भाऊना सुगम संगीताची खूप आवड होती.त्याकाळी रेडिओ नव्हते व असले तरी विजेवर चालणारे व्हाल्वचे रेडिओ होते.ते खूपच महाग असत व शहरात वीज असेल तेथे म्हणजेच मोठ्या शहरात असत.माझ्या कुणा नातेवाईकांकडे रत्नागिरीलाही रेडिओ पाहिलेला मला आठवत नाही. सुरुवातीच्या काळात रत्नागिरीलाही वीज नव्हती व वीज आल्यावर प्रत्येक घराने वीज घेतली असेहि नाही .डोर्ल्याला तर रेडिओ स्वप्नवतच होता .त्याकाळी संगीत ऐकण्याचे एकच साधन होते ते म्हणजे ग्रामोफोन तोही खूप महाग होता फक्त श्रीमंतांनाच परवडणारा होता  .हा ग्रामोफोन स्प्रिंगवर चालणारा असे त्याला दरवेळी चावी द्यावी लागत असे.कचकड्याच्या तबकड्या असत. प्रत्येक बाजूला एकच गाणे तेही तीन साडेतीन मिनिटांचे असे.तबकडय़ांवर  स्प्रिंगच्या आकाराच्या वर्तुळाकार रेघा असत त्यात खाचखळगे असत त्यातून सुई फिरे.त्याप्रमाणे कंपने निर्माण होत व त्याचे रूपांतर साउंडहेडमार्फत ध्वनी लहरी मध्ये केले जाई.अंतर्गत कर्ण्यामधून तो आवाज मोठा होऊन आपल्या कानावर पडे. पूर्वी कर्णा बाहेर होता यामध्ये तो पेटीतच बसवलेला होता . एक सुई दोन बाजूंसाठी चालत असे नंतर ती बदलावी लागे .तबकडीवर चरे पडल्यास आवाज फाटे किंवा पुढे सुई सरकत नसे.जागच्या जागी ती फिरत राही.दर बाजू वाजवण्यासाठी चावी न दिल्यास गती कमी होई व आवाज विचित्र येत असे.तबकडीला काचे पेक्षाही जास्त जपावे लागे.तबकड्या ग्रामोफोन वगैरे रत्नागिरीला एका दुकानात उपलब्ध होत्या.

अशा ग्रामोफोनची किंमत त्यावेळी चारशे रुपये होती .भाऊना त्यावेळी सुमारे पस्तीस रुपये पगार होता व त्यामध्ये आमचे  चौघा जणांचे कुटुंब व्यवस्थित चांगल्या प्रकारे जगत होते एवढी स्वस्ताई त्यावेळी होती .

भाऊंना चारशे रुपये खर्च करणे शिवाय तबकड्या साठी पैसे खर्च करणे शक्यच नव्हते                                 .भाऊंचे गुरव मास्तर म्हणून एक परमस्नेही होते . ते सधन होते .भाऊंची गाण्याची आवड त्यांना माहिती होती .त्या काळी खेडेगावात कोणतीच करमणुकीची साधने नव्हती .पत्ते गंजिफा खेळणे उगीचच गप्पा मारत बसणे खेडेगावातील उत्सवामध्ये नाटक बसवणे यामध्ये त्यांना रुची नव्हती भाऊ गाणे ऐकण्यासाठी झुरतात हे त्यांच्या लक्षात आले .भाऊंचा स्वभाव त्यांना माहिती होता .पैसे दिले तर ते घेणार नाहीत हे त्यांना पूर्णपणे माहिती होते .त्यांना गाण्याची विशेष आवड नव्हती .त्यांनी भाउंसमोर एक योजना ठेवली .ग्रामोफोन त्यांनी घ्यावा व तबकड्या भाऊंनी घ्याव्या व सहा सहा महिने ग्रामोफोन आलटून पालटून दोघांकडे ठेवावा.तबकड्यांसाठी एकदम पैसे खर्च होणार नसल्यामुळे ही योजना भाऊंना पसंत पडली .अश्या प्रकारे ग्रामोफोन आमच्या घरी आला .भाऊ मुद्दाम रत्नागिरीला जाऊन किंवा जेव्हा जात तेव्हा तबकड्या विकत आणीत.प्रभातच्या सिनेमातील प्रसिद्ध गाणी बालगंधर्वाचे नाट्यसंगीत व इतर सुगम संगीत लहानपणी ऐकलेले आठवते .त्यातून आवाज कसा येतो त्यामध्ये एखादा वा एखादी गायक गायिका बसलेली आहे का अशा प्रकारचे लहानपणचे कुतहूल आठवते .ग्रामोफोनवर गाणी लावली की मी त्याला कान लावून बसत असे .भाऊना जास्त आवड म्हणून प्रथम ग्रामोफोन आमच्याकडे होता .सहा महिन्यानंतर गुरवमास्तर ग्रामोफोन नेण्याचे नाव काढीनात.भाऊंनी बळे बळे गडी करून ग्रामोफोन गुरव मास्तरांकडे पोचवला .मास्तरांनी पुन्हा काहीतरी कारण सांगून तो लवकरच आमच्याकडे पोचवला .असा प्रकार दोन अडीच वर्षे चालला .त्यानंतर दुर्दैवाने गुरव मास्तर तरुणपणी वारले .त्यांची पत्नी नको नको म्हणत असतानाही भाऊंनी ग्रामोफोन विकून आलेल्या पैशात स्वतःची भर घालून चारशे रुपये गुरव मास्तरांच्या पत्नीला दिले.भाऊंना ग्रामोफोन विकताना खूप वाईट वाटले भाऊंनी ग्रामोफोन जिवापलीकडे जपला होता एका बाजूला एकच सुई वापरणे मउ फडक्याने तबकड्या स्वच्छ ठेवणे त्या व्यवस्थित खोक्यात ठेवणे इत्यादी  .अश्या प्रकारे ग्रामोफोनचा अध्याय संपला .त्यानंतर दहा बारा वर्षांनी मी नोकरीला लागल्यानंतर प्रथम रेडिओ घेऊन भाऊंना दिला .सुरुवातीचा रेडिओ वेट बॅटरीवर चालणारा होता .त्याची बॅटरी व रेडिओचा आकार सारखाच असे. त्यानंतर मोठ्या परंतु ड्राय बॅटरीवर चालणाऱा आला छोट्या बॅटरीवर चालणारे रेडिओ त्यानंतर आले .वेट बॅटरीची किंमत रेडिओ एवढीच असे . 

या विषयाच्या संदर्भात थोडे विषयांतर करून त्या काळातील जातीव्यवस्था व समाज चौकट जातीची उतरंड व समाजमन याबद्दल माझ्या मनावर असलेल्या  काही चित्राना शब्दरूप द्यावे असे वाटते. 

गुरव मास्तर स्वतः पूर्ण शाकाहारी होते .

जाती व्यवस्थेत ते आमच्या पेक्षा खालील स्तरावर होते .ते वडिलांचे परमस्नेही होते.ते आमच्याकडे येत त्यावेळी जेवावयाला स्वाभाविकपणे असत .त्यांचे पान काटकोनात मांडले जाई .जेवण झाल्यावर ते आपले पान स्वतः उचलून टाकत व ताट असल्यास ते घासून  ठेवीत .यामध्ये त्यांनाही काही गैर वाटत नसे व आम्हालाही काही चूक वाटत नसे.माझ्या बालमनाला मात्र असे कसे ?असे का? असे वाटे.नेहमी आम्ही  सैपाकघरात जेवावयाला बसत असू ,पण ते आले म्हणजे माजघरात जेवण होई.जाती व्यवस्थेमध्ये प्रत्येकाने आपली पायरी मान्य केलेली होती त्या प्रमाणे आचरण करण्यात कुणालाही काहीही चूक  वाटत नसे.आमच्याकडे लागणारी सूप रोवळी इत्यादी बांबूपासून बनविलेल्या वस्तू देण्यासाठी बाबू महार येत असे या वस्तू महार बनवत असत .तो आमच्या घरी येई त्यावेळी भाऊ त्याला अरे आत येऊन बस म्हणून सांगत पण तो कधीही घरात आला नाही .तो आल्यावर त्याने हाक मारली म्हणजे आतून कोण आहे असे विचारल्यावर तो बाबू महार म्हणून सांगे.त्याला चहा दिल्यावर तो स्वतः कपबशी विसळून कोनाड्यात ठेवी .त्यांच्या कपबश्या वेगळ्या असत . .कोकणात निदान त्या भागात तरी जातीवरून काही अपशब्द दिले गेले व त्यातून असंतोष निर्माण झाला असे कधी झाले नाही .वर म्हटल्याप्रमाणे जातीची उत्तरंड, जातीवाचक नाम, सोवळे ओवळे, वागण्याचे निर्बंध ,हे सर्वांनी स्वभावत:मान्य केलेले होते त्यात कोणालाही गैर वाटत नव्हते

१८/५/२०१८ प्रभाकर  पटवर्धन   

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel