आधीच "सुखी" असलेले स्पष्टवक्ते "स्पष्टवक्ता सुखी भव" या म्हणीमुळे आणखीनच सुखावतात आणि त्यांना चेव चढतो.
ही म्हण तयार करणारांनी फक्त एकतर्फी विचार केलेला आहे. म्हणजे त्यांनी या तथाकथित स्वयंघोषित स्पष्टवक्ते लोकांच्या बोलण्याची शिकार झालेल्या बिचार्‍या बापुड्या श्रोत्यांचा विचार केलेलाच नाही.
म्हणून सर्वप्रथम मी ही अपूर्ण म्हण पूर्ण करतो ती अशी:
"स्पष्टवक्ता सुखी भव । कष्टश्रोता दु:खी भव ।"
स्पष्टवक्ते लोकांच्या बोलण्याची शिकार झालेल्या आणि त्यामुळे दु:खी कष्टी झालेल्या बिचार्‍या बापुड्या श्रोत्यांना आपण "कष्टश्रोता" म्हणूया! आता मुख्य मुद्दा असा की या लोकांना स्पष्ट बोलण्याचा जन्मजात ठेका आणि अधिकार कुणी दिला?
ते लोक स्पष्ट बोलतात याचा अर्थ ते सत्यच बोलत आहेत असा होत नाही. स्पष्टवक्ता हा सत्यवक्ता असेलच असे जरूरी नाही. बहुतेक वेळा असत्यवक्ता हा स्पष्टवक्तेपणाचा बुरखा घालून आपले असत्य पुढे दामटण्याचा आणि सत्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न करत असतो.
स्पष्टवक्ता बरेचदा इतरांचे दुर्गुण त्यांच्यासमोर स्पष्ट करून सांगतो. पण दुर्गुण सांगताना उफाळून येणारा यांचा स्पष्टपणा गुण सांगताना कुठे जातो? येथेच स्पष्टवक्ता चूक करतो. तो इतरांचे फक्त दुर्गुण लक्षात आणून देण्याचा आपल्याला जन्मजात परवाना मिळाल्यासारखा वागतो आणि त्यालाच स्पष्टवक्तेपणा समजतो.इतरांचा आत्मविश्वास असूयेपोटी आणि द्वेषापोटी कमी करण्यासाठी तो "स्पष्टवक्तेपणाचे" हत्यार वापरतो. मग त्याला स्पष्टवक्ता न म्हणता भ्रष्टवक्ता म्हणणे योग्य ठरेल आणि त्या श्रोत्यांना त्रस्तश्रोते म्हणूया.
कुणीही परिपूर्ण नसतो. मग हे स्पष्टवक्ते तरी परिपूर्ण असतात का? मग त्यांचे दुर्गुण त्यांना कोण सांगणार?
बिचारे सर्वच लोक हे लगेचच स्पष्टवक्त्यांसारखे "आले मेंदूतून आणि सुटले जिभेतून" असे करत नाहीत. सगळेच लोक स्पष्टवक्ते झाले तर भांडणे होतील आणि वाद विवाद माजतील. इतर लोक स्पष्ट बोलत नाहीत याचा अर्थ त्यांच्यात स्पष्ट बोलण्याची हिंमत नसते असे नाही, तर ते समोरच्याच्या मनाचा दहा वेळा विचार करतात, म्हणून ते गप्प असतात. तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेल्या अशा स्वत:ला स्पष्टवक्ते म्हणवून घेणाऱ्या लोकांचा अभ्यास करा आणि पहा. तुमच्या एक लक्षात येईल की ते फक्त स्वत:च स्पष्ट बोलतात. दुसऱ्याला स्पष्ट बोलू देत नाहीत. काही स्पष्टवक्ते (भ्रष्टवक्ते) अधिकाराने किंवा वयाने मोठे असल्याच्या कारणाखाली इतर स्पष्टवक्त्यांचा स्पष्ट बोलण्याचा अधिकार हिरावतात किंवा त्यांची मुस्कटदाबी करतात. अशा स्पष्ट वक्ते लोकांची आपण निंदा करायला हवी आणि त्यांना स्पष्ट बोलून त्यांची जागा दाखवायलाच हवी. आपण स्पष्ट वक्ते नसलो तरी तेवढ्यापुरते स्पष्ट बोलून त्यांना नामोहरम केलेच पाहिजे.
"भ्रष्टवक्ता निंदनीय भव | त्रस्तश्रोता वंदनीय भाव ||"
स्पष्टवक्तेपणा असावा पण तो पूर्वग्रहदूषित नसावा आणि तो फक्त कटूपणाकडे, टीकेकडे न झुकता तो "कटू/सत्य/टीका आणि गोड/सत्य/कौतुक" याचे संतुलन असावा अथवा तो नसलेलाच बरा!
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel