मध्यरात्र उलटून गेलेली असते. 
वातावरणात खूप थंडी असते. 
एक बैलगाडी गावाबाहेरच्या निर्मनुष्य मैदानातून चंद्राच्या उजेडात गावाकडे जात असते. 
अचानक दोन्ही बैलाच्या मधोमध एक भयप्रद कुत्रा येतो आणि गाडीच्या खाली सरकतो आणि दोन्ही चाकांच्या मधोमध चालायला लागतो. 


बरोबर बैलांच्या वेगात वेग मिसळून तो चालतो. 
बैलगाडी हाकणारा (नंदू) बैलगाडीवर बसलेल्या दुसर्‍या माणसाला (हरी) म्हणतो, 


"या गाडीखाली एक कुत्रा चालत आहे. त्या कुत्र्याला हाकलू नकोस आणि त्याचेकडे बघू नकोस गावची वेस (बाॅर्डर) येईपर्यंत! एकदा गावात शिरलो की हा कुत्रा नाहीसा होईल"

हरी म्हणतो, "मी हे मानत नाही. कुत्र्याकडे समजा मी पाहिले किंवा हाकलले तर काय होईल?"

"सांगता येत नाही काय होईल पण त्यानंतर तू गावापर्यंत पोहोचणार नाही हे नक्की! या रस्त्यावर अनेक प्रकारच्या शिकारी सैतानांचा वावर आहे. हा कुत्रा नाहीसा होईपर्यंत मी सुद्धा बैलगाडी मुळीच थांबवणार नाही. थांबलो तर आपण संपलो."

"हॅट. नाही मानत मी. खोटे आहे ते"

"तुझे ते विचार तुझ्या मनात ठेव. फक्त काही विपरीत कृती करू नको. नाहीतर आपण संकटात सापडू"

"हट! मी नाही मानत रे! चल तू! गाडी चालव!" असे म्हणून तो आकाशाकडे पाहत बसून राहतो.

"अन काय रे. त्या कुत्र्याला पाहून बैल बिथरत नाही का? 
तो कुत्रा खरा कुत्रा आहे की कुणी सैतान कुत्र्याचे रूप घेऊन आलाय?"

"गप बस. पडून राहा. फालतू प्रश्न विचारू नको. शांत. एकदम!"

"आणि हे कुत्रं अजून एकदाही भुंकलं कसं नाही? किती हुशार कुत्रं आहे रे!"

"गप बस ना. गुमान पडून राहा. या सगळ्या अडथळ्यांकडे लक्ष देऊ नको. हे मैदान संपलं की जंगल लागेल. त्याला पार केले की नदी, पूल आणि मग गावची वेस येणार. मग हे अडथळे संपतील आणि आपण श्रीमंत होणार. विसरलास? "

"हा कुत्रा? आणि अडथळा? कायपन! आता त्याला उचलतो आणि फेकतो आकाशात. उतरू का? फेकू?"

"आरे, आता गप्प बैस! नाहीतर मीच तुला उचलून झाडाला लटकवेल! मग एखादा विक्रम येईपर्यंत वाट पहा. तुला पाठीवर घेऊन जाईल आणि छान छान गोष्टी सांगेल तो!"

"अरे मुर्खा. वेताळ सांगतो गोष्टी विक्रमाला! विक्रम नाही!"

"हो, माहितेय. मी पण ऐकल्या आहेत गोष्टी बिरबलाच्या लहानपणी!"

"आता बिरबलाच्या गोष्टीत वेताळ कोठून आला?"

"आला असेल एखाद्या रात्री खिडकीतून! तुला काय करायचं? आता गप्प बर ना! त्या थैली कडे लक्ष दे आणि! तीच आपल्याला श्रीमंत करणार आहे! विसरलास का?"

बैलगाडीवर बाजूला एक काहीतरी भरलेली एक थैली असते आणि एक काठी सारखे काहीतरी त्या थैलीजवळ ठेवलेले दिसते. हरी थैली व्यवस्थित आहे की नाही त्याची खात्री करतो. चंद्राच्या उजेडात ती बैलगाडी पुढे जात राहते. पंधरा मिनिटे बैल, कुत्रा आणि गाडी या व्यतिरिक्त कुणीच हालचाल करत नाही.....


त्यावेळेस जंगलातल्या झाडांनी सुद्धा पाने हलविणे थांबवलेले असते. मात्र झाडांवरचे काही अभद्र, पाशवी पक्षी आणि प्राणी अस्वस्थ झालेले असतात. दूरवरच्या त्या बैलगाडीच्या आवाजाने ते खिन्न होतात. त्याना अंगात एक प्रकारची खुन्नस जागृत होते आणि त्यांचे मन त्याना शिकार करण्यासाठी प्रेरणा देऊ लागते. इतर झाडांवरचे अभद्र काळे आत्मे सुद्धा त्या थैली मधल्या वासाने अस्वस्थ होतात.  त्या सगळ्या अभद्र प्राणी, पक्षी आणि आत्म्यांची नजरानजर होते आणि ते निराश होऊन  खिन्नपणे हसतात. एक भुरकट काळा आत्मा न रहावून त्या थैलीकडे झेपावतो....

बैलगाडी वरचे "ते" दोघे अंगावर काळी चादर घेऊन निश्चल पडून असतात. त्या थैलीत अचानक हालचाल जाणवायला लागते. ती पिशवी हाताशी धरून बसलेला हरी दचकतो.

"अरे नंदू, थैली हालतेय! झाडावरच्या आत्म्यांना दुरून वास येतो वाटते?"

"काय सांगतो? गप बस! लय गंमत करायची लहर येते तुला? "

"अरे खरंच सांगतोय! थैली हालतेय! डान्स करतेय!"

"आता गप बसतोस का थांबवू बैलगाडी?"

"आरे. ते हलतंय! थैलीमधून!"

"च्या मारी! आता आणू का कुत्र्याला पकडून आणि टाकू तुझ्या डोक्यावर?  तूच तर गोळी घातली होती ना त्याला स्वतः च्या हाताने त्या नळीमधून?"

"होय! मीच मारलं होतं त्याला!"

"तूच केली ना शिकार त्याची! मग पुन्यांदा कसा जिवंत होईल तो? एकदा म्हणतो माझा या गोष्टींवर विश्वास नाय आणि एकदा म्हणतो मेलेला प्राणी जिवंत झाला?"

हरी काही म्हणणार तेवढ्यात त्या थैलीतून एक विचित्र काळा प्राणी बाहेर निघतो आणि खाली उडी मारतो. हरी त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो पण तो त्याच्या हातातून सटकतो. कुत्र्याच्या मागोमाग बैलगाडी खाली तो काळा प्राणी सुद्धा चालू लागतो. 

नंदू हरी वर संतापतो, 

"एक तर शिकार नीट करता येत नाय अनं एक थैली बी नीट सांभाळता येत नाय? गमावलं ना सगळं. कसे मिळणार पैसे आता त्याला विकून?"

"अरे थांबव की गाडी! मी उतरतो आनं आणतो त्याला पुन्हा पकडून. मी नाय घाबरत त्या कुत्र्याकडं बघायला! "

"खबरदार. मी गाडी थांबवणार नाही. आता गेलं ते गेलं! त्या कुत्र्याकडे जाऊ नको बाबा! नको!"

"अरे थांबव की मूर्खा! " असे म्हणून हरी बैलांचा दोर नंदू कडून हिस्कावीन हातात घेऊन गाडी थांबवण्याचा प्रयत्न करतो पण नंदू त्याला संतापाच्या भरात बैलगाडीच्या खाली फेकतो........

"जा त्या कुत्र्याकडे! आणि पळ चार पायांवर त्याचेमागे. मुर्खा!!"

 ......खाली पडल्यावर क्षणभर हरी ची त्या कुत्र्याशी नजरानजर होते. कुत्रा पांढरा फटक असतो आणि करुणपणे रडत असतो. त्याचे लालजर्द डोळे प्रखरपणे चमकत असतात. पण हरी कडे बघितल्यावर तो हसतो आणि हरी चे डोळे कुत्र्याच्या डोळ्यांत काही क्षण बांधले जातात. तो विचित्र प्राणी कुत्र्याच्या मागे चालत असतो....


.....अचानक हरीला दूरवर बैलगाडी च्या मागच्या बाजूला दोन दिवे हालताना दिसतात. बहुदा एखादी कार असावी असे त्याला वाटते! तेवढ्यात तो काळा प्राणी पुन्हा बैलगाडीवर उडी मारतो. 

हरी त्या प्राण्याला पुन्हा पकडायला जाणार तेवढ्यात बैलगाडी बरीच पुढे निघून जाते. तो जिवाच्या आकांताने बैलगाडी मागे धावायला लागतो आणि बंदूक काढून घेण्यात तो यशस्वी होतो. पण प्राणी बैलगाडीवरच राहतो. त्यानंतर मात्र बैलगाडी अचानक बैलांना पंख फुटल्यासारखी वेगात धावायला लागते. तो त्या प्राण्याच्या दिशेने गोळी मारतो पण त्या बैलगाडीचा वेग गोळीपेक्षा जास्त झाल्यासारखा त्याला वाटते.

"थांबव गाडी लेका! " हरी ओरडतो.

"मला जान प्यारी आहे. पैसा नाय!" नंदू म्हणतो.

"अरे पण त्यो प्राणी पुन्हा बैलगाडीवर आलाय. थांब माझ्यासाठी. एकट्यानेच पैसा खायचा विचार हाय का?" हरी ओरडतो.

नंदू आश्चर्याने मागे त्या प्राण्याकडे पाहतो....
पण बैलगाडी थांबण्याच्या पलीकडे गेलेली असते. 
बैलांचे डोळे हिरवे झालेले असतात...
तो काळा प्राणी हरीच्या खांद्यावर जाऊन बसतो आणि विकट हास्य हसतो. 
कुत्रा मात्र मागेच राहतो...
तो कुत्रा एका जागी थांबतो आणि हरीकडे चालू लागतो. 
तो प्राणी नंदूच्या डोळ्यात बघून पुन्हा बैलगाडीखाली उतरतो आणि बैलांच्या खाली जाऊन धावू लागतो.


.....दूरवरच्या त्या कार मध्ये मागच्या सीटवर बसलेला मनुष्य सुनील हा बबन ड्रायव्हरला म्हणतो,

" अरे बाब्या, आपला बाॅस पण ना, किती काय काय करायला लावतो. आता पन्नास हजारासाठी हे डिक्की मधले प्रेत नदीत फेकाया लावतो ना तो." - सुनील

" गप बस रे. पैका पायजेल तर हे काम करायला पायजे का नाय?!" - बबन

"अरे पण, एखादा खून बीन केला असता ना मी! पण हे ओझं घेऊन जाऊन नीस्तं नादूत फेकून यायचं हे काम किती दिवस करायचं काही कळंना!"- सुनील

"बाकी हे मात्र झ्याक झालं की आपल्या बॉस ला त्याची शिकार लई लवकर गावली. एकाच पिस्तुलाच्या गोळीत तो माणूस मेला आणि आता आपल्या डिक्कीत आहे बघ!" - बबन

दरम्यान झाडांवरचे चार अभद्र काळे आत्मे त्या कारकडे झेपावतात. त्याना त्या डिक्की मधल्या प्रेताचा वास आलेला असतो....

"हा! खरं आहे ते. खूप अभद्र माणूस होता तो आणि आता आपल्याजवळ आहे. मेलेला. निश्चल! पण बबन मला कधी नाही ती आता जास्त भीती वाटते आहे . त्याचे डोळे किती भयानक आहेत रे. मेला तरी वाटत होतं आपल्याकडेच पाहतोय तो!" - सुनील

बबन म्हणतो, "गप बस सुनील. एक तर हा ईलाका लई डेंजर हाय. मैदान पार केलं की एक जंगल लागंल. मग एक पूल. त्या पुलावरून हे पोतं खाली फेकायचंय. आता या सैतानी इलाक्यातून लवकर पार व्हायचं. बास!"

दरम्यान काळे आत्मे वेगाने डिक्कीत शिरतात...
आधीच मृत्यू ची शिकार झालेल्या देहांची "शिकार" करून त्यांना आणखी शिकार करण्यास सज्ज करण्यासाठी जिवंत करायला ते काळे आत्मे हपापलेले असतात. नेहेमी. रोज. रात्री. तयार बसलेले असतात. झाडांवर! 

"का रं? काय इशेष हाय या इलाक्यात?" सुनील विचारतो.

"आरं, आता नको ईचारू! रातच्याला सैतानाचं नाव घेतलं तर त्याला ताकद मिळते. या रस्त्यावर लई शिकारी सैतान असत्यात! गप बास! गप गुमान. शांती ठेव!"

"आरं, शांतीची कशाला याद दिली रे? कधी तिला भेटतो आसं झालंय! सकाळी चा पिऊन भेटतो तिला आणि रातच्याला दारू पिऊन ..."

समोर दूरवर एक अंधुक मनुष्य आणि त्यासोबत एक अंधुक कुत्रा बघून बबन करकचून ब्रेक दाबतो.  दरम्यान सुनील च्या उजव्या खांद्यावर एक खरबडीत हात पडतो आणि तो दचकून मागे पाहतो तर काहीच दिसत नाही. 

तेवढ्यात कुत्र्याच्या लाल डोळ्यांत बघून बबनचे डोळे थिजतात. तो अंधुक माणूस बबनला बंदुकीचा धाक दाखवून गाडीत बसू द्यायची "विनंती" करतो...

"चल त्या बैलगाडीचा पाठलाग कर. चल लवकर!" हरी म्हणतो.

बबन गाडी सुरू करतो आणि सुनीलला मदतीची विनंती करतो पण सुनील निश्चल पडून असतो. कारच्या मागच्या सीटवरचा तो सुनील त्या जिवंत झालेल्या प्रेताच्या हल्ल्यात मृत झाल्याचे बबनला माहीत नसते.

चंद्राच्या उजेडात त्या मैदानावर सुसाट वेगाने धावणारी बैलगाडी, त्या खाली धावणारा तो जिवंत झालेला विचित्र प्राणी, त्यामागे धावणारी कार आणि कारमागे सुसाट धावणारा पांढरा कुत्रा!

हा विचित्र पाठलाग अर्ध्या तासानंतर जंगलात शिरतो.


तो पाठलागाचा वेग आणि आवाज जंगलातील झाडांवर आरामात बसलेल्या घुबड आणि वटवाघुळे याना सहन होत नाही. ते एकमेकांकडे बघू लागतात, चिडतात आणि त्या बैलगाडी अन कार यावर झेपावतात. चंद्रप्रकाश जंगलातल्या झाडांमुळे क्षीण होत जातो. 


जंगलातल्या रस्त्यातून वरून तो काळ्या पक्ष्यांचा फक्त थवा सरकताना दिसतो एवढे त्या बैलगाडी आणि कारला झाकले जाते. 


पुढे अरुंद पुलावरून जाताना वेगामुळे बैलगाडी आणि नंदू पाण्यात खाली पडतात. तो विचित्र प्राणी पुलावरच राहतो. 

नंतर त्यामागोमाग पक्ष्यांना घाबरलेला बबन, सुनील आणि हरी हे सर्व कारवरचे नियंत्रण सुटल्याने त्या कार सहित थंडगार पाण्यात पडतात.  


ते जिवंत झालेले प्रेत मात्र पुलावरच राहते. तो विचित्र प्राणी पुलाच्या कठड्यावर चढतो आणि आनंदाने पाण्यात पडलेले माणसं पाहून हर्षभरित होतो. 


दोन्ही बैल पाण्यातून निघून काठावर येतात आणि गावाकडे जायला लागतात. 


ते प्रेत सुद्धा वाकून पाण्यात बघत हसते. तो प्राणी आणि प्रेत एकमेकांकडे पाहून हसतात आणि पुन्हा जंगलाकडे चालू लागतात. लवकरच पांढरा कुत्रा त्याना येवून मिळतो आणि ते सज्ज होतात पुढच्या शिकारीसाठी!!!


प्रेत, घुबड आणि वटवाघळे हसत हसत झाडांवर जाऊन बसतात. काळे आत्मे पुन्हा झाडांवर जाऊन बसतात. तो प्राणी आणि कुत्रा पुन्हा त्या चंद्रप्रकाशाताल्या मैदानात येतात! दुरून एक शववाहिनी येत असतांना त्याना दिसते. कुत्रा आणि तो प्राणी त्या शववाहिनीच्या समोर येवून थांबतात..!!  काळ्या अभद्र आत्म्याचे काम ते दोघे निभावणार असतात. शववाहिनीच्या बाजूच्या रिकाम्या सीटवर ड्रायव्हरला अचानक  कुणीतरी बसलेलं दिसतं...आणि ते दात विचकून हसत असतं. त्याचे हिरवे डोळे श्वास रोखून एकसारखे बघत असतात...कथा येथे संपते आहे. पण ही शिकारीची साखळी चालूच असणार आहे. कृपया त्या जंगलात जाऊ नका...त्या अखंडपणाची तहान असलेल्या त्या शिकारी साखळी मध्ये एक कडी बनू नका. तुम्हाला ही साखळी तोडायची आहे का? अनेकजण तोडायला गेले पण साखळीचा एक भाग बनून गेलेत! बघा प्रयत्न करायचा तर जाऊ शकता साखळी तोडायला!

(समाप्त)

कृपया आपल्या प्रतिक्रिया कथेच्या खाली आपल्या  gmail ने login करून जरूर द्या किंवा मला इमेल ने प्रतिक्रिया पाठवा.कथा आवडल्यास माझा ब्लॉग सर्वाना वाचायला सांगा तसेच फेसबुक, ट्विटर वर जरूर शेअर करा. धन्यवाद!! sonar.nimish@gmail.com
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel