माझ्या वयाची बालपणाची नऊ वर्षे या गावात गेली .नोकरीच्या निमित्ताने माझ्या वडिलांचे वास्तव्य या गावात झाले .सामान्यतः चार वर्षापर्यंतच्या स्मृती राहात नाहीत .चार ते नऊ या पांच वर्षांतील स्मृती आहेत .त्यानंतर शिक्षणासाठी मी गावाबाहेर शहरात गेलो 

हे गाव सृष्टीसौंदर्याने नटलेले होते .गावाला नदी होती परंतु ती खाऱ्या पाण्याची होती.  कारण भरतीचे पाणी तिथपर्यंत येत असे. नदीचे नाव मुचकुंदी नदी मुचकुंदी ऋषींच्या नावावरून हे नाव ठेवलेले असावे .भरतीचे पाणी या गावावरून वरती म्हणजे उगमाकडे जात असल्यामुळे पाणी खारे होते .नदीच्या दक्षिणेला गाव वसलेले होते या नदीला एक लांबलचक बांध घातलेला होता .फार मोठा मळा या गावाला होता. मळा म्हणजे नदीच्या काठची भुसभुशीत सुपीक जमीन .त्याच्या संरक्षणासाठी ,त्यामध्ये खारे पाणी जाऊ नये म्हणून हा बांध घातलेला होता.या मळ्यामध्ये वर्षातून दोनदा भाताचे पीक येत असे .बांधाच्या संरक्षणासाठी एक फार मोठा चर आतल्या बाजूने खणलेला होता बांधाला ठिकठिकाणी खिडक्या ठेवलेल्या होत्या त्यातून भरतीचे पाणी आत येई हा चर पाण्याबरोबर आलेल्या गाळामुळे उथळ होइ व त्यातिल गाळ उपसून मळ्यामध्ये टाकीत असत त्यामुळे मळा सुपीक राही व त्याची उंचीही वाढे . दोन्ही बाजूला दाब सारखा झाल्यामुळे बांध सुरक्षित राही.भरतीच्या वेळेला पाणी आत येई व ओहटीच्या वेळेला पाणी बाहेर जाई बांध सुरक्षित राहण्यासाठी जेव्हा भरती असे ,विशेषत:अमावास्या व पौर्णिमा यावेळी ,पावसाळ्यात पूर आलेला असे, अश्या वेळी, दिवस रात्र त्या बांधावर सतत गस्त घालावी लागे व कुठे पाणी मुरत असल्यास लगेच त्याची दुरुस्ती करावी लागे   .त्या मळ्यात वर्षातून दोनदा भाताची पिके घेतली जात .भाताच्या लावणीचे कामही पाहण्यासारखे असे .प्रथम भात म्हणजे तांदुळाच्या वरील टरफलासकट असलेले दाणे , काही कोठ्यामध्ये पेरले जात. ( कोठी म्हणजे  लहान खाचर चारी बाजूनी दगडाचा बांध घालून पाणी तुंबण्यासाठी तयार केलेली आवयताकृती जागा भाताच्या शेताला पाणी भरपूर लागते)

काही दिवसांनी ते उगवून भाताची रोपे तयार होत.ती रोपे अंतराअंतराने सर्वत्र लावली जात त्याला लावणी  असे म्हटले जाई.हे लावणीचे दृष्य पाहण्यासारखे असे. जिकडे तिकडे असंख्य बायका ती रोपे काढून लावत असत. त्या वाकलेल्या बायका  सर्वत्र मळ्यात रोपे लावतानाचे दृश्य ,जिकडे तिकडे पाण्याने भरलेल्या कोठ्या ,अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहेत .वर्षातून दोनदा, सर्वत्र सुरवातिचा हिरवागार मळा व पीक तयार झाल्यावर पिवळा शार मळा हे दृश्य अजूनही डोळ्यांसमोरून जात नाही .भात (म्हणजे कणसे असलेली भाताची झाडे )तयार झाल्यावर कापणीचे दृश्य पाहण्यासारखे असे एकाच वेळी असंख्य बायका पुरुष विळे  घेऊन गाणी म्हणत  उकिडवे बसून भात कापत असत  .

कापलेल्या भाताचा एकत्र ढीग रचत त्याला उडवी म्हणत . अशा सर्वत्र पसरलेल्या उडव्यांचे दृश्यही पाहण्यासारखे असे .भाताची मळणी,  भरलेल्या पोत्यांची वाहतूक, हे सर्व दृष्य पाहण्यासारखे असे .

मामाच्या गावाला जाताना किंवा आत्याकडे जाताना ,वडिलांच्या मामाच्या गावाला जाताना  ,रत्नागिरीला जाताना ,ही नदी ओलांडावी लागे.होडीला तर असे म्हटले जाई ,तर नेहमीच बांधापासून दूर पाण्यात असे बांधाचा उतार उतरून  व नंतर पाण्यातून चालत जाऊन होडीत चढावे लागे.पाण्यामध्ये चिखल खूप असे त्या चिखलातून रप रप करीत जावे लागे गुडघ्ग़ किंवा त्यावरील पाय चिखलाने भरून जात  होडीत चढल्यावर पाय नदीत सोडून फळीवर बसून तो चिखल धुवावा लागे.पलीकडच्या तीरावर गेल्यावर हाच सर्व प्रकार पुन्हा करावा लागॆ.माझा मामा ,वडिलांचे मामा ,माझी आते, रत्नागिरी ,इकडे जाताना नदी ओलांडावी लागे .त्यावेळी या गावाला रस्ते नव्हते .त्यावेळी कोकणात अशी बहुतेक गावे असत .पायवाटा चालत जाणे याशिवाय दुसरा पर्याय नसे .पूलही नसत . परगावी जाताना मळ्यावरून अनेकदा जावे लागे.

मळ्याच्या वरच्या बाजूला गाव वसलेले होते .निरनिराळ्या जातींच्या निरनिराळ्या वाड्या म्हणजेच वस्त्या होत्या .एकाच परिसरात शंकराचे देऊळ व देवीचे देऊळ होते .देवळाजवळ गुरुवांची वस्ती असे .मळ्याच्या वरच्या बाजूला कुर्याठ होते.कुर्याठ म्हणजे फक्त पावसाळ्यात पावसाच्या पाण्यावर डोंगराच्या उतारावर केली जाणारी शेती . गावाला उतार असल्यामुळे या कोठ्याहि पायरीपायरीने उतारावर असत इथे फक्त पावसाळी पिके घेणारी शेती असे.उन्हाळ्यात कुर्याठाच्या काही भागात पाटाच्या पाण्यावर किंवा विहिरीतील पाण्यावर भाजीपाला पिकवला जाई.गावाला छोटीशी गोडी नदी होती मात्र तिला फक्त पावसाळ्यातच पाणी असे(.आणखीही एक छोटीशी नदी होती त्यावरही धरण बांधून पाटाचे पाणी काढलेले होते परंतु ती आम्ही राहात होतो तिथून लांब होती .)नदीमध्ये गोड्या पाण्याचे जिवंत झरे होते व नदीवर ठिकठिकाणी बांध घालून पाणी अडवून छोटी छोटी धरणे बांधलेली होती त्यातून लहान पाट काढून ते गावांमध्ये फिरवलेले होते

या पाण्याचा वापर पिण्यासाठी, कपडे धुण्यासाठी व थोडाबहुत भाजीपाला पिकवण्यासाठी केला जाई  .या छोट्या धरणामध्ये पोहताना मजा येइ. गणपतीच्या दिवसांमध्ये गणपती विसर्जनही या धरणांमध्ये केले जाई ही धरणे पाऊस पडेपर्यंत कमी जास्त पाण्याने भरलेली असत .

या नदीमध्येच डोंगरांच्या कड्यांमधून उंचावरून साधारण सहा फूटावरून पाण्याची एक संतत  धार पडत असे त्याला झरी असे म्हणत असत आम्ही राहात होतो त्या डोंगरावरून अर्धा डोंगर उतरून गेल्यावर ही झरी असे तिथेही एक छोटेसे धरण होते .आई झरीवर पिण्याचे पाणी भरायला येई त्यावेळी मी तिच्याबरोबर जात असे या धरणात डुंबत असे .गावातील वस्ती सारस्वतांची होती सारस्वताना  ब्राह्मण असे म्हणत व आम्ही पूर्ण शाकाहारी भट. गावात भटांची घरे फक्त दोनच होती त्यातील आमचे एक .माझे वडील शाळेत मास्तर होते व त्या निमित्ताने या गावात आमचे रहाणे झाले.त्या वेळी गावातील दाट झाडी, जिकडे तिकडे नारळी पोफळीच्या घनदाट बागा विरळ वस्ती, पाण्यावरून येणारा गार गार वारा,संध्याकाळी फिरावयाला बांधावर जाणे, त्यावेळी एका बाजूला नदी, पलीकडील तीर ,व विरुध्द बाजूला पसरलेला अथांग मळा अशी अनेक दृश्ये मन:पटलावर आहेत,   .बिगारी पहिली ते चौथी अशी .पांच वर्षे मी या गावात होतो त्यावेळी पहिलीच्या अगोदर एक वर्ष शाळा असे त्याला बिगारी असे म्हणत .असे होते माझे बालपणाचे गाव ‍.‍१९४३---१९४४ या वर्षी मी शिक्षणासाठी बाहेर गावी होतो येऊन जाऊन या गावी असे .नंतर वडिलानी हे गाव सोडले.या आठवणी सुमारे ७५ ते ८०  वर्षांपूर्वीच्या आहेत १९४४ साली हे गाव सोडल्यानंतर, इच्छा असूनही ,

शक्य असूनही, जाणे मात्र झाले नाही .आता या गावाला चांगला रस्ता झाला आहे . खासगी आणि एसटीच्या गाड्याही तेथे जातात त्यामुळे तिथे जाणे आता सहज शक्य असूनही जाणे मात्र झाले नाही. कदाचित आता गेलो तर न गेलो होतो तेच बरे असेही म्हणण्याची वेळ येईल कारण सर्वच सुधारणा आता गावात गेल्या असतील व सुधारणांबरोबर इतरही गोष्टी .

आणखी काही आठवणी पुन्हा केव्हातरी .

‍११/५/२०१८ प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel