दादा हे उपनाम किंवा उपाधी तीन कारणांनी लावतात .गल्लीतील दादा म्हणजे गुंड अशा अर्थाने.आजोबा, घरातील  सर्वात वडील आदरणीय व्यक्ती, अशा अर्थाने.लहान भाऊ असल्यास मोठ्या भावाला दादा हे उपनाम   मिळते.मी जेव्हां दादा झालो तेव्हां फक्त  चार वर्षांचा होतो.अर्थातच पहिल्या दोन कारणांसाठी मी दादा असणे संभवत नाही.मी चार वर्षांचा असताना मला लहान भाऊ झाला आणि मी दादा झालो.

माझे घरातील लाडके नाव सांगितले तर तुम्हाला कदाचित हसू येईल.आम्ही ज्या गावात सारस्वत कुटुंबे बहुसंख्येने रहात होती अशा गावात राहत होतो.सारस्वत असा भारदस्त शब्द वापरण्याऐवजी "शेणवी"असा शब्द त्याकाळी वापरला जात असे.हल्ली काय म्हणतात माहीत नाही.ब्राह्मणांमध्ये जसे चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण,देशस्थ ब्राह्मण,कऱ्हाडे ब्राह्मण,देवरुखे ब्राह्मण,असे विविध प्रकार असतात तसेच सारस्वतांमध्ये असतात की नाही माहीत नाही.त्यातील एक प्रकार शेणवी आहे कि सारस्वत याचा अपभ्रंश शेणवी झाला, कांही माहीत नाही.घरात गावातील सर्व सारस्वत ब्राह्मणांचा उल्लेख शेणवी म्हणून केला जात असे.हे सर्व मत्स्याहारी होते.त्याना मत्स्याहार करतो हे कां कोण जाणे लपवायचे असे.म्हावरिणी,मासे विकणार्‍या,माशांच्या टोपल्या घेवून त्यांच्या मागील दारी जात असत.कदाचित हा व्यवहार घरातील स्त्री मंडळी करत असल्यामुळे त्या मागील दारी जात असाव्यात.

तर आम्हाला भट संबोधले जात असे.आम्ही अर्थातच पूर्ण शाकाहारी होतो.ज्या गावात माझे वडील शिक्षक म्हणून नोकरी करीत होते तिथे दोनच भट होते.एक आम्ही व दुसर्‍या  एक अलवणातील(लाल लुगडे) विधवा बाई होत्या.त्या काळात म्हणजे जवळजवळ नव्वद शंभर वर्षांपूर्वी आणि त्या अगोदरही  मुलगी विधवा झाली,बाई विधवा झाली, की तिची श्मश्रू करण्यात येत असे.दर महिन्याला न्हावी येवून श्मश्रू करीत असे.सक्तीने लाल पातळ,रात्री जेवण नाही आणि अशी  अनेक बंधने अशा स्त्रियांना पाळावी लागत.घरातील किंवा बाहेरील पुरुषांच्या अत्याचारानाही त्यांना बळी पडावे लागे.केवळ ब्राह्मण म्हणजे भट यांच्यामध्येच ही प्रथा होती.सारस्वतामध्ये ही प्रथा असलेली माझ्या तरी पाहण्यात आलेली नाही.तर त्या बाईंना भटीणकाकू म्हणत असत.माझ्या वडिलांची उपाधी मास्तर "पटवर्धन मास्तर"अशी होती.गावात दोन भटांची घरे होती.भटीण काकू स्थानिक होत्या.वडील नोकरीनिमित्त आलेले होते.

त्या काळात शेणव्यामध्ये बबन, बाबय,बाबल्या, अशी नावे सर्रास वापरली जात असत.तर मला कौतुकाने "बाबय" म्हणून सर्वजण हांक मारीत असत. कदाचित भाऊना, भास्कर हे नाव आवडत नसल्यामुळे असे टोपण नाव पडले असावे.मला धाकटा भाऊ झाला आणि तो दादा म्हणून हाक मारू लागला.

त्याकाळी हॉस्पिटल्स नव्हती.खेडेगावात तर नव्हतीच नव्हती. घरातच सुईणीकडून बाळंतपणे होत असत.वैद्यकीय सेवेच्या अभावी स्त्रियांमध्ये बाळंतपणात मृत्यूचे प्रमाण फार मोठे असे.बाळंतपण कुशल बाईला सुईण म्हणत असत.आईचे दुसरे बाळंतपण असल्यामुळे आमच्या घरी गावातील सुईणीकडून घरातच आई रात्री बाळंत झाली.मी अर्थातच गाढ झोपलेला होतो.त्या काळात बाळंतिणीची खोली म्हणून घरात एक स्वतंत्र खोली असे.आम्ही ज्या घरात राहत होतो तेथेही तशीच खोली होती. सामान्यतः ती खोली काळोखी असे.मला लहानपणच्या कांही गोष्टी ठळकपणे आठवतात.

सकाळी उठल्यावर भाऊंनी(वडील) मला बोटाला धरून आईच्या खोलीत नेले.माझा धाकटा भाऊ दाखवला.आणि तू आता दादा झालास असे मला सांगितले.त्याला बोलायला यायला लागल्यावर तो जरी मला दादा म्हणून हाक मारीत असे तरीही बाकी सर्व जण "बाबय" म्हणूनच हाक मारीत असत.त्याने दादा म्हणावे म्हणून घरातील मंडळी म्हणजे आईवडील कटाक्षाने दादा अशी हाक मारीत असत.    

तशी माझी अनेक नावे झाली.पाळण्यात माझे नाव बाराव्या दिवशी "भास्कर"ठेवण्यात आले होते.त्याकाळी कटाक्षाने बारसे बाराव्या दिवशीच करीत असत.पाळण्यात घालून नाव ठेवले जाई.हल्ली मुलाच्या आईला बारसे समारंभात भाग घेता यावा म्हणून महिन्याभराने केव्हांही बारशाचा समारंभ केला जातो.त्या काळी नव्वद वर्षांपूर्वी मुलाच्या बापाला मुलाचे नाव काय ठेवावे याबाबत विचारले जात नसे.घरातील वडीलधारी मंडळी नाव ठरवून मोकळे होत असत.

प्रथेप्रमाणे माझ्या आईचे पहिले बाळंतपण माहेरी झाले.सहज गंमत म्हणून सांगतो.आई बाळंत झाल्याची चिठी दोन तीन दिवसांनंतर वडिलांना पाठवण्यात आली.त्या काळी पोस्ट किंवा प्रत्यक्ष जाणे याशिवाय संदेशवहनाचे दुसरे साधन नव्हते.भाऊ राहत होते ते नोकरीचे गाव "डोर्ले" माझ्या आजोळाहून (गांवकोंड) चालत फक्त एक तासाच्या अंतरावर होते.आमच्या आजोबांनी म्हणजे आईच्या वडिलांनी माझे नाव परस्पर ठेवले.माझ्या वडिलांना कळविले नाही. विचारलेसुध्धा नाही.त्याना बारशाला बोलावण्यात आले नव्हते. रविवारी जन्माला आला म्हणून आजोबानी "भास्कर"असे नाव ठेवले असावे.आमच्याकडे आजी आजोबा काका इत्यादी कुणी मोठे नसल्यामुळे त्यांना विचारण्याचा प्रश्नच नव्हता.भाऊ एकुलते एक होते.  

माझ्या वडिलांना भास्कर हे नाव आवडले नाही.त्यावेळी पंचक्रोशीत एकदोन भास्कर होते.ते एक्सेंट्रिक, सर्किट, थोडेबहुत सरकलेले,विक्षिप्त, एककल्ली,वेडसर शब्द वापरू का?होते.त्यामुळे भाऊनी शाळेत घालताना माझे नाव,सूर्याचे दुसरे नाव, "प्रभाकर"ठेवले.भाऊंना भास्कर हे नाव न आवडल्यामुळे मला त्या नावाने कधी कुणी हाक मारली नाही.माझे आजोबा आईचे वडील मला कौतुकाने गुळेकर म्हणून हाक मारत असत.आमच्या मूळ गावाचे नाव गुळे म्हणून गुळेकर.भास्कर नावाचे कित्येक लोक अतिशय प्रसिध्द आहेत. नामांकित गायक व संगीतकार पं. भास्करबुवा बखले,ज्योतिषाचार्य भास्कराचार्य,भास्कर रामचंद्र पाळंदे, (प्रख्यात कवी यांची आई थोर तुझे उपकार ही कविता प्रसिद्ध आहे)संत गजानन महाराज यांचे शिष्य संत भास्कर महाराज,भास्कर रामचंद्र भागवत बालसाहित्य निर्मिती करणारे,इत्यादी इत्यादी.भाऊना भास्कर हे नाव आवडत नसे एवढे मात्र खरे.     

अगदी लहान असताना मी टेबलावर बसून  जोरजोराने दोन हाताने वाजवीत असे.त्यावेळी नवीनच टेबल केलेले होते.तेव्हा मला कांही दिवस "धबड्या" म्हणत असत."बाबय" हे नाव मात्र अनेक वर्षे वापरले जात असे.माझा धाकटा भाऊ मात्र मला कटाक्षाने दादा म्हणत असे.अधूनमधून, चुकत माकत, आई वडीलही, दादा म्हणून हाक मारीत. माझा उल्लेख करीत.हळूहळू आईवडील दादा म्हणू लागले.

अकराव्या वर्षी माझा धाकटा भाऊ दुर्दैवाने मृत्युमुखी पडला.त्यावेळी आम्ही आमच्या मूळ  गावात गुळ्याला आलो होतो.  आमांशाची जबरदस्त साथ आली होती.किती तरी तरुण मंडळी मृत्युमुखी पडली.त्यातच माझा धाकटा भाऊ "राजा" गेला.नंतर मला दादा म्हणण्याचे सोडून दिले गेले.दादा म्हटले तर धाकटय़ा भावाची स्मृती जागृत होत असे.ती स्मृती नकोशी वाटे.त्याचे देहावसान डोळ्यासमोर दिसू लागे.

मी रत्नागिरीला शिकायला आल्यावर माझ्या मामाने कटाक्षाने मला प्रभाकर म्हणण्याला सुरुवात केली."बाबय" हे नाव विस्मृतीत गेले.

माझ्या मामे काकांची(वडिलांचे मामेभाऊ) मुले,माझ्याहून लहान होती.त्यांना कुणी मला दादा म्हणण्यास सांगितले असते तर माझे दादापण टिकून राहिले असते.परंतु त्यांना तसे कुणी सांगितले नाही.माझा आतेभाऊ माझ्याहून मोठा होता.त्याला सर्व दादा म्हणत असत.त्यामुळे अातेभावंडांनी  दादा म्हणण्याचा प्रश्नच आला नाही.तो माझ्यापेक्षा  मोठा असूनही मी कधी त्याला दादा म्हणून हाक मारली नाही.पु ल देशपांडे म्हणतात त्याप्रमाणे एकूण कोकणातील मंडळी 'एकवचनी' हेच खरे.    

पुढील आयुष्यात प्रभाकर, पटवर्धन,पटवर्धन सर,सर, अशा नावाने मी ओळखला जात असे.

माझा विवाह झाल्यावर  मला, जावई बापूंना हांक कशी मारावी, उल्लेख कसा करावा, असा प्रश्न माझ्या श्वशुराना पडला.त्यांनी सौभाग्यवतीला मला घरी कशी हाक मारतात, उल्लेख कसा करतात, असा प्रश्न विचारला.दादा,तात्या, अप्पा, मामा, काका, नाना, अण्णा, कांहीतरी नाव असेलकी असे विचारले.तिने प्रभाकर म्हणतात असे सांगितले.प्रभाकरराव, प्रभाकरपंत, असे म्हणणे त्याना पटत नव्हते.प्रभाकर म्हणून हाक मारली तर एकेरी उल्लेख केल्यासारखे होते.त्याकाळी जावयाला अहो जाहो केले जाई.त्या काळी काय मीसुध्दा माझ्या जावयाला अहो जाहो करतो.माझी मुलगी आणि माझा जावई मात्र त्यांच्या जावयांना अरे तुरे करतात.त्यामध्ये कुणालाही विचित्र वाटत नाही.कुणालाही राग येत नाही.उलट ते जास्त जवळचे वाटते.जसा मुलगा,जशी मुलगी, तसाच जावई मुलासमान,आणि हेच बरोबर आहे.हा पिढी पिढीचा फरक आहे.हल्ली वडिलांना बरीच मुले एकेरी संबोधतात.त्या काळात वडिलांना तसे संबोधले जात नसे.तरीही मी वडिलांना ए भाऊ असेच म्हणत असे.त्यांनीही कधी त्याला प्रतिबंध केला नाही.जसा आपण आईचा प्रेमाने एकेरी उल्लेख करतो तसेच वडील.      

अण्णांना माझ्या श्वशुराना कांहीतरी घरगुती  नावाने मला हाक मारायची आहे असे माझी सौभाग्यवती मला म्हणाली.मला एकदम माझ्या धाकटय़ा भावाची राजाची आठवण झाली. माझा धाकटा भाऊ "दादा"म्हणत असे.त्यानंतर कुणी मला दादा म्हटले नाही.असे मी सौभाग्यवतीला सांगितले.अण्णांनी मला दादा म्हणण्याला सुरुवात केली.माझ्या सासुरवाडीचा गोतावळा मोठा आहे.सर्व जण मला दादा म्हणू लागले.घरीही आई भाऊ आणि इतर नातेवाईक मंडळीही क्वचित दादा म्हणू लागली.अर्थात माझ्या माहेरी मी एकूण  प्रभाकरच आहे.पुढे मामा, काका, अशी नात्यानुसार बिरूदे मिळाली.माझे भाचे पुतणे सख्खे नाहीत.मला भाऊ बहीण नाही. धाकटा भाऊ लहानपणीच वारला हे मी लिहिले आहेच.

*हळूहळू शेजारी, मित्र, आणि इतर मंडळी दादा म्हणू लागली.*

*धबड्या,बाबय,गुळेकर, दादा,प्रभाकर,आणि पुन्हा दादा!!*

*माझी पत्नी  मला दादा म्हणून हाक मारते.मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे, दादा म्हणूनच हाक मारतात.* 

*अशा प्रकारे अनेक लोकांनी मला अनेक नावे ठेवली.*     

*असा मी दादा झालो.*   

५/१०/२०२१©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel