"निमिष, तू स्वत:ला काय मोठा तत्त्वज्ञानी समजतोस की काय?" माझ्या एका जुन्या परम मित्राने मला एकदा चिडून विचारले.
मी हसून म्हणालो, "का रे मित्रा? असे तुला वाटण्याचे कारण काय बरे?"
आम्ही पुण्यातल्या एका उपहारगृहात मस्त अमृततुल्य चहा घेत होतो. हा मित्र दहा वर्षानंतर प्रथमच मला प्रत्यक्ष भेटला होता.
मित्र चहाचा घुरका घेत म्हणाला, "कारण रोज मी पाहतो, सोशल मीडीयावर विशेष करून फेसबुक आणि व्हाटसएप वर किंवा इतर मराठी वेबसाइटवर तू सतत ज्ञान पाजळत असतोस. आपण हे करायला हवे, आपण ते करायला हवे असे सांगत असतोस. मोठमोठे लेख लिहितोस. इतर मेसेज जास्त फॉरवर्ड न करता बहुतेक वेळा स्वत:च लिहीत असतोस. एव्हढा मोठा तत्त्वज्ञानी झालास काय गेल्या दहा वर्षात? एवढं सगळं सुचतं तरी कसं तुला?"
मी स्मितहास्य करून म्हणालो, "हे बघ , मी लिहिताना असे थोडेच म्हणतो की मी तत्त्वज्ञानी आहे! "लेखक- निमिष सोनार - एक तत्त्वज्ञानी" असे मी थोडेच टाकतो लेखासमोर?"
"तसे टाकत नाही म्हणून काय झाले, पण लेखातून तर तू तत्त्वज्ञान शिकवत असतोस सर्वांना!"
"नाही! मुळीच नाही. लोकांना तत्त्वज्ञान शिकवण्या इतका मी कुणीच नाही मित्रा! मी जे लिहितो ते अनुभवातून आलेले असते, माझ्या किंवा दुसऱ्याच्या! तुला किंवा वाचणाऱ्या व्यक्तींना ते तत्त्वज्ञान वाटतंय तर मग ते तत्त्वज्ञान असेलही!" मी डोळे मिचकावत म्हणालो.
"शब्द उलट सुलट करून मला गोंधळात टाकू नको!" थोडा शांत होत तो म्हणाला.
"शब्द हे शब्दच असतात. ते सुलटच असतात. घेणारा फक्त सुलट शब्दांचा उलट अर्थ घेऊ शकतो. बाकी काही नाही!" मी म्हणालो.
हे पटल्यासारखे वाटून तो पुढे म्हणाला, "पण मला एक सांग, की तू लिहितो ते सगळ्यांना सांगतोस पण स्वत: ते करतोस का? पाळतोस का? की फक्त लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि ..."
मी म्हणालो,"मित्रा, तूच वर म्हणाला त्यानुसार "आपण" हे करायला हवे, "आपण" ते करायला हवे असे मी लिहितो. लोकांनी असे करावे, तुम्ही असे करावे असे मी लिहीत नाही. आपण म्हणजे त्यात मी सुद्धा आलोच की रे!"
"होय. तेही खरंच आहे. आणि तुझा मेसेज आला की तो मला वाचावासा वाटतोच! एक प्रखर आग असते बरेचदा तुझ्या लेखनात!"
"हे तर अधिक चांगले झाले. माझ्या लेखामुळे किंवा त्यातल्या प्रखरतेमुळे शंभर वाचकांपैकी एकाला जरी वैचारिक फायदा किंवा बदल झाला किंवा शंभरात एकाला जरी वाचून चीड आली तरी माझ्या लेखनाचा उद्देश सफल होतो ना मित्रा! एका लेखकाला अजून काय पाहिजे? वाचकांच्या प्रतिक्रिया आणि त्यांच्यात थोडा का होईना वैचारिक बदल! एवढेच!"
मित्राला अजूनही काही शंका होत्याच...
तो म्हणाला," पण, एक सांग तू जे लिहितो, ते तुझ्याबाबत घडलं असलं पाहिजे, त्याशिवाय ते इतकं प्रखर तू कसं लिहू शकतोस?"
मी पुन्हा म्हणालो, "नाही. मुळीच नाही. असं जरुरी नाही की मी जे लिहितो ते सगळं माझ्या बाबतीत घडलेलं आहे. जर एखादा लेखक फक्त आपल्या बाबत घडलेलेच खूप ताकदीने लिहू शकत असेल तर काय फायदा अशा लेखनाचा? मला संवेदनशीलतेमुळे एक अंत:स्फूर्ती, ऊर्मी आणि प्रेरणा मिळते तेव्हाच मी नीट लिहू शकतो."
"म्हणजे, मला समजले नाही?"
"हे बघ. मी थोडासा इतरांपेक्षा जास्त संवेदनशील आहे. एखादा टीपकागद असतो ना तसा! मला वाटते प्रत्येक लेखक हा संवेदनशील असतोच. लेखकच नाही तर चित्रकार, कवी आणि कोणताही कलाकार, अभिनेता हे संवेदनशील असतात, किंबहुना ते असावेत. त्याशिवाय एखादा अभिनेता कुणा एका पात्राची भूमिका कशी वठवू शकेल बरे? त्या पात्राच्या सुख दु:खाशी समरस झाल्याशिवाय! आणि समरस तेव्हाच होवू शकतो जेव्हा तो कलाकार संवेदनशील असतो. तसेच लेखकाचे सुद्धा असते. आणि मी सुद्धा आहे! आजूबाजूच्या वातावरणातील, जगातील सूक्ष्म बदल माझे मन टिपते. अवतीभवती जे लोक असतात त्यांच्या मनात काय चालले असेल, ते सध्या कोणत्या परिस्थितीत आहेत मग ती चांगली असो अथवा वाईट हे मला एखादे वेळेस त्यांनी न सांगताच काही वेळा कळते. काही वेळा ते सांगतात तेव्हा कळते. त्यांच्या सुख दु:खाला मी लेखनातून जगासमोर मांडतो. ते ही तेवढ्याच ताकदीचे लिखाण असते जसे की ते माझ्यासोबतच घडले आहे!"
एक आवंढा गिळून तो म्हणाला "बापरे! एवढं सगळं असतं का आणि असावं लागतं का लेखकांमध्ये क.. क.. कमाल आहे तुझी बरं का निमिष!"
"माझी कमाल वगैरे काही नाही. संवेदनाशीलता आणि लेखनाची अंत:स्फूर्ती आणि प्रेरणा ही मला मिळालेली दैवी देणगी आहे. त्यात माझा काही रोल नाही. मी फक्त माध्यम आहे रे! दैवी देणगीचा उपयोग केलाच पाहिजे!"
"वा! हे म्हणजे अगदी असं झालं की..."
"अरे जाऊदे! राहू दे! अजून एक गोष्ट आहे बरं का लेखनाच्या बाबतीत! कल्पनाशक्ती! जे कधीच आणि कुणाबाबतच घडले नाही तरी ते प्रत्यक्ष घडले असे लिहिता आले पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या काल्पनिक कादंबऱ्या! कदाचित तसे कधी घडणारच नाही. किंवा पुढेमागे घडेल सुद्धा! कुणी सांगावं?"
"हो! तुझी जलजीवा कादंबरी मी वाचली. खूप अद्भुत कल्पनाशक्ती वापरलीय त्यात तू! म्हणजे तुला असे म्हणायचे आहे की लेखकाकडे कल्पनाशक्ती सुद्धा आवश्यक असते संवेदनशीलते सोबत?"
"हो. अर्थातच! " मी डोळे मिचकावत त्याला म्हणालो, "आता हेच बघ ना ! आपण कधी पुण्यात असे भेटलो नाही, चहा पिला नाही आणि आपल्यात असा काही संवाद सुद्धा झाला नाही, तरीपण मी हा वरील संवाद लिहिलाच ना!"
"धन्य आहे बाबा तुझी!", असे म्हणायला ना तो मित्र तिथे होता ना मी!
कारण हा संवादच मुळात काल्पनिक आहे!!
"पण खरा असता तर तो नक्की असे म्हटला असता" डोळे मिचकावत मी माझ्या मनाशी म्हटले!!
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel