आपल्या मनातल्या विचारांबाबतचा एक नवा विचार मी येथे मांडत आहे. त्या नव्या विचाराचा स्वीकार झाल्यास तसे जरूर कळवा.

बरेचदा आपल्याला दोन प्रश्न भेडसावत असतात.
म्हणजे खाली दिलेल्या या दोन प्रश्नांबाबत आपण "विचार" करतो:
लोक काय विचार करतील?
लोक काय म्हणतील?

मला असे वाटते की लोक काय विचार करतील याचा विचारही आपणच केला तर लोकांना विचार करायला काहीही उरणार नाही आणि आपल्याला काय विचार करायचा आहे तेच मात्र राहून जाईल आणि त्यामुळे आपण मात्र लोकांच्या विचारपद्धतीचे गुलाम होवून जाऊ.

लोकांना त्यांच्या पद्धतीने विचार करू द्या.
आपण आपल्या पद्धतीने विचार करा.
आपण आपल्याच विचारांवर नियंत्रण मिळवू शकत नाही तर इतरांच्या विचारांवर काय नियंत्रण करणार?

जे विचारांच्या बाबतीत तेच लोकांच्या बोलण्याच्या बाबतीत लागू होते.
लोक काय बोलतील याची आपल्याला भीती असते.
लोक काय बोलतील याचा आपण विचार करतो.
त्यामुळे आपल्याला स्वतः विचार करायला वेळ उरत नाही.
जीवन क्षणभंगुर आहे. ते "लोक काय विचार करतील" आणि "लोक काय बोलतील" याचा विचार करण्यात वाया घालवू नका.

तुम्ही जे करत आहात ते स्वतः: शी प्रामाणिक राहून करत असलात तर लोकांच्या विचारांची आणि बोलण्याची भिती बाळगण्याची गरज नाही.
लोकांचे बोलणे मनाला लावण्याची गरज तेव्हाच असते जेव्हा लोक जे बोलत आहेत त्यात तथ्य असेल.
जर द्वेष बुद्धीने लोक बोलत असतील आणि ते असत्य असेल तर ते मनाला लावण्याची अजिबात गरज नसते.
ते बोल नंतर बोलणाऱ्यावर उलटतात हे नक्की.

आणि लोकांच्या बोलण्यात तथ्य असेल तर त्यावर जरूर विचार करावा.
कारण विचारात, बोलण्यात, शब्दांत, वाक्यांत खूप ताकद असते.
प्रभाव असतो.
ऊर्जा असते.
ते कधी ना कधी बोलणाऱ्यावर अथवा ऐकणाऱ्यावर परिणाम करतातच.

आणि हे लोक म्हणजे कोण? आपण वगळता इतर? पण मग असे जगातल्या त्या लोकातल्या प्रत्येकासाठी आपण स्वतः: सुद्धा "लोक" या प्रकारात मोडतोच ना!

बरेचदा आपण आपल्याच बोलण्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही, तर लोकांच्या बोलण्यावर काय ठेवणार?
बोलण्यावर नियंत्रण न ठेवू शकण्याचे कारण म्हणजे आपले आपल्या विचारांवर नियंत्रण नसणे!

विचारांवर आपण नियंत्रण कमी प्रमाणात मिळवू शकत असतो तरी आपण आपल्या स्वतः: च्या बोलण्यावर नियंत्रण नक्कीच मिळवू शकतो.

बोलणे म्हणजेच संवाद साधणे हेच आजच्या जगात महत्त्वाचे आहे.
संवाद विचारांवर अवलंबून आहे.
विचारांना दिशा द्या. त्यामुळे आपला संवाद प्रभावी होईल.

विचारांची दिशा योग्य आणि सकारात्मक असेल तर एक विशिष्ट दृष्टिकोन जन्मतो.
मात्र गरजेनुसार आपली दिशा बदलण्याचा लवचीकपणा आपण ठेवला पाहिजे नाहीतर तो अट्टहास होतो.

संवाद येथे केवळ आपला इतरांशी अपेक्षित नसून आपला स्वतः:चा स्वतः:शी सुद्धा अपेक्षित आहे.
आपण स्वतः: बद्दल काय विचार करतो हे महत्त्वाचे आहे. त्यानुसार आपली प्रतिमा बनते.

थोडक्यात आपला दोन्ही प्रकारचा संवाद सुधारण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.
त्यामुळे आपला संवाद इतरांशी छान होईल आणि तसा प्रतिसाद मिळेल.

मग "लोक" या प्रकाराची भीती उरणार नाही -
कारण त्या वेळेस आपल्याला माहिती असेल की लोक आपल्याबद्दल काय विचार करत आहेत...
कारण त्या वेळेस लोकांनी आपल्याबद्दल काय विचार करावा हे काही प्रमाणात आपण ठरवलेले असेल..
कारण त्यांच्याशी योग्य तो संवाद साधला गेलेला असेल...
म्हणजे सर्व गोष्टींचे मूळ आपले विचार आणि त्यातून निर्माण होणारा संवाद.

आणि ह्या सर्व गोष्टी म्हणजे विचारांना आणि संवादाला योग्य दिशा देण्याचे काम हे बालपणापासूनच आपण मुलांना त्यांना समजेल असे शिकवले पाहिजे. जितक्या लवकरात लवकर तितके चांगले.
लहानपणापासून जे वाचले, ऐकले, पाहिले आणि बोलले जाते त्यानुसार आपली विचारांची दिशा ठरते.
नंतर दिशा बदलवणे थोडे कठीण जाते.
अशक्य मात्र नसते.

तुमच्या विचारांच्या रथाचे सारथ्य तुम्ही करा. रथ योग्य दिशेला नेऊन योग्य शब्दांचे बाण धनुष्यातून सोडा.
शब्द बाण समोरची व्यक्ती पाहून निवडा.
मग पुन्हा परतून येणारे बाण हे असे असतील ज्याची तुम्हाला भिती वाटणार नाही.

आजवरच्या अनुभवातून हे वरील विचार माझ्या मनात आले. आणि मी ते तुमच्या सोबत शेअर केले, येथे व्यक्त केले.
बघा वरील लेखावर एकदा विचार करून!! आणि त्यावर मनात येणारे प्रतीविचार प्रतिक्रियेच्या रूपात व्यक्त करा.
धन्यवाद!!

- निमिष सोनार, पुणे
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel