डोरल्याला भाऊंची बदली  होण्या अगोदर ते पावसला शाळेत मास्तर होते.पावसला मोठी बाजारपेठ असल्यामुळे किराणा सामान व इतर गोष्टी कश्या आणाव्या याची काळजी नव्हती .डोरल्याला आल्या वर वस्तूंची उपलब्धता दर्जा व किंमत या सर्वच बाबतीत आनंद होता.पूर्णगडला ताम्हनकर यांचे मोठे घाऊक विक्रीचे व किरकोळ विक्रीचे दुकान होते.भाऊंनी ताम्हनकऱ यांना भेटून स्वस्त व चांगल्या वस्तू केव्हा मिळतात याची चौकशी केली. त्यांचा सर्व माल मुंबईहून गलबतातून येत असे त्यांची वखार व दुकान खाडीकाठी होते . डोर्ले येथून येणारी मुचकुंद नदी जिथे समुद्राला मिळे त्या ठिकाणी त्यांचे दुकान होते. पावसानंतर एखाद्या महिन्याने व पावसापूर्वी एखादा महिना माल ताजा स्वस्त   व सर्व प्रकारचा मिळत असे.

तेव्हापासून भाऊंनी दरवर्षाला दोनदा सर्व माल ताम्हनकरांकडून  आणून घरी भरण्याला सुरवात केली.होडी शिवाय वस्तू आणण्यासाठी दुसरा कोणताही स्वस्त पर्याय नव्हता.वर्षातून दोनदा डोरले ते ताम्हनकर व ताम्हनकर ते डोर्ले असा प्रवास होई.तीन चार वर्षांचा असल्यापासून मी प्रत्येक वेळी त्यांच्या बरोबर होडीतून प्रवास करीत असे . तो प्रवास माझ्या अजूनही मनात खोलवर रुजलेला आहे .डोर्ल्याला गावाबाहेर कुठे सहज जाणे शक्य नसल्यामुळे बाहेर जाणे हाच एक आनंद होता .नदीतून प्रवास म्हणजे एक आनंद यात्रा होती .जाताना ओहोटी  बघून जावे लागे.सर्व खरेदी करून होडीमध्ये माल भरून भरतीबरोबर पुन्हा परत यावे लागे.

नदीतून प्रवास करताना होडीला असलेली ओहोटी बरोबरची गती ,वारा अनुकूल असल्यास होडीवाला शीड उभारत असे व त्यामुळे गती आणखी वाढे.होडीच्या गतीबरोबर होडी पाणी कापत असताना दोन्ही बाजूने वेगाने  जात आहे असे भासमान होणारे पाणी .दूरवर दोन्ही बाजूला दिसणारा किनारा व त्यावरची दाट झाडी .त्यातून अधूनमधून दिसणारी घरे .ही सर्व वेगाने उलट दिशेने जात आहेत असे वाटे .बाजूने जाणाऱ्या होड्या .दोन्ही बाजूला दिसणारे डोंगर ,त्यावरचमचमणारी सूर्य किरणे ,पूर्णगड जवळ आल्यावर सागराचे होणारे दर्शन ,त्यात उसळणाऱ्या मोठमोठ्या लाटा ,हे सर्व दृश्य विलोभनीय असे.लहान डोळ्यांना ती दृष्ये आणखीच भव्य वाटत .परत येताना भरती व तशीच  दृश्ये असत.ताम्हनकर  याचे घर दुकान वखार सर्व एकत्रच नदी किनारी होते . डोंगर उतारावर हे सर्व असल्यामुळे होडी त्यांनी स्वत:साठी बांधलेल्या धक्क्यावर लागे जिने चढत चढत  वर जावे लागे .जशीजशी गरज वाढली त्याप्रमाणे बांधकाम  केले होते. घर मंगलोरी कौलांचे तर दुकान वखार इत्यादीवर पत्रे  घातलेले होते .भाऊंची सर्व खरेदी होईपर्यंत ,जिन्याने सर्वत्र चढउतार करणे, इकडेतिकडे धावणे, नदी किनारी जाणे,नदीतून जाणाऱ्या होड्या पाहणे, एखादे गलबत धक्क्याला लागले असल्यास माल उतरताना पाहणे, यामध्ये माझा वेळ छान जात असे .कधी कधी ओहोटी  भरती व स्वस्त मालाची उपलब्धता ही सर्व गणिते जुळून  रात्रीचाही प्रवास करावा लागे. त्यावेळी चांदणे असेल तर फारच मजा येई .चांदण्या मध्ये सर्व सृष्टी पूर्णपणे बदलून गेलेली व शांत शांत वाटे .भरतीवर होडी बांधावर लागे. चिखलातून जावे लागत नसे .सांगितलेली गडी माणसे येऊन होडीतील माल आमच्या घरी नेत असत .रात्रीच्या वेळी शांत वातावरणात एका बाजूला मंद वाऱ्यावर डुलणारी भातशेती व दुसऱ्या बाजूला नुसते चमचमणारे पाणी हे दृश्य अजूनही डोळ्यासमोर आहे .

या संदर्भात ताम्हनकरांकडे घडलेली ,भाऊंनी सांगितलेली एक गमतीशीर गोष्ट ,माझ्या लक्षात आहे.भाऊ खरेदीसाठी गेले असताना तिथे एक सरकारी अधिकारी आले. त्यांना चहाची पूड खरेदी करावयाची होती. त्यांना ताम्हनकरानी एक नमुना  दाखवला .त्यानी त्याहून चांगली पूड आहे का विचारले.  त्यांनी दुसऱया खोक्यातील पूड दाखविली . त्यांनी आणखी चांगली आहे का विचारले. त्यांनी तिसऱ्या खोक्यातील पूड दाखविली. त्यांच्या किमती त्यांनी चार सहा व आठ आणे रत्तल (त्या वेळी आणे व रत्तल ही नाणी व मापे अस्तित्वात होती )अशा सांगितल्या .त्यावेळी रत्तल होता किलो नव्हता. ते गृहस्थ आठ आणे रत्तलवाली पूड घेऊन गेले .ते गेल्यावर ताम्हनकर खोखो हसत भाऊंना म्हणाले की एकच पूड तिन्ही खोक्यात होती,महाग म्हणजे वस्तू चांगली असतेच असे नाही !!! काही लोक महाग वस्तू म्हणजे जास्त चांगली वस्तू म्हणून खरेदी करतात .

नदीच्या उगमाकडे भालावली नावाचे एक गाव होते .तिथे ऊस व उसाचे गुऱ्हाळ होते. तिथे भाऊंनी शाळेची ट्रीप नेण्याचे ठरविले. आम्ही भरतीवर रात्री आठ नऊच्या सुमाराला तिथे पोचलो .आम्ही भरतीचा फायदा घेऊन गेलो . काळोखी रात्र होती. उसाच्या रसाच्या भट्ट्या लागलेल्या होत्या. मोठमोठ्या काहिलीत रस उकळत होता .थंडी, उकळता रस, त्यात काविलथा हलवीत असलेले लोक ,भट्टीची धग, काळोखी रात्र, रान ,इत्यादि सर्व लक्षात अाहे,साच्यांमध्ये रस ओतताना, गुळाची भेली तयार होताना पाहताना मजा वाटली . मनसोक्त रस पिऊन गूळ खाऊन बरोबर रस काकवी गूळ घेऊन पुन्हा पहाटेचे ओहोटी असताना होडीतून परत आलो .

मोठेपणी अनेक वेळा लहान मोठ्या नद्यातून लहान मोठ्या  जहाजातून गंगा यमुना नर्मदा गोदावरी कावेरी इत्यादी नद्यातून प्रवास केला.परंतु लहानपणीच्या रम्य आठवणी त्या आठवणीं.तो पर्यंत जग विशेष पाहिलेले नसल्यामुळे त्या आठवणींची कुठेही तुलना करता येत नाही .(ज्ञान मोठे असेल परंतु निरागसता आकर्षक व श्रेष्ठ  असते.) त्यामुळे त्या खोलवर रुजलेल्या असतात .

२९/५/२०१८  ©प्रभाकर  पटवर्धन  
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel