"लाज वाटली पाहिजे तुम्हाला, खुशाल पेपरात बातम्या शोधता?"

"लाज तुम्हाला वाटली पाहिजे! पेपरात बातम्या सोडून इतर सगळं काही छापता!"


"मला सांगा, काय ठेवलंय बातम्यांमध्ये? विविध गुन्हे, कोणता नेता काय बरळला त्यावर दुसरा नेता काय म्हणाला, दुष्काळ, हिरो हिरॉईन्सचे लफडे आणि ब्रेकप, चहा कॉफी पिण्याचे कधी फायदे तर कधी तोटे, दुष्काळ आणि अतिवृष्टी, अत्याचार, जाळपोळ, आंदोलनं, हिंसाचार, लाचखोरी यासारख्या नकारात्मक बातम्यांशिवाय असतं तरी काय आजकाल? म्हणून आम्ही पेपरात आजपासून बातम्या छापणं बंद करून टाकलं!"


"मग आम्ही पेपर कशाकरता घ्यायचा? जाहिरातींसाठी?"


"हो! जाहिराती वाचल्याने आपल्यात सकारात्मकता वाढीस लागते जसे वेगवेगळ्या सणांना महागड्या कार, मोबाईल, टीव्ही, फ्रिज, सोने दागिने,विविध हॉटेल आणि त्यातील थाळ्या यांची चित्रं आणि त्यांच्या किमती पाहून पोट भरते तसेच डोळ्याचं पारणं फिटते. तसेच स्त्री पुरुषांचे वेगवेगळे आतले बाहेरचे कपडे व त्यांचे प्रकार यांचे ज्ञान आपल्याला होते. सामान्य ज्ञान वाढीस लागते. जाहिरातींना कमी लेखू नका! बातम्या वाचणं सोडा आजपासून! आम्हाला पेपर छपाईचा खर्च जाहिरातीतूनच निघतो! मोठे निघाले आहेत बातम्या वाचायला!"


"वा रे म्हणे बातम्या वाचणं सोडा! कंप्लेंटच करतो ग्राहक मंचाकडे तुमची!"


"काही उपयोग नाही! आम्ही कुठेही असा नियम किंवा करार केलेला नाही की वर्तमानपत्रात बातम्याच असायला हव्या. आजच्या वर्तमानातील विविध वस्तूंच्या किमती वाचायला मिळतात ना, याचाच अर्थ वर्तमानपत्र!"


"न्यूज चॅनेल्सनी आधीच बातम्यांशी फारकत घेऊन दहा वर्षे झाली. आता वर्तमानपत्रेसुद्धा त्याच मार्गावर चालू पाहताय!"


"हे बघा! तुम्हीही आता चालू लागा येथून. तुम्हाला नको असेल तर आमचा पेपर बंद करा! सगळे पेपर वाचणे बंद करा!"


(कधीकाळी हे खरोखर घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही!)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel