दि: ९/९/२००९, ९:०० पियुष पार्क
सुजय सूर्वे गाढ झोपेतून जागा झाला तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते. खिडकीतून पाहिल्यावर कधी नव्हे तो सूर्य आज अगदी तेजस्वी दिसत होता. सुजय अगदी अभ्यासू आणि आज्ञाधारक मुलगा. तितकाच अंगापिंडाने मजबूत. रोजच्या दिनक्रमात व्यायामाला तो महत्त्व द्यायचा. यंदाचे बारावीचे वर्ष. पीसीएम ग्रुप निवडला होता त्याने. मॅथ्स त्याचा आवडता विषय. रोज सकाळी पाच वाजता उठून तो सहा वाजता सुरू होणार्‍या मॅथ्स च्या ट्युशन साठी तयार व्हायचा. ट्यूशनला जायला पप्पांनी घेवून दिलेली स्कूटी त्याला उपयोगी पडायची. खुप थंडी. बरेचदा धुके रस्ता व्यापून टाकायचे.
पण आज आपल्याला पहाटे कुणी उठवले कसे नाही याचे त्याला आश्चर्य वाटले. मोबाईलचे रिमाईंडर वेळेवर वाजून चुकलेले होते. चारपाच एस्.एम. एस. येवून धडकलेले होते. बाजूला नेहेमीच्या जागी असणारे त्याचे स्वेटर दिसत नव्हते.
त्याचे डोके अचानक दुखायला लागले. एक असह्य वेदना.... एका सेकंदाकरता...
"अरेच्च्या, पण मला असं का वाटतंय की मी सकाळी उठलो होतो? छे! ... भास किवा स्वप्न असेल. आता पटकन मी ब्रश करतो, अन तयारीला लागतो.. ट्यूशन बुडाल्या. आता सरळ कॉलेजलाच जाईन......अगं आई...."
त्याने आईला आरोळी मारली. घरातून त्याच्या हाके ला आईचे "ओ" आले नाही.
त्याने परत हाक मारली, "आई" ...
***
दि: ९/९/२००९, ६:१५, कुलकर्णी क्लासेस
तो कुलकर्णी सरांकडे ट्युशनला जायचा. त्यांचा तो आवडता विद्यार्थी. अनेक मॅथ्स चे प्रमेय तो चुटकीसरशी सोडवायचा. क्लास मधील इतर मुलांनाही तो खुप मदत करत असे. सव्वा सहा वाजले आणि सुजय आला.
तेव्हा कुलकर्णी सर म्हणाले, " अरे, आज उशीर? काय झाले?"
सुजय म्हणाला, "रस्त्यात धुके होते. म्हणून थोडा उशीर झाला."
असे म्हणून तो बाकावर बसला. येतांना त्याने स्वेटर घातलेले होते. पण आता त्याचे अंगावर नव्हते. शेजारी बसलेल्या सुंदर आणि स्मार्ट सुजाताला त्याने हाय हॅलो केले. ते दोघे लहानपणापासूनचे मित्र. त्याचे डोके अचानक दुखायला लागले. एक असह्य वेदना.... एका सेकंदाकरता..
तो मनातल्या मनात म्हणाला," मला आता असे का वाटत आहे की मी पळतोय? छे! भास असेल."
कुलकर्णी सरांनी डेरिव्हेटिव्ह् शिकवायला घेतले.
पण, पाचच मिनिटांत कुलकर्णी सरांचा मोबाईल थरथरला...
***
दि: ९/९/२००९, ६:१५, होळकर हायवे.
सुसाट वेगाने एक मारुति धावत होती. दाट धुके. अन अंधार.
गाडी चालविणारी व्यक्ती, रॉकी उर्फ राकेश घामाने निथळत होती. एवढ्या थंडीत सुद्धा.
कालची चढलेली एका झटक्यात उतरली होती. त्याला कारणही तसेच होते. त्याचेकडून स्कूटीवरच्या एका मुलाला चुकून ठोकर मारली गेली होती. चूक राकेशचीच होती. पूर्णपणे. ठोकर एवढी जबरदस्त होती की स्कूटी उंच उडाली होती आणि एका झाडाला आदळली. पुढे काय झाले ते बघायची राकेशने तसदी घेतली नाही. त्याने सुसाट धूम ठोकली.
पण आता समोरच्या आरशात त्याला काहितरी दिसले आणि त्याचा घाम अजून वाढला. त्याने धडक दिलेला मुलगा- सुजय, हा अंगातील स्वेटर काढून फेकुन देऊन शिवीगाळ करून त्याचा पाठलाग करत होता... पळत पळत... पण त्या मारूतीच्याच वेगाने. पळता पळता सुजयचे डोके अचानक दुखायला लागले. एक असह्य वेदना.... एका सेकंदाकरता... "मला असे का वाटते आहे की मी फोनवर बोलतोय?" पण सुजय सावरला. पळायला लागला. सुसाट वेगाने तो थरारक पाठलाग करु लागला.
त्याने मारूतीचा मागचा काच फोडून मागच्या सिटवर प्रवेश केला आणि पुढचा काच फोडून समोरून येणार्‍या ट्रक खाली त्या ड्रायव्हरला टाकले. स्वतः हवेत उडी मारली. मारुती सहीत राकेश शंभर फुट उडाला... आणि त्यावेळेस हवेत सुजय विकट हास्य ससत होता. त्याचा बदला पुर्ण झाला होता... नंतर सुजय ची आकृती लहान होत होत अदृश्य झाली...
***
दि: ९/९/२००९, ७:५०, हर्डीकर हॉस्पिटल
ऑपरेशन थिएटर मध्ये सुजयच्या जगण्याची आशा सोडून दिलेले डॉक्टर मशिनच्या आवाजाने आश्चर्यचकीत झाले. " धीस इज मिरॅकल" एवढेच ते म्हणाले. सुजय जीवंत होता.
त्याचे आई वडीलांनी देवाचे आभार मानले. डॉक्टरांनी त्याला काही दिवस तेथेच राहू देण्याचे सांगितले. काही औषधे आणण्यासाठी सुजयचे आई-वडील बाहेर निघून गेले.
घरी जावून काही सामान घेवून यायचा असा त्यांचा विचार झाला आणि ते निघाले...
***
दि: ९/९/२००९, ९:०० पियुष पार्क
...घरात शिरताच "आई" आशी मोठी आरोळी ऐकू आली. "आई, तू मला लवकर का उठवलं नाहीस?" असे म्हणत सुजय घरतून बाहेर आला. ते पाहून आई बेशुद्ध पडली.
नंतर सुजय ची आकृती अपराधीपणाची भावना वाटून लहान होत होत अदृश्य झाली...
दि: ९/९/२००९, ६:१५, कुलकर्णी क्लासेस
... मोबाईलवर जेव्हा कुलकर्णी सरांनी सुजय च्या वडीलांना सांगितले की सुजय क्लासला आला आहे, तेव्हा त्यांचा विश्वास बसेना. कारण त्याचा तेव्हा अ‍ॅक्सिडेंट झाला होता. कारण मोबाईलवरून सुजयने अ‍ॅक्सिडँट झाल्याचे त्याच्या आई वडीलांना लगेच सांगितले होते. हे ऐकून सरांच्या हतातून मोबाईल गळून पडला. नंतर सुजय ची आकृती लहान होत होत अदृश्य झाली... घडले ते त्यांच्या आकलनापलीकडचे होते....
***
१२/१२/२००९
सुजय पूर्ण बरा झाल्यावर सुजयचे आई-वडील एका मानसोपचारतज्ञा कडे गेले. घडलेल्या घटनांचा अर्थ विचारयला. ते त्यांचे चांगले मित्र होते. .आईच्या म्हणण्यानुसार गावातल्या एका बाबाने हे आत्म्याचे काम आहे असे सांगितले. मेल्या नंतरचे जग कुणी पाहिलेले नाही. त्यामुळे आत्मे काय करू शकतात, ते मानवाला पूर्ण जाणणे शक्य नाही. मानसोपचार तज्ञ मात्र वेगळेच विष्लेषण करत होते.
ते म्हणाले, " मानवी मन आनि मेंदू हे गूढ आणि अगम्य आहे. विज्ञानाला त्याचे पूर्ण कोडे अजून उलगडलेले नाही. पण या घटनेचा अर्थ आपण असा लावू शकतो की खूप काही करायचे राहीले असतांना अचानक अकस्मात आघात होवुन मृत्य झाला तर ते मन मानायला तयार होत नाही. आत्मा हा एका वेळी अनेक रुपे घेवू शकतो. एकच रुप अनेक वेळा घेवू शकतो. आजच्या युगाच्या भाषेत सांगायचे झाले तर, कॉम्प्युटर वर अनेक प्रोग्राम एकाच वेळेस रन होत असतात. त्याला आपण मल्टि-टास्कींग म्हणतो. कॉम्प्युटर हाच मुळात आपल्या शरिर रचनेच्या आधारे विचार करुन मानवानेच बनवला आहे. तेच मानवी मेंदू (सीपीयू) बाबत होते. मेंदू ची शक्ती आपण फक्त दहा टक्केच वापरतो. पूर्ण वापरल्यास काही अगम्य गोष्टींचा उलगडा आपल्याला नक्की होईल. कदाचीत, मेंदू उर्वरीत शक्ती मृत्युनंतरच्या "जीवना" साठी वापरत असावा...."

आजही सुजय त्या सगळ्या घटनांना आठवून हादरतो. चारही ठीकाणी एकाच वेळेस तो होता हे खरे होते आणि प्रत्येक ठीकाणी इतर ठीकाणी असल्याचा भास त्याला व्हायचा. पण त्या घटनेनंतर सुजय ला तसे नेहेमी घडायला लागले. कारण तो जेव्हा मृत्युच्या दाढेतून परतला तेव्हा कुणीतरी प्रकाशमान व्यक्ती त्याला भेटल्याचे त्याला पुसटसे आठवते. आता तीव्र इच्छा व्यक्त केल्यावर तो हव्या त्या ठीकाणी असतो आणि प्रत्येक ठीकाणी त्याला इतर ठीकाणी तो काय करतोय त्याची स्मृति सुद्धा राहाते....
प्रबळ इच्छाशक्ती असेल तर काहीही शक्य आहे...


कृपया आपल्या प्रतिक्रिया कथेच्या खाली आपल्या  gmail ने login करून जरूर द्या किंवा मला इमेल ने प्रतिक्रिया पाठवा. कथा आवडल्यास माझा ब्लॉग सर्वाना वाचायला सांगा तसेच फेसबुक, ट्विटर वर जरूर शेअर करा. धन्यवाद!! sonar.nimish@gmail.com
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel