आजकाल बायोपिक बनवण्याचा ट्रेंड बाॅलीवूडमध्ये जोर धरू लागलाय.उदा. पौराणिक, ऎतिहासिक, राजकारणी, स्वातंत्र्यसैनिक वगैरे. (बाजीराव मस्तानी, बाळकडू, लोकमान्य वगैरे) विशेषत: क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींच्या जीवनावर चित्रपट जास्त बनत आहेत! हरकत नाही. सिनेक्षेत्र वगळता इतर क्षेत्रातील व्यक्तींवर ते बनलेत तर आपण समजू शकतो. उदा. भाग मिल्खा भाग, अझहर वगैरे.
पण ज्याचेवर बायोपिक बनतंय त्यांची त्या क्षेत्रातील कारकीर्द तर कमीत कमी पूर्ण होऊ द्यायला हवी ना! मग त्याचेवर सिनेमा बनवायला हरकत नाही. पण आजकाल, मेरी कोम, धोनी यांचेवर सिनेमे बनत आहेत पण त्यांची अजून त्या त्या खेळांतली कारकीर्द संपली नसतांना घाईघाईने त्यांच्यावर सिनेमे बनवण्याचा बाॅलीवूड चा अट्टाहास समजण्यापलीकडचा आहे. एवढी घाई कशाकरता?
तसेच त्या कलाकाराचे व्यक्तिमत्व त्या व्यक्तीला शोभेल असे असले पाहिजे! सुशांतसिंग राजपूत चुकूनही धोनी वाटत नाही. निदान माझे मन तरी तसे स्वीकारायला तयार होत नाही आहे.
आणि आता हद्द म्हणजे सिने क्षेत्रातील व्यक्तींचेच म्हणे बायोपिक बनवण्यास सुरूवात होत आहे. आता इथे खरी गडबड होणार! आणि असे करणे म्हणजे एक प्रकारे पानी मे रहकर मछली से बैर करण्यासारखा प्रकार नाही का होणार? आता संजय दत्तवर बायोपिक बनवत आहेत असे मी कुठेतरी वाचले. पण मग त्यात तो स्वतः काम करणार नाही हे गृहीत धरले तर त्याला शोभेल असा दुसरा कोण आहे? कुणी म्हणे रणबीर कपूर! शोभेल तरी का तो संजय दत्त म्हणून? अशा चित्रपटांची लाट आली तर मग कास्टींग डायरेक्टर ची धांदल नक्की उडेल.
जरा विचार करा, समजा बिग बाॅस अमिताभ च्या जीवनावर चित्रपट बनवायचा ठरला तर त्याची भूमिका कोण करू शकेल का? अभिषेक? नाही! मला तरी वाटतं कुणीच नाही. आणि समजा अमरिश पुरी च्या जीवनावर चित्रपट काढला तर? त्याची भूमिका कोण करणार? सुनिल शेट्टी? की अशिष विद्यार्थी? की डॅनी? समजा आता पडद्यावर डॅनीने जीव तोडून अभिनय केला तरी तो डॅनीच वाटणार! अमरीश पुरी कोणत्याच अँगलने (शरिराच्या आणि अँक्टिंगच्या) वाटेल का? अनुपम खेर च्या बाबतीत हा प्राॅब्लेम कदाचीत येणार नाही कारण राजू खेर आहे ना!
आणि खरी गोची होईल ती अभिनेत्रींच्या जीवनावर चित्रपट बनवतांना! एकतर सहसा कोणत्याही दोन समकालीन आणि यशस्वी अभिनेत्रींचे एकमेकांशी पटत नाही. मग मज्जा येईल! कत्रीना कैफच्या जीवनावर चित्रपट बनवला तर समजा त्यात प्रियांका चोप्राला घेतले तर? त्या चित्रपटाच्या प्रमोशनकरता तरी त्या दोघी एकमेकांची तारिफ करतील का? आणि श्रीदेवीच्या जीवनावर चित्रपट बनवला आणि ती भूमिका दिपिकाला (पडुकोण) दिली तर? शोभेल का ती? श्रीदेवी आणि दिपिकाची शरिरयष्टी कोणत्याच अँगल ने मॅच होणार नाही. बहुदा मनिषा कोईराला शोभेल का? आणि श्रीदेवीवर बनलेल्या चित्रपटात बोनी कपूरची भूमिका कोण करेल? अनिल कपूर? आणि मग अनिल कपूरची भूमिका कोण करेल?संजय कपूर? आहे ना सगळा सावळा गोंधळ?
मग पुढे पुढे डायरेक्टर, सिंगर, प्रोड्यूसर यांच्या जीवनावर चित्रपट बनतील! शक्यता नाकारता येत नाही.
बघूया पुढे काय होते ते?
लेखक: निमिष सोनार, पुणे
sonar.nimish@gmail.com
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel