पण्णासक ३, वग्ग ३, सुत्त ४ )
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
५२. ह्या सुत्तावरून बर्‍याच गोष्टींचा उलगडा होतो. त्यांत पहिली गोष्ट ही कीं, कालाम ऋषीचा आश्रम कपिलवस्तु येथें होता, व त्याचा योगमार्ग शाक्य राजांना चांगला माहीत होता. दुसरी गोष्ट ही कीं, बोधिसत्त्व गोतम कपिलवस्तूच्या महाराजाचा मुलगा नव्हता. तसें असतें तर खुद्द त्याच्या पित्याच्या राजधानींत एक रात्र रहाण्याला त्याला खात्रीनें जागा मिळाली असती. तिसरी गोष्ट ही कीं, बुद्ध झाल्यानंतर भगवान् मोठ्या भिक्षुसंघासह कपिलवस्तूला आला नाहीं. म्हणजे भिक्षुसंघ गोळा करण्यास त्याला बरींच वर्षें लागलीं. चौथी गोष्ट ही कीं, आरंभीं आरंभी शाक्य राजांत त्याची किंवा त्याच्या धर्माची चहा झाली नाहीं; एका तेवढ्या महानाम शाक्यानेंच त्याचें अभिनंदन कोलें.

५३. ह्यांत मुख्य मुद्दा हा कीं, बुद्धाला धर्मज्ञान प्राप्त करुन घेण्यासाठीं शाक्य देशांतून मगधांच्या राजधानीला (राजगृहाला) जाण्याचें कांही कारण नव्हतें. आणि तो प्रथमत: राजगृहाला गेलाहि नाहीं. त्याने आडार कालामाच्या श्रमण-संप्रदायांत कपिलवस्तु येथेंच प्रवेश केला.

५४. भिक्षु होण्यापूर्वी आडार कालामानें उपदेशिलेल्या ध्यानांचा तो अभ्यास करीत होता, याला आधार मज्झिम निकायांतील महासच्चक सुत्तांत सांपडतो. भगवान् म्हणतो, “माझ्या बापाबरोबर शेतांत गेलों असतां जंबुवृक्षाच्या छायेंत बसून प्रथम ध्यानाची समाधि साधल्याची मला आठवण आहे.” यावरून असें दिसतें कीं, गृहस्थाश्रमांत असतांनाच बोधिसत्त्व आडार कालामाचा शिष्य झाला होता, व त्यानें उपदेशिलेल्या ध्यानांचा अभ्यास करीत होता.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel